लाखो लहान मुले दुधात कॅडबरी बोर्नविटा टाकून आवडीने पितात. पण हा बोर्नविटा एका सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलाच वादात सापडला आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर रेवंत हिमतसिंग्का याच्या एका व्हिडीओमुळे या वादाला सुरुवात झाली, त्याने एका व्हिडीओमध्ये दावा केला की, बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, यामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने रेवंत हिमतसिंग्काला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या कारवाईनंतर रेवंतने हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला आहे. पण या घटनेनंतर बाजारात सहज उपलब्ध असलेल्या हेल्थ पावडर ड्रिंक्सवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या ड्रिंक्समधील साखरेमुळे लहान मुले लवकर मधुमेहाचे शिकार होत असल्याचा धोका व्यक्त होत आहे. हे फक्त बोर्नविटाबद्दलच नाही तर बाजारात विविध ब्रॅण्ड्सच्या अनेक हेल्थ पावडरबद्दल बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुतांश हेल्थ पावडर ड्रिंक्स फोर्टिफाइड फूड्स म्हणून विकल्या जातात, ज्यामुळे मुलाची वाढ आणि विकास होतो असे सांगितले जाते. पण कंपन्यांचा दावा कितपत खरा आहे याबाबतही संभ्रम आहे.

लहान मुलांना हेल्थ फूड सप्लिमेंटची गरज असते, असा एक समज निर्माण केला जात आहे. हे सप्लिमेंट एकदा खाल्ल्यानंतर लहान मुलांना सतत ते खाण्याची सवय लागते. कारण या प्रोडक्ट्सची चवच या प्रकारची असते, जी आपली खाण्याची ओढ वाढवते. यावर बेंगळुरुमधील मणिपाल हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ आणि बालरोग एण्डोक्राइनोलॉजी आणि सल्लागार डॉ. सुरुची गोयल अग्रवाल यांनी सांगितले की, सर्व नैसर्गिक पदार्थांमध्ये काही प्रमाणात साखर असते, मग ते फळ असो, भाज्या असोत, तृणधान्ये असोत की दूध असो. ही नैसर्गिकरीत्या मिळणारी साखर आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असते. यामुळे प्रक्रिया केलेली साखरेची शरीरास कोणतीच गरज नसते, ही साखर फक्त तुमच्या सिस्टमला ओव्हरलोड करू शकते. अनेकांना दुधात, दह्यात, किंवा कोणत्याही पदार्थात साखर घालून पिण्याची सवय असते परंतु यातून आपण फक्त शरीराचे प्रमाण अधिक वाढवीत असतो हे लक्षात ठेवा. यामुळे तुमच्या मुलांनाही अशा प्रकारे अतिरिक्त साखर खाण्याची सवय लागते.

लहान मुलांना पॅकेज केलेले धान्य, फिजी ड्रिंक्स, दुकानातील शेल्फ मध, मॅपल सीरप आणि बाटलीतील फळांचा रस पिण्याची सवय असते. यात साखरेचे प्रमाण आणि कॅलरींचा स्तर भिन्न असतो. काही प्रोटीन पावडरमध्ये साखर कमी असते आणि इतरांमध्ये भरपूर असते. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या मते, अमेरिकेतील काही प्रोटीन पावडरमुळे एक ग्लास दुधाचे १२०० पेक्षा जास्त कॅलरींमध्ये रूपांतर होत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याने त्यांना अस्वस्थता जाणवते.

तुमच्या मुलांना साखरेची गरज असते का?

बाळांना सहा महिन्यांपासून आईचे दूध किंवा फॉर्म्युला फूडमधून (ज्यांच्या माता पुरेसे स्तन दूध देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी) पुरेशी साखर मिळते. त्या वेळी मातांनी उकडलेल्या किंवा शिजवलेल्या भाजा, फळे खायला हवीत. रवा, नाचणी, बाजरी आणि तांदुळाचा आहारात समावेश करायला हवा. खरे तर, दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना अतिरिक्त साखरेची गरज नाही. सात ते दहा वर्षे वयोगटातील एका मुलास एका दिवसात २४ ग्रॅम साखर विविध आहारातून मिळते. हे प्रमाण म्हणजे संपूर्ण दिवसात सुमारे पाच लहान साखरेच्या गोळ्यांइतके असते. किशोरवयीन अवस्थेपासून ते प्रौढावस्थेपर्यंत कोणीही दररोज २६ ते ३० ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. यात लहान मुलांनाही जेवणातून आणि स्नॅक्समधून पुरेशी साखर मिळत असते, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त साखरेची किंवा कोणत्याही हेल्थ सप्लिमेंटची गरज नसते. जर आहार संतुलित असेल तर बाळाला कोणत्याही अतिरिक्त सप्लिमेंट किंवा साखरेची अजिबात गरज भासणार नाही.

हेल्थ पावडरचा स्कूप म्हणजे काय?

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या एण्डोक्राइनोलॉजी आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. ऋचा चतुर्वेदी यांच्या मते, बोर्नविटासारख्या हेल्थ पावडर ड्रिंक्सचा एक स्कूप म्हणजे एक ठरावीक लिटरच्या बाटलीमध्ये टाकण्याचे प्रमाण. या एका स्कूपनुसार तुम्हाला पाणी किंवा दूध जे काही नमूद केले असेल ते घ्यावे लागते. या एका स्कूपमध्ये सात ते आठ ग्रॅम साखर असते, हे प्रमाण सुमारे दीड चमचे साखर असे असते. आजकालच्या मुलांची बैठी जीवनशैली आहे. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली खूप कमी होतात. तसेच दिवसभर घरी शिजवलेल्या स्टेपल्सपेक्षा जास्त कॅलरीयुक्त पदार्थ आणि स्नॅक्स खातात. या पदार्थांमुळे फक्त मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत आहे. टाइप-१ मधुमेह हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, त्यामुळे मुलांना त्याचा तितकासा त्रास होत नाही. पण चिंतेची गोष्ट अशी आहे की, अतिरिक्त फ्लेवर्स आणि साखर खाण्याच्या सवयीमुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतोय.

लहान मुलांना हेल्थ पावडरची गरज असते का?

खरं तर, डॉ. अग्रवाल यांनी, पालकांना त्यांच्या मुलांना सकस आहार देण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा वाढता धोका लक्षात घेता त्यांनी हेल्थ पाडवर न देण्याचाही सल्ला दिला आहे. कारण मानवी शरीराला नैसर्गिकरीत्या फळांपासून पुरेशी साखर मिळते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी इतक्या तीव्रपणे वाढवत नाही जितकी या हेल्थ पावडरमुळे वाढते. याशिवाय फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, यामुळे वजन वाढते, पचनक्रिया मंदावते आणि रक्तप्रवाहात ग्लुकोज सोडण्यास विलंब होतो. दुधात लेटेंट शुगर असते आणि त्यात इतर कोणच्या सारखेची गरज नसते. जर तुमची मुले दररोज फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात खात असतील तर त्यांना अतिरिक्त साखरेची गरज नसते. यात तुम्ही साखर न वापरता घरच्या घरी फ्रूट शेक बनवू शकता. खरे तर, दोन वर्षांखालील मुलांना पालकांनी गूळ, पाम शुगर, मध किंवा ब्राऊन शुगरची सवय लावू नका.

तसेच डॉक्टरांकडून फूड लेबल्स योग्यरीत्या वाचण्याचा सल्ला दिला जातो, कारण सर्व लेबल्सवर सांगितले जाते की, यात साखर नाही, कोणताही पदार्थ आणि कोणताही रंग मिसळलेला नाही. परंतु आपण जार किंवा कॅनमध्ये प्रति १०० ग्रॅम स्टॅक केलेल्या प्रत्येक घटकातील कार्बोहायड्रेट घटक पाहायला हवेत, यावरून तुम्हाला तुमचा दैनंदिन कार्बोहायड्रेट भत्ता किती ओव्हरलोड होतोय याचा अंदाज येईल.

डॉ. चतुर्वेदी म्हणतात की, प्रत्येक मुलाला किती कॅलरीची गरज असते हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ज्ञ किंवा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ते तपासणी केल्यानंतर काही सप्लिमेंट्सची शिफारस करतात. पण ते औषध म्हणून तुम्हाला सप्लिमेंटचा पर्याय देतात, सवय बनवण्यासाठी नाही. यात लठ्ठपणा आणि टाइप-२ मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या पालकांनी मुलांना कोणत्याही प्रकारचे हेल्थ पावडर ड्रिंक्स न देणेच योग्य आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bournvita row are health powder drinks making your child prone to diabetes flavour addicts sjr
Show comments