Shilpa Shirodkar Weight Loss Journey : बिग बॉसच्या १८ व्या सीजनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ९० च्या दशकात या लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आपले अधिराज्य गाजवले. नुकतेच शिल्पाने वजन कमी केले. तिने फक्त तीन महिन्यांत १३ ते १४ किलो वजन कमी केले आणि तिला पूर्वीपेक्षा आता जास्त उत्साही असल्यासारखे वाटतेय.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले, “मला खूप छान वाटतेय. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, अरे, तू किती बारीक झाली आहेस! “

तिने वजन कमी करण्याचे हे श्रेय बिग बॉसचा स्पर्धक अविनाश मिश्रा याला दिले आहे. बिग बॉसच्या घरात असताना, ती जेव्हा तुरुंगात होती तेव्हा तिला जेवण खूप कमी मिळायचे आणि त्यामुळे नकळत तिचे वजन कमी झाले. ती सांगते, “मला वाटते की, माझ्यासाठी ही सुरुवात होती. अविनाशचे मी यासाठी नेहमीच आभार मानेन.”
वजन कमी केल्यानंतर तिच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती, याविषयी विचारले असता, तिने सांगितले, “मी इतके वजन कमी करू शकले, हे पाहून ते खूप आनंदी आहेत; पण त्याचबरोबर मी चांगली दिसतेय याचा त्यांना जास्त आनंद आहे.”

शिल्पा एक ठरावीक आहार घेते. तिचे जेवणाचे प्रमाण मर्यादित आहे आणि ती दिवसातून एक किंवा दोन वेळा जेवण करते. खूप लवकर वजन कमी करणे आणि आहारात खूप जास्त बदल करणे हे एक मोठे आव्हान आहे.

जेवणाचे प्रमाण कमी केल्याने चयापचयावर कसा परिणाम होतो?

बंगळुरूच्या टोन३० पिलेट्स येथील वरिष्ठ न्युट्रिशनिस्ट आश्लेषा जोशी (Ashlesha Joshi) सांगतात, “जेवणाचे प्रमाण कमी केल्याने कॅलरीज कमी होतात आणि त्यामुळे लवकर वजन कमी होऊ शकते. जेव्हा शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी ऊर्जा मिळते तेव्हा शरीराची चयापचय क्रिया मंदावते.”

चयापचय क्रिया मंदावल्याने आपण जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा कॅलरीज कमी होण्याचे प्रमाणसुद्धा मंदावते, ज्यामुळे वजन कमी करणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. त्याशिवाय जेवण जास्त प्रमाणात कमी केल्याने स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि चयापचय क्रिया आणखी बिघडते. दीर्घकाळासाठी वजन कमी करण्यासाठी जेवणाचे प्रमाण कमी करण्याऐवजी संतुलित पोषक आहार आणि नियमित शारीरिक हालचालींवर भर द्या, ज्यामुळे हळूहळू कॅलरीज कमी होतील.

कॅलरीज कमी करण्याचा उद्देश समजून घ्या

कॅलरीज कमी करणे ही एक जाणीवपूर्वक आणि नियंत्रित प्रक्रिया आहे. शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करून, हळूहळू वजन कमी करणे आहे हा कॅलरीज कमी करण्याचा योग्य उद्देश ठरू शकतो. जोशी सांगतात “प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि एकूण आरोग्य, ऊर्जा पातळी व स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकांचे संतुलित सेवन करणे गरजेचे आहे.”

जेव्हा शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अन्नाचे सेवन खूपच कमी होते तेव्हा नकळत तुम्ही उपाशी राहता, ज्यामुळे पोषक घटकांची कमतरता व थकवा जाणवतो. रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. त्या पुढे सांगतात, “अन्नाचे प्रमाण आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कॅलरीज कमी करताना शरीराला आवश्यक पौष्टिक घटक कमी होत नाहीत ना, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.”

ऊर्जेची पातळी राखा आणि वजन कमी करा

“कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन हळूहळू कमी केल्याने वजन कमी करता येते आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासही मदत होऊ शकते,” असे जोशी पुढे सांगतात.
स्नायूंचे आरोग्य जपण्यासाठी चिकन, मासे, शेंगा व टोफू यांसारखे लीन प्रोटीन स्रोत फायदेशीर ठरू शकतात. तसेच, स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायामाचा समावेश केल्याने स्नायूंचे आरोग्य आणि चयापचय प्रक्रिया आणखी सुधारू शकते. त्याशिवाय आहारात धान्ये, फळे व भाज्या आणि चांगल्या फॅट्स समावेश केल्याने शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात आणि शरीराची ऊर्जा पातळी राखण्यासही मदत होते, असे त्यांचे म्हणणे आहे.