Neha Dhupia Weight Loss After Pregnancy : बॉलीवूडमधील अभिनेत्री त्यांच्या फिटनेसबाबत खूप सतर्क असतात. नियमित व्यायाम व पोषक आहार याकडे त्या नेहमी लक्ष देतात. प्रसूतीनंतर महिलांचे वजन वाढते; पण या अभिनेत्री प्रसूतीनंतर खूप लवकर वजन कमी करतात. अभिनेत्री नेहा धुपियाने एका मुलाखतीत प्रसूतीनंतर वजन वाढल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला. पहिल्या मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे १७ किलो वजन वाढले होते; पण कोरोनाच्या काळात घरचा अतिरिक्त कॅलरीज नसलेला आहार घेतल्यामुळे सुरुवातीला तिला वजन कमी करणे सोपे गेले. मात्र, दुसऱ्या प्रसूतीनंतर म्हणजेच मुलाच्या जन्मानंतर तिचे वजन २३ किलोने वाढले होते. तेव्हा नेहाने आरोग्याकडे लक्ष दिले आणि वजन कमी केले.

धुपियाने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, “वजन कमी करताना विशेषत: जेव्हा तुमच्यावर सामाजिक दबाव असतो, तेव्हा स्वत:बरोबर नम्र राहणे गरजेचे आहे.” तिने नुकतेच प्रसूतीनंतर वजन कमी केले आणि आता ती पुन्हा फिट दिसतेय.

प्रसूतीनंतर सुरक्षितपणे वजन कसे कमी करायचे याविषयी दी इंडियन एक्सप्रेसने चंदिगडच्या क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल येथील स्त्रीरोग विभागाच्या सहायक संचालिका डॉ. रितंभरा भल्ला यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा : रकुल प्रीत सिंगने तिच्या आईचा चहा बंद केला; ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी चहाचे सेवन खरंच करू नये?

डॉ. भल्ला वजन कमी करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची शिफारस करतात. त्यांच्या मते, तुमचे डॉक्टर तुमच्या आरोग्याविषयी नीट माहिती देऊ शकतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्याशिवाय वजन कमी करण्याचा सुरक्षित आणि प्रभावी मार्ग सुचविण्यास मदत करू शकतात. त्यावरून तुम्हाला कळेल की, तुम्ही वजन कमी करीत असलेला मार्ग सुरक्षित आणि योग्य आहे.

हळूवार वजन कमी करा

खूप जलद गतीने वजन कमी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या शरीरात पोषक घटकांची कमतरता, स्नायू कमकुवत होणे आदी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. भल्ला दर आठवड्याला ०.५ ते १ किलो वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा सल्ला देतात. हळुवार पद्धतीने वजन कमी केले, तर शरीर निरोगी राखण्यास मदत होते.

शारीरिक हालचाली करा

शारीरिक हालचाली या वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. प्रसुतूनंतर व्यायाम सुरू करा. शरीरास फायदेशीर असलेला योगा आणि चालणे इत्यादी गोष्टी हळूहळू तुमची शारीरिक क्षमता वाढवितात. स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्हाला स्नायू मजबूत करण्यास मदत करू शकते त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारेल आणि वजन कमी करण्यात मदत होईल. तुमच्या शरीराचे ऐका आणि अतिरिक्त व्यायाम करू नका.

हेही वाचा : Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात केस का गळतात? तेलाच्या वापराने ही केस गळती रोखता येऊ शकते का? वाचा डॉक्टरांचा सल्ला

आराम व पुरेशी झोप आवश्यक

आराम आणि झोपेला कमी महत्त्व देऊ नका. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा तुमचे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे तुम्हाला सतत भूक लागणे किंवा अति खाण्याची इच्छा होऊ शकते. शक्य होईल तेव्हा झोपेला प्राधान्य द्या. पुरेशी विश्रांती घेणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

तणावमुक्त राहा

प्रसूतीनंतर तणाव घेऊ नका. तणावामुळे जर तुमचे वजन कमी होत असेल, तर ते आरोग्यास चांगले नाही. डॉ. भल्ला यांच्या मते, प्रसूतीनंतर वजन कमी करताना चांगली ध्येये निश्चित करा आणि संयम बाळगा. प्रेरणा मिळविण्यासाठी आणि भावनिक सलोखा जपण्यासाठी कुटुंब व मित्र-मैत्रिणींबरोबर संवाद साधा. शांत मनाने ध्यान करा किंवा तणावमुक्त करणाऱ्या तंत्रांचा वापर करा.