Bollywood actress Kriti Sanon : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या फिटनेसमुळे आणि नवनवीन चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अलीकडेच ती डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे सह संस्थापक निखिल कामत यांच्या ‘WTF is with Nikhil Kamath’ या पॉडकास्टवर आली होती. तिच्याबरोबर केएल राहुल आणि रॅपर बादशाहसुद्धा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पॉडकास्टमध्ये क्रितीने सांगितले होते की, जेव्हा ती भावूक होते तेव्हा तिच्याजवळ कोणी व्यक्ती असेल तर तिला रडू येतं. ती म्हणाली, “माझा मूड ऑफ असेल तर मला सहसा लोक जवळ नको असतात. मला थोडा वेळ एकटे रहावे लागते. जर मला त्या दरम्यान बोलायचे असेल आणि तुम्ही तिथे असाल तर मी तुमच्यासमोर रडायला सुरुवात करेन आणि तुम्ही जर ओरडला तर मी शंभर टक्के रडणार.”

स्वत:च्या भावना ओळखणे आणि त्याचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. अशावेळी जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद साधणे गरजेचे असते, पण भावनिक समतोल राखण्यासाठी एकटेपणा कधी अंगीकारावा, हे समजून घेणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : डायबिटीजची औषधे घेणे अचानक बंद केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

कॅडबॅम हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका व वरिष्ठ मानसशास्त्रज्ज्ञ नेहा कॅडबॅम द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “मानसिक आरोग्य जपण्यासाठी भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.”

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे म्हणजेच स्वत:च्या भावनांचा आदर करणे आणि भावनिक आरोग्य सुरक्षित आणि निरोगी ठेवणे होय, असे कॅडबॅम सांगतात.
त्या पुढे सांगतात, “तुम्ही स्वतःला निराशाकडे नेत असाल किंवा अतिसंवेदनशीलता जाणवत असेल, तर तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, याचे हे लक्षण असू शकते.”

मानसिक किंवा भावनिकदृष्ट्या खचल्यासारखे वाटणे, लहान लहान गोष्टींवरून तणाव येणे आणि तो तणावदेखील हाताळू न शकणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे, जे तुम्हाला स्वत:ची काळजी घेण्यासाठी सुचित करते.

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?

विश्रांती आणि स्वत:साठी दिवसभरातून थोडा वेळ काढा. दीर्घ श्वास घेणे, ध्यान करा किंवा तुमच्या मनातील भावना कागदावर उतरवा, यामुळे तुम्हाला भावनिक संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.

कॅडबॅम पुढे सांगतात, “एक सुरक्षित जागा निवडा, जिथे तुम्हाला कोणताही व्यत्यय येणार नाही आणि तुम्ही एकटे वेळ घालवू शकाल. वाचन, लेखन, कला किंवा फक्त विश्रांती यांसारख्या तुम्हाला शांती आणि आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवा.

याशिवाय त्या सांगतात, “नियमित चालणे, व्यायाम करणे किंवा स्वयंपाक करणे इत्यादी गोष्टी तुम्हाला भावनिकदृष्ट्या रिचार्ज करू शकतात.”

हेही वाचा : “तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे आणि भावनिक होणे टाळणे

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे आणि भावूक होणे टाळणे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेणे

भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी घेताना तुम्ही तुमच्या भावनांचा विचार करता. तुम्ही भावूक होण्यामागील कारणे शोधता. स्वत:साठी वेळ काढता. इतरांच्या भावनांचा आदर करत तुम्ही तुमच्या गरजा त्यांना सांगता.

भावनिक होणे टाळणे

भावूक होणे टाळणे म्हणजे अशा संवादापासून दूर राहणे, ज्यामुळे तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते किंवा तुम्ही भावूक होऊ शकता. स्वत:च्या भावना समजून घेण्याऐवजी तुम्ही त्या पळवून लावता, कारण तुम्हाला जाणीव असते की त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

नातेसंबंध जपत एकांताचा आनंद कसा घ्यायचा?

कॅडबॅम सांगतात, “घट्ट नातेसंबंध व एकांताची गरज संतुलित करताना कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. नियमित संवाद साधणे, तुमच्या जोडीदाराला किंवा प्रियजनांना हे कळू द्या की तुम्हाला एकांत कधी आणि का पाहिजे आहे, यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होईल.

खूप जास्त लोकांबरोबर संवाद साधण्यापेक्षा कमी लोकांबरोबर चांगला संवाद साधा. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांशी संवाद साधता त्यावेळी मन स्थिर ठेवा. जसा एकांत आवश्यक आहे, तसे नातेसंबंधसुद्धा आवश्यक आहे. नियमित लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून एखाद्या वेळी कॉफी डेट किंवा कुटुंबाबरोबर फिरायला जा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kriti sanon like do you also feel not wanting people around if your mood is off read how to recognise emotional self care ndj