Buttermilk or Curd : दही आणि ताक हे दुधापासून बनविले जाणारे पदार्थ आहेत. अनेक लोकांना आहारात दही खाणे आवडते, तर काही लोक जेवणानंतर आवर्जून ताक पितात. पण, तुम्हाला माहिती आहे का दही आणि ताक यापैकी कशाचे सेवन करणे अधिक चांगले आहे? याविषयी डॉ. डिंपल जांगडा सांगतात, दही आणि ताक फक्त दिसायला वेगळे नाहीत, तर याचे सेवन केल्यानंतर त्याचा शरीरावरसुद्धा परिणाम वेगवेगळा दिसून येतो.
दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात, जे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर आंबतात. जेव्हा तुम्ही दह्याचे सेवन करता, तेव्हा ते तुमच्या पोटातील उष्णतेच्या संपर्कात येतात आणि आंबतात; ज्यामुळे तुमचे आतडे थंड होण्याऐवजी त्यांना ऊब मिळते. जेव्हा तुम्ही दह्यामध्ये पाणी घालून ताक बनवता, तेव्हा आंबवण्याची प्रक्रिया थांबते आणि पचायला जड असलेल्या दहीच्या तुलनेत ताक अधिक थंड होते.
डिंपल जांगडा यांच्या मते, ताक हे सर्व ऋतूंना सोयीस्कर आहे. याशिवाय दह्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे. दह्याच्या सेवनामुळे चरबी वाढते, ताकद वाढते, पण जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील तर दही खाणे टाळावे.”
दही खाणे कोणी टाळावे?
- ज्या लोकांना लठ्ठपणा आहे, खूप रक्तस्त्राव होतो, ॲलर्जी किंवा संधिवाताचा त्रास असेल त्या लोकांनी दही खाणे टाळावे.
- रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला होऊ शकतो; पण ज्यांना रात्री दही खाण्याची सवय असेल त्यांनी त्यात चिमूटभर मिरे आणि मेथी टाकावी.
- दही कधीही गरम करू नका, कारण असे केल्यामुळे त्यातील शरीराला उपयुक्त असलेला बॅक्टेरिया नष्ट होतो. ज्यांना त्वचेचे विकार आहे, पित्ताचा त्रास होतो, तीव्र डोकेदुखी जाणवते, नीट झोप येत नाही आणि पचनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी दही खाऊ नये.
डॉ. डिंपल सांगतात, “ताक हा दह्याचा उत्तम पर्याय आहे, जे आपल्यासाठी अमृततुल्य आहे. त्यांनी ताक बनविण्याची एक रेसिपीसुद्धा शेअर केली आहे.
- दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी टाका.
- त्यात जिरेपूड घाला
- थोडे मीठ टाका
- बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
- ताक तयार होईल.
ताक पिण्याचे फायदे
- ताक आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि इतर आजारांपासून दूर ठेवते.
- ताक पचायला सोपे आहे आणि यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
- जळजळ होणे, पचनाशी संबंधित समस्या जाणवणे, भूक न लागणे, अशक्तपणा इत्यादी आरोग्याच्या समस्या ताकाचे सेवन केल्याने दूर होतात.
- जर हिवाळ्यात तुम्हाला अपचन होत असेल तर ताक आवर्जून प्यावे.
द इंडियन एक्स्प्रेसने लिव्हलाँगच्या न्यूट्रिशनिस्ट योगिनी पाटील यांच्या हवाल्याने दह्याऐवजी ताक का प्यावे, याची कारणे सांगितली आहेत.
- ताक हे पचायला हलके आहे. याशिवाय ज्यांना भूक लागत नाही त्यांनी ताक पिणे फायदेशीर आहे. दही पचायला अवघड असते, त्यामुळे रात्रीच्या जेवणात दही खाणे टाळावे. बद्धकोष्ठता किंवा पचनाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी आवर्जून ताक प्यावे.
- जर तुमची पचनक्रिया चांगली असेल, तुम्ही नियमित शरीराची हालचाल करत असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर दही अधिक फायदेशीर आहे; पण तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ताक प्या. दह्याचे सेवन करणे टाळा.
- दही गरम असते तर ताक थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि थंड वातावरणात दह्याऐवजी ताक प्या.