How to Stop Alcohol Cravings : यूएसस्थित उद्योजक ब्रायन जॉन्सन हे वृद्धत्व रोखण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी बायोहॅकिंगला पाठिंबा देतात. अलीकडेच त्यांनी दारूच्या व्यसनाविषयीचे त्यांचे स्पष्ट विचार शेअर केले. जॉन्सन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करीत, दारूला एक सांस्कृतिक परंपरेचे लेबल लावण्यात आले. त्यामुळे दारू स्वीकार्य मानली गेली.

दारूच्या सेवनाविषयी जॉन्सन यांना त्यांचे मत विचारले असता, ते म्हणाले, “मला वाटते की, आमच्या संस्कृतीत हे एक आदर्श मानले जाते. त्यामुळे आम्ही आता विचार न करता, दारूचे सेवन करतो; पण ते विष आहे आणि शरीरासाठी हानिकारक आहे. पण, स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी आणि आरामदायी अनुभव देण्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की, त्यासाठी दारूच प्यायली पाहिजे.

दरम्यान, दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एमपॉवर हेल्पलाइन, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ रिमा भांडेकर यांनी दारू पिण्याची लालसा नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते निरोगी पर्याय अमलात आणता येऊ शकतात यावर भाष्य केलं.

मानसशास्त्रज्ञ रिमा भांडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या कार्यक्रमांत मद्यपानापासून दूर राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्याला फायदा होतो. लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यावर आणि आराम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते. दारूशिवाय चांगला वेळ घालवण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांशी बोला, आठवणी शेअर करा, छंद वा आवड जोपासा, भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करीत त्याविषयी चर्चा करा.

मानसशास्त्रज्ञ रिमा भांडेकर यांच्या मते, कार्ड गेम, ग्रुप फोटो किंवा ग्रुप डिस्कशन, अॅक्टिव्हिटी यांसारख्या गोष्टींद्वारे तुम्ही दारू पिण्याची लालसा कमी करू शकता. कारण- या गोष्टींमध्ये तुम्ही मन रमवता तेव्हा तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही.

अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात

भांडेकर यांनी असेही सांगितले की, जर तुम्हाला ग्रुपमध्ये असताना काही प्यायचेच असेल, तर मॉकटेल आणि पारंपरिक पेये यांपैकी पेय निवडा. त्यानंतर आरोग्यदायी नाश्ता आणि जेवणाचा आस्वाद घ्या. त्यामुळे तुम्ही मद्यपान करण्यापासून दूर राहत लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता. त्यातही अशा लोकांबरोबर राहा; जे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर सामाजिक भान राखत दारूला हात लावत नाहीत. साहजिकच त्यामुळे तुम्हालाही त्यांच्याबरोबर असताना दारू पिण्याची इच्छा होणार नाही.

दारू पिण्याची लालसा कमी करणे आव्हानात्मक असू शकते; पण भांडेकर यांच्या मते- तुम्ही मनोवैज्ञानिक तंत्राच्या मदतीने ही गोष्ट साध्य करू शकता.

दारू पिण्याची लालसा कमी करण्यासाठी ‘या’ मनोवैज्ञानिक गोष्टींचा आधार घ्या

१) तुमचा दृष्टिकोन बदला : मजेसाठी दारू आवश्यक आहे, असा विचार करणे सोडून द्या. त्याऐवजी तुम्ही मी दारूशिवायही चांगला वेळ घालवू शकतो, मजा करू शकतो, असा विचार करा.

२) फिटनेस सुधारण्याबाबत विचार करा : दारूपासून कसे दूर राहता येईल यावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी कुठल्याही कार्यक्रमाला जाताना किंवा तिथून येताना मी दारू पिणार नाही, असा विचार करा. मनात सुरू असलेले सर्व विचार बाजूला सारा; ज्यामुळे तुमचा तणाव कमी होईल. त्यासाठी तुम्ही तुमच्या फिटनेसकडे कसे लक्ष देऊ शकता, मिळालेला वेळ व्यायामावर कशा रीतीने खर्च करू शकता याचा विचार करा.

३) आत्मविश्वासपूर्वक नाही म्हणायला शिका : स्वत:साठी काही मर्यादा आखून घ्या. कुठेही दारू पिण्याविषयी काही संभाषण सुरू असेल आणि तुमच्यावर कोणी कितीही दबाव आणला तरी आत्मविश्वासाने नाही म्हणायला शिका.

४) सकारात्मक स्वसंवाद साधा : सामाजिक जीवनात आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘मी स्वतः दारूशिवाय इतरांबरोबर राहू शकतो’ आणि ‘मी दारूशिवाय दबावाचा सामना करू शकतो’ यांसारख्या गोष्टी मनाला पटवून द्या.

५) अस्वस्थतेमागील कारणांचा विचार करा : दारूला नाही म्हणणे कशामुळे कठीण होते याचा विचार करा. त्यात नाकारण्याची भीती, चिंता किंवा कौटुंबिक इतिहास अशा गोष्टींचा समावेश असू शकतो. तुम्ही कोणत्या कारणामुळे दारू पिता हे आधी समजून घ्या. अशा प्रकारे कारण समजून घेतल्याने तुम्हीच असा विचार करा की, ‘या नकारात्मक गोष्टी’ दारू पिऊन दूर होणार आहेत का? अशा प्रकारे नीट विचार करून सर्व गोष्टी केल्यास तुमची दारू पिण्याची इच्छा काही प्रमाणात का होईना कमी करण्यास मदत होईल.

Story img Loader