नवी दिल्ली : न्याहरी ही भारतीय आहार पद्धतीचा भाग नाही, असे काही जण सांगतात. तर, आधुनिक आहार पद्धतीत न्याहरीला खूप महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील संशोधकांनी महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. यानुसार वारंवार न्याहरी टाळल्यास यकृत, पित्ताशय आदी कर्करोगाचा धोका वाढतो.
‘जर्नल ऑफ इंटरनॅशनल मेडिसीन’मध्ये यासंबंधी संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात ६२ हजार ७४६ स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व चीनचे नागरिक होते. त्याच्या प्रकृतीवर तब्बल साडेपाच वर्षे लक्ष ठेवण्यात आले. यामधील न्याहरी न करणाऱ्या ३६९ जणांना कर्करोग झाला.
हेही वाचा >>> सर्दी-तापासह किरकोळ आजारासाठी अँटीबायोटिक्स घेणे थांबवा; मनाप्रमाणे औषधांचा वापर करणे ठरू शकते धोकादायक! कारण…
संशोधकांनी सांगितले की, नियमित न्याहरी करणाऱ्यांच्या तुलनेत आठवडय़ातील एक किंवा दोन वेळा न्याहरी करणाऱ्या व्यक्तींना अडीच पटीने कर्करोग होण्याचा धोका असतो.
या संदर्भात भारतीय तज्ज्ञ, डॉक्टरांनी सांगितले की, न्याहरीबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. मात्र, लहान मुलांसाठी न्याहरीची आवश्यकता असते. दरम्यान, काही भारतीय आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीय आहारपद्धतीत न्याहरी नाही. यामध्ये दोन वेळचे जेवण महत्त्वाचे आहे.