आरोग्य उत्तम राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी बहुतेक जण चालण्यासारख्या अतिशय सोप्या व्यायाम प्रकाराची निवड करतात. मात्र, अनेकांना माहीत नसते की, चालण्याचा व्यायाम करताना हृदयाचे ठोके वाढणे किंवा चालताना अस्वस्थता जाणवत असल्यास या लहान-लहान गोष्टी हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जर हृदयाचे ठोके अधिक काळ जलद गतीने पडत असल्यास, ही गोष्ट वरचेवर होणे आणि छातीती दुखणे त्याचबरोबर मळमळणे, श्वास लागणे, घाम येणे आणि चिंता वाढणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
तुम्ही चालण्याचा व्यायाम करताना जाणवणाऱ्या विविध लक्षणांमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे हे समजण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असल्यास त्याचे ते संकेत असल्याचे समजू शकतो. अशावेळेस कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे याबद्दल हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर टी. एस. क्लेर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेली माहिती पाहू.
चालण्याचा व्यायाम करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
व्यक्तीला छातीत विशेषतः स्टर्नम [sternum], छातीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस, डावा हात किंवा उजवा हात, जबडा, स्कॅपुला आणि पाठ यांमध्ये वेदना जाणवणे, हृदयाच्या धडधडीच्या वेगात अस्थिरता किंवा चालण्यात घट्टपणा/ स्टिफनेस अशा प्रकारच्या समस्या जाणवत असल्यास त्यांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. या सर्व समस्या जर तुम्ही चालणे थांबवल्यानंतर नाहिशा होत असतील तर व्यक्तीला हृदयातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ शकण्याची ही लक्षणे असू शकतात.
परंतु, तुम्ही ब्रिस्क वॉकिंग कोणत्याही प्रकारच्या छातीच्या दुखण्याशिवाय, हृदयाच्या ठोक्यांमध्ये किंवा श्वास घेण्यास त्रास न होता करू शकत असल्यास, तुमचे हृदय चांगल्याप्रकारे तुमच्या शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करत आहे, असे समजते.
हृदयाचे ठोके अचानक वाढू लागण्याचा अर्थ काय? [What to make of palpitations]
काही वेळा व्यक्तीला पालपिटेशन [palpitations], हृदयाचे ठोके वाढणे, चालण्यासारखी साधी हालचाल केल्याने धडधड तीव्र होणे यासारखे त्रास होऊ शकतात. हे त्रास होण्यामागे तुमची बैठी जीवनशैली असल्याने शरीराने व्यायाम अजून आत्मसात केला नाही असे एक कारण असू शकते. परिणामासाठी व्यक्तीचे हृदय अधिक / वेगाने काम करते किंवा पालपिटेशनचे दुसरे कारण हे हृदयाची महाधमनी झडप [aortic valve] अरुंद होणे हे असू शकते. अशा वेळेस एखाद्या तंदुरुस्त आणि सक्रिय व्यक्तीलादेखील हृदयाची धडधड वाढणे, थोडे अंतर चालण्यास दम लागण्यासारख्या गोष्टींचा त्रास उद्भवू शकतो. कदाचित, आरोग्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचेदेखील या लक्षणांवरून अर्थ लावता येऊ शकतो.
हेही वाचा : भेसळयुक्त खाद्यतेलाचे आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात? पाहा काय सांगतात डॉक्टर….
वरील चिन्हे दिसल्यावर काय करावे?
वरील लक्षणे व्यक्तीला जाणवत असल्यास, व्यक्तीने ही लक्षणे थांबण्याचा किंवा कालांतराने नाहिशी होण्याची वाट न बघता ताबडतोब हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांशी चर्चा करावी, असे डॉक्टर टी. एस. क्लेर यांचे मत आहे. तसेच, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार इलेक्ट्रोकार्डियोग्राम, होल्टर मॉनिटरिंग, इकोकार्डियोग्राम किंवा सीटी स्कॅनसारख्या चाचण्या करून घ्याव्यात. एकदा निदान किंवा हृदयासंबंधी समस्या लक्षात आल्यानंतर हृदयरोगतज्ज्ञ योग्य ते मार्गदर्शन करतील. त्यानंतरच डॉक्टरांच्या सांगण्यावरून व्यक्तीने पुन्हा व्यायामास सुरुवात करावी, असे डॉक्टर क्लेर यांचे म्हणणे असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.