Anjali Anand’s Sleep Deprivation : करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली आनंद घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिने नुकतीच एका पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी अंजलीने तिच्या कामाच्या वेळेबाबत धक्कादायक खुलासा केला होता. ती पाच महिने सतत २१ तास काम करत होती.
ती सांगते, “कारण मी लठ्ठ आहे म्हणजे याचा अर्थ हा नाही की मी तंदुरुस्त नाही. मी ८-१० तास नाचू शकते. डब्बा कार्टेल आणि आणखी एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना मी १२ आठवडे ‘झलक दिखला जा’ हा डान्स शो केला. मला मजा आली. मी वेळ पाळली नाही सलग पाच महिने, दररोज २१ तासांचा दिवस आणि तीन तास मी झोप घ्यायची. तरी आणि नंतर मला त्याचा दुष्परिणामसुद्धा भोगावा लागला आणि कोणीही असे करेल तर त्याला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल.” ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितले.
अंजली आनंदप्रमाणे जर पाच महिने फक्त तीन तासांची झोप घेतली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घेऊ या
अनेकांना रात्रीच्या वेळी गाढ झोप येत नाही, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मुंबईच्या परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार, इंटेन्सिव्हिस्ट चेस्ट फिजिशियन, ब्रोन्कोस्कोपिस्ट आणि स्लीप डिसॉर्डरतज्ज्ञ डॉ. हरीश चाफले सांगतात, “तुमच्या दैनंदिन झोपेबरोबर तडजोड करणे हे योग्य नाही; यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, जे तुमची मनःशांती हिरावून घेऊ शकतात.”
पाच महिने रात्री फक्त तीन तास झोपल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो. मेंदूचे कार्य, चांगली रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. चाफले सांगतात.
शरीरावर कसा परिणाम होतो?
ज्ञान कमकुवत होणे आणि स्मरणशक्ती कमी होणे – झोपेच्या अभावामुळे एकाग्रता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवणे अवघड जाते. डॉ. चाफले सांगतात, “एखादी गोष्ट आठवण्यात, नवीन कामे शिकण्यात आणि निर्णय घेण्यात एखाद्याला अडचण येऊ शकते.” डॉ. चाफले पुढे सांगतात, “तुम्ही विसरू शकता आणि चिडचिडपणा करू शकता. तुम्ही कधी गाडीच्या चाव्या तर कधी महत्त्वाची कागदपत्रे कुठे ठेवली हे विसरू शकता. गॅस किंवा लाईट बंद करणे, हे तुमच्या लक्षात राहत नाही.
भावनिक अस्थिरता : झोपेच्या अभावाने ताण, स्ट्रेस आणि चिडचिडेपणा वाढतो. डॉ. चाफले सांगतात, “तुम्ही अनेकदा निराश असू शकता, तुमचे मूड स्विंग्स होऊ शकतात.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती : झोप नीट न घेतल्यामुळे तुमच्या शरीराची एखाद्या आजाराशी लढण्याची क्षमता कमकुवत होते, ज्यामुळे तुम्हाला सर्दी, फ्लू आणि इतर आजार होण्याची शक्यता वाढते. “झोपेच्या अभावाने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोकासुद्धा उद्भवू शकतो, त्यामुळे दररोज किमान ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे”, असे डॉ. चाफले सांगतात.
शारीरिक आरोग्यावर परिणाम : पुरेशी झोप न झाल्याने तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो, स्नायू कमकुवत होऊ शकतात, डोकेदुखी आणि मंद गतीने शारीरिक क्रिया करू शकता “झोपेच्या कमतरतेमुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बेकरीतील पदार्थ आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, ज्यामुळे वजन वाढते,” असे डॉ. चाफले सांगतात.
हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका : झोपेचा अभाव रक्तदाब आणि स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
कमीत कमी ७ ते ८ तास गाढ झोप घेणे आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी, झोपण्यापूर्वी मोबाइल फोन किंवा लॅपटॉपसारखे डिजिटल स्क्रीन वापरणे टाळा. “जर तुम्हाला झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुमच्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन करून त्यानुसार औषधे किंवा जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देऊ शकतात.” असे डॉ. चाफले सांगतात.