Drinking Bullet Coffee Potential Risks : आपल्यातील अनेक जण चहा किंवा काही कॉफीप्रेमीसुद्धा आहेत. कोणाची चहाचे सेवन केल्याशिवाय झोप उडत नाही, तर कोणाला दिवसातून दोन ते तीन वेळा कॉफीचे सेवन केल्याशिवाय जमत नाही. सध्या विविध कॅफेमध्ये कॅपुचिनो, लाटे, गरम कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी असे कॉफीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पण, सध्या बुलेट कॉफीसुद्धा (Bullet Coffee) बरीच चर्चेत आहे. सेलिब्रिटींमध्ये या कॉफीची बरीच क्रेझ पाहायला मिळते आहे, ज्याला प्री-वर्कआउट ड्रिंक म्हणून अनेकदा ओळखले जाते. तर सकाळी ऊर्जा वाढवणारी ही बुलेट कॉफी मधुमेह (डायबेटीस) असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली आहे आणि ट्रेंडी पेय किंवा कॉफी (Bullet Coffee) दिनक्रमात समाविष्ट करण्याआधी डायबेटीस असणाऱ्यांना त्यामुळे कोणते धोके उद्भवू शकतात आणि त्यांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे समजून घेतले.

कमल मेडिकल केअर फिजिशियन ॲण्ड एस्थेटिक क्लिनिकचे पीजीपी (डायबेटोलॉजी) सल्लागार फिजिशियन डॉक्टर कमलजीत सिंग कैंथ (Kamaljit Singh Kainth) म्हणाले की, बुलेट कॉफी, ज्याला बटर कॉफीदेखील म्हणतात. हे एक हाय फॅट्स आणि कमी कार्ब असलेले पेय आहे. ही मीठ नसलेले बटर (unsalted butter) व मीडियम चेन ट्रायग्लिसराइड (MCT) तेलासह कॉफीचे मिश्रण करून बनवले जाते. केटोजेनिक आहाराचे (ketogenic diets) पालन करणाऱ्या बहुतांशी व्यक्ती या कॉफीचे सेवन करतात. बुलेट कॉफी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी ठेवून ऊर्जा वाढवण्याचे काम करते.

डॉक्टर म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी याची शिफारस करण्यात आलेली नाही. कारण- बुलेट कॉफीमधील (Bullet Coffee) हाय फॅट्स कन्टेन्ट रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकते; विशेषतः जर तुम्ही कर्बोदकांमधे कमी घेत असाल. पण, बुलेट कॉफीमधील बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे चिंता निर्माण होते. विशेषत: जर तुम्हाला आधीच हृदयाशी संबंधित समस्या असतील, तर मधुमेह असणाऱ्यांच्या बाबतीत ही एक सामान्य समस्या आहे. त्यांनी असेही सांगितले की, बुलेट कॉफी मायक्रोव्हस्क्युलर, मॅक्रोव्हस्क्युलर व ब्लॉकेजेसची शक्यता वाढवू शकते.

ल्युसीन रिच बायोचे सह-संस्थापक व संचालक डॉ. देबोज्योती धर (Debojyoti Dhar) यांनी सांगितले की, बुलेट कॉफीमधील (Bullet Coffee) मुख्य घटक असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्या मधुमेही रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण- त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा ट्रेंडवर दीर्घकालीन विसंबून न राहण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

बुलेट कॉफी हा संपूर्ण नाश्ता नाही…

तसेच तज्ज्ञ म्हणाले की, मधुमेहींसाठी बुलेट कॉफीच्या सेवनाच्या मुख्य तोटा हा वजन वाढणे, अस्वास्थ्यकर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे आणि संतुलित आहाराची जागा घेतल्यास पोषक घटकांची कमतरता यांचा समावेश होतो. त्यांनी असेही म्हटले आहे की, बुलेट कॉफी हा संपूर्ण नाश्ता नाही. त्यामुळे इतर खाद्यपदार्थांसह आहाराचा समतोल न साधल्यास तुम्हाला आवश्यक पोषक घटकांची कमतरता भासू शकते.

जर तुम्हाला डायबेटीस असेल आणि बुलेट कॉफी पिण्याचा तुम्ही विचार करीत असाल, तर डॉक्टर धर यांनी सांगितले की, तुम्ही याबाबत प्रथम तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि तुम्ही योग्य आहार घेत आहात याची खात्री करून घ्या. सुरुवातीला या कॉफीचे अगदी थोड्या प्रमाणात सेवन करा आणि तुमचे शरीर या सेवनाला कसा प्रतिसाद देते ते बघा.

Story img Loader