Sonakshi Sinha’s Inspiring Fitness Journey: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेकदा तिच्या फिटनेसविषयी बोलताना दिसते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि फिटनेस प्रवास कसा सुरू झाला, याविषयी सांगितले. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीत ती सांगते, “हे सगळं मी १८ वर्षांची असताना सुरू केलं. मी त्यावेळी कॉलेजमध्ये होते आणि मी पहिल्यांदा जिमला जायला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये, त्या वयात सगळेच जिमला जातात. मीही जिममध्ये गेली, ट्रेडमिल सुरू केलं. ३० सेकंद धावले आणि माझी अवस्था खूप खराब झाली. तेव्हा मला जाणवलं की मी यासाठी खूप लहान आहे. १८ वर्षांची असताना मला अशा प्रकारे धाप लागू शकत नाही आणि तेव्हा माझा प्रवास सुरू झाला.”

चांगल्या फिटनेससाठी सुरुवातीच्या काळात करावा लागलेला संघर्ष ते बॉलीवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्रींपैकी एक होण्यापर्यंतचा सोनाक्षीचा प्रवास एका रात्रीचा नव्हता. वजन कमी करणे याकडे अनेकदा शरीरात करण्यात आलेला बदल म्हणून पाहिले जाते; पण त्यासाठी आत्म-जागरूकता आणि प्रेरणा किती महत्त्वाची आहे, हे सोनाक्षीच्या अनुभवातून दिसून येते.

सुरुवातीच्या काळात फिटनेस ध्येय कसे निवडावे?

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील बॅरिॲट्रिक आणि अॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन (bariatric and advanced laparoscopic surgeon) डॉ. केदार पाटील दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “फिटनेस प्रवास सुरू करण्यापूर्वी एखाद्याच्या सध्याची फिटनेस लेव्हल कशी आहे, याचं मूल्यांकन करणं महत्त्वाचं आहे. एखादा साधा व्यायाम लक्ष केंद्रित करण्यासाठी निश्चित मदत करू शकतो. उदा. मध्यम गतीनं ६-१० मिनिटं चालणं, पायऱ्या चढणं इत्यादी गोष्टींवरून आपण फिटनेस लेव्हल ओळखू शकतो. एकदा एखादी व्यक्ती या गोष्टी करू लागली की, त्यावरून सांध्यातील समस्या, लवचिकता (flexibility) व गतिशीलता (mobility) यांचं मूल्यांकन करण्यास मदत होते. या मूल्यांकनाच्या आधारे एखादी व्यक्ती वजन कमी करणं, स्नायू मजबूत करणं किंवा सहनशक्ती सुधारणं यावर लक्ष केंद्रित करायचं की नाही हे ठरवू शकते.”

सीएमआरआय कोलकाताच्या इंटर्नल मेडिसिनचे डॉ. सुमन मित्रा सांगतात, “फिटनेस ही बाब केवळ शारीरिक आरोग्याबद्दलच नाही, तर मानसिक आरोग्याविषयी आणि चयापचय क्रिया सुरळीत असण्याबद्दलही सूचित करते. वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन एक दृष्टिकोन ठरविणं गरजेचं आहे. मग तो वजन कमी करणं असो किंवा स्नायू मजबूत करणं असो. लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या परिस्थितींमध्ये वजन कमी केल्यानं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते आणि शरीराचं एकूण कार्य सुधारतं.”

स्नायूंची सहनशक्ती आणि बळकटपणा हृदयरोग असलेल्या लोकांना फायदेशीर ठरतो. तसेच वजन कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी फायदेशीर ठरतो. बीएमआय, रक्तदाब, मूत्रपिंडाचे कार्य, थायरॉईडची पातळी व मधुमेह तपासणी यावरून आरोग्य कसे आहे, हे जाणून घेता येते. “दीर्घकाळ चांगल्या फिटनेससाठी ठरविलेली ध्येयं ही वैयक्तिक आवडी-निवडीशी जुळली पाहिजेत, तेव्हाच तुम्ही ते दीर्घकाळ फॉलो करू शकता. चुकीची माहिती टाळण्यासाठी आणि चांगले परिणाम मिळविण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे”, असे डॉ. मित्रा सांगतात.

“फिटनेसमध्ये सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणींवर मात करा”

“फिटनेसवर काम करताना मुख्य म्हणजे मानसिक अडथळा येतो. मग अशा वेळी लोकांना ज्या गोष्टी करण्याची इच्छा असते, त्या गोष्टी ते करू इच्छित नाहीत. अशा वेळी सहसा आम्ही आवडीच्या गोष्टी करा, असे सांगून प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ते आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि सहनशक्ती वाढवतात” असे डॉ. मित्रा स्पष्ट करतात.

जर तुम्हाला सवय नसेल आणि तुम्ही पहिल्याच दिवशी तीव्र प्रकारचा व्यायाम करीत असाल, तर दुखापत होऊ शकते, असे डॉ. पाटील सांगतात. दुखापत टाळण्यासाठी आणि सातत्य सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला जे व्यायाम येतात, ते करण्याचा प्रयत्न करा. दुखापत टाळण्यासाठी अनुभवी फिजिओथेरपिस्ट किंवा स्पोर्ट्स मेडिसिन सल्लागाराकडे व्यायाम शिका.

काही दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले व्यायाम व्यक्तीला आत्मविश्वास मिळविण्यास मदत करू शकतात आणि नंतर ते घरी करू शकतात. त्याशिवाय बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की, केवळ जिममध्ये सहभागी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते; पण वजन उचलणे, लवचिक व्यायाम आणि चालणे या बाबी फिटनेसच्या सुरुवातीच्या टप्प्यात फायदेशीर ठरू शकतात.

Story img Loader