Heartburn vs Heart Attack: अनेकदा असं होतं की, लोकांना छातीत तीव्र कळ येते, हात दुखू लागतात, मान आखडल्यासारखे वाटते.. अशावेळी भीतीने घामाघूम होऊन ते डॉक्टरकडे धाव घेतात पण तिथे गेल्यावर कळतं की ही तर नुसती ऍसिडिटी होती आणि हार्टबर्न म्हणजेच छातीत जळजळ वाढल्याने त्यांना वेदना होत आहेत. अशी एखादी घटना घडल्यावर अशा व्यक्ती निर्धास्त होतात पण दरवेळी तुम्हाला होणाऱ्या वेदना या ऍसिडिटीमुळेच असतील असे नाही. आज आपण मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कार्डियोलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार हार्टबर्न व हृदय विकाराचा झटका येण्यातील नेमका फरक व लक्षणं जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. भागवत सांगतात की अनेकदा नुसती जळजळ व गंभीर धोका यातील फरक वेळीच न ओळखल्याने अनेक रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीयांचे जेवण हे पचायला थोडे जड असते आणि त्यातही अवेळी खाण्याच्या सवयीनमुळे ऍसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न होऊच शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा त्रास बहुसंख्य लोकांना जाणवतो. पण अशावेळी दुर्लक्ष करणे सुद्धा जीवावर बेतू शकते. कारण अनेकदा हार्टबर्न म्हणजेच हृदयविकाराचा झटका असं नसलं तरी ही हार्टअटॅक येण्याची पहिली पायरी असू शकते.

हार्टबर्न हे हृदयविकाराचे लक्षण कसे असू शकते?

हृदयविकाराचा झटका येताना डाव्या हातामध्ये किंवा छातीच्या डाव्या भागात वेदना होऊ लागतात. पण काही अपवादाच्या वेळी तुम्हाला धडाच्या वरील भागात कोणत्याही बाजूला वेदना होऊ शकतात. पाठ, मान, जबडा, दात, खांदा आणि स्तनाच्या भागात सुद्धा यामुळे वेदना जाणवू शकतात. कधीकधी हृदयविकाराचा झटका येण्याआधी तुमच्या छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ लागते, तुम्हाला घाम फुटू लागतो याचे कारण म्हणजे, छातीत वारंवार जळजळ होत असल्याने हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयाचे काम थांबून झटका येऊ शकतो.

खरं तर, छातीत जळजळ, हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट खूप एकसारखे वाटू शकतात पण फक्त शारीरिक लक्षणे पाहून तुम्ही फरक सांगू शकत नाही. पण कोणतेही लक्षात 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास, दवाखान्यात जाणेच हिताचे ठरेल.

हृदयाच्या चाचण्या महत्त्वाच्या का आहेत?

उपचारांच्या बाबतही अनेकजण चुका करतात. जेव्हा लोकं त्यांच्या जनरल फिजिशियनकडे जातात, तेव्हा ते डॉक्टर लगेचच ईसीजीचा आग्रह धरत नाहीत. (अपवाद वगळल्यास). तुमचा फिजिशियन तुमची संपूर्ण हेल्थ प्रोफाइल व जीवनशैली जाणून असल्यास हे एखाद्या वेळेस चालून जातं पण अन्यथा दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ केल्यासारखे आहे. खरंतर अशा प्रकरणांमध्ये, डॉक्टरने संपूर्ण मूल्यांकन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह असलेल्या ३५ -वर्षीय धूम्रपान करणार्‍या व्यक्तीला गॅसची तक्रार असल्यास, निश्चितपणे चाचण्यांची शिफारस करायला हवी, निदान दोन तास त्याचे निरीक्षण केल्यावर मग धोका ओळखला किंवा फेटाळला जाऊ शकतो.

तुम्हाला छातीत जळजळ आणि ऍसिडिटी आहे हे कसे समजते?

छातीत जळजळ म्हणजे तुमच्या अन्ननलिकेमध्ये किंवा अन्ननलिकेमध्ये पाचक ऍसिड गेल्यामुळे होणारी अस्वस्थता किंवा वेदना. हे छातीत आणि वरच्या ओटीपोटात जळजळ आणि अस्वस्थतेद्वारे ओळखता येते. सहसा, जड जेवणानंतर अशी लक्षणे दिसून येतात परंतु अँटासिड्सने यावर उपचार केला जाऊ शकतो. सहसा औषध घेतल्यावर किंवा चालल्यावर सुद्धा हा त्रास नियंत्रणात येतो परंतु जर अस्वस्थता व वेदना कमीच होत नसेल तर डॉक्टरांना संपर्क करा.

हे ही वाचा<< कागद, फॉईल किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? FSSAI ने दिली धोक्याची सूचना, तज्ज्ञांनी सांगितले पर्याय 

तुम्हाला सतत छातीत दुखत असेल आणि कशामुळे याची खात्री नसल्यास काय करावे?

फक्त हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षाला भेट द्या आणि तुमचा ईसीजी करा. छातीत दुखणे काही तासांत कमी झाले तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीत जळजळ आणि हृदयविकाराच्या झटक्याचा संभाव्य धोका या दोन्हीमुळे काही काळानंतर लक्षणे कमी होतात. काही काळात गायब होणारी दुखणी ही भविष्यातील मोठ्या दुखण्याची पहिली पायरी असू शकते त्यामुळे वैद्यकीय सल्ला कोणत्याही स्थितीत घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burning in chest due to acidity or is it heart attack how to spot difference can pain in left hand indicate heart disease doctor svs
Show comments