Bollywood actress Bhagyashree : ‘मैने प्यार किया’फेम अभिनेत्री भाग्यश्री तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर फिटनेसविषयी नवनवीन माहिती शेअर करते. नुकतेच तिने एका व्हिडीओमध्ये वॉल सिट्सचे (Wall sit) महत्त्व सांगितले. भाग्यश्री व्हिडीओमध्ये सांगते, “तुम्हाला एकदंरीत काय करायचे आहे तर बसायचे आहे. तुमचे क्वाड्स, कोर आणि शरीराच्या खालील भागांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वॉल सीट हा अतिशय उपयुक्त व्यायाम आहे. हा व्यायाम प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी वयाचे आणि ठिकाणाचे कोणतेही बंधन नाही. तुमची पाठ भिंतीसमोर सपाट ठेवून उभे राहा, पाय ९० अंश कोनात ठेवा. ३० सेकंदापासून सुरुवात करा. दररोज दोन मिनिटे याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्स्प्रेसनी या व्यायामाचे फायदे चाळिशीतल्या महिलांसाठी गेमचेंजर कसे ठरू शकतील, याविषयी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

फिटनेस एक्स्पर्ट गजवेली चंद्रशेखर सांगतात, “चाळीसपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी दीर्घायुष्य आणि चांगल्या जीवनशैलीसाठी स्नायू, सांधे यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी व्यायाम म्हणजे वॉल स्क्वॅट किंवा वॉल सीट.

ते पुढे सांगतात, “बऱ्याच स्त्रियांना वयानुसार स्नायू कमकुवत आणि हाडाची घनता कमी झाल्याचे जाणवते. यासाठी नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग घेणे महत्त्वाचे आहे. वॉल स्क्वॅट्स हा सांध्याचे रक्षण करत शरीराच्या खालील बाजूस स्ट्रेंथ निर्माण करण्यास मदत करते.

या व्यायामाचे फायदे

  • क्वाड्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स, चालणे, पायऱ्या चढणे आणि खुर्चीवरून उभे राहणे यासारख्या दैनंदिन हालचालींसाठी वॉल स्क्वॅट्स स्नायूंना स्ट्रेंथ पुरवतात. या वॉल सीटमध्ये भिंतीचा आधार घेतला जातो, ज्यामुळे गुडघ्यांवरील ताण कमी होतो आणि स्नायुंना स्ट्रेंथ मिळते.
  • गुडघ्याचा त्रास असणाऱ्या महिलांसाठी वॉल स्क्वॅट्स गुडघ्याच्या सांध्याभोवतीचे स्नायू मजबूत करतात आणि स्थिरता सुधारतात, ज्यामुळे वेदना कमी होते. ज्या महिलांना फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहेत.
  • स्क्वॅट पोझिशन घेताना शरीराच्या महत्त्वाच्या स्नायूंचा समावेश होतो, ज्यामुळे शरीराचे संतुलन आणि मुद्रा सुधारते. स्नायुंच्या अशक्तपणामुळे वयानुसार पडण्याची भीती जास्त असते, पण या व्यायामाने ते रोखता येते. तसेच पाठीच्या खालील भागातील वेदनासुद्धा कमी होतात.
  • वजन उचलण्याचे व्यायाम हाडाच्या घनतेला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते. ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा आजार आहे, ज्यामुळे तुमची हाडे कमकुवत होतात. वॉल स्क्वॅट्स करताना जास्त ताण येत नाही आणि प्रतिकारशक्ती वाढते , ज्यामुळे हाडांचे आरोग्य दीर्घकाळासाठी सुधारते.
  • वॉल स्क्वॅट्स हा आयसोमेट्रिक व्यायाम असल्याने स्नायूंची क्षमता सुधारते. अधिक काळ या स्थितीत राहिल्याने तग धरण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे दैनंदिन कार्य करणे सोपे जाते आणि थकवा कमी जाणवतो.

हा व्यायाम करताना या टिप्स लक्षात ठेवा :

चंद्रशेखर यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.

तुमची पाठ भिंतीसमोर सपाट ठेवून उभे राहा. पाय खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा.
तुमचे गुडघे आणि नितंब ९० अंश कोनात असतील अशा स्थितीत तुमचे शरीर खाली करा.
अशा स्थितीत ३०-६० सेकंद राहा.
परत उभे राहण्यासाठी तुमच्या पायाच्या टाचांची मदत घ्या.
तीन-चार वेळा हा व्यायाम करा.