Cake Causes Cancer: चॉकलेट केक, पाईनापल केक, ब्लू बेरी, रेड वेल्वेट केक, ब्लॅक फॉरेस्ट केक अशा विविध केकची नावे ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. अनेकांना केक खायला प्रचंड आवडतो. कोणाचा वाढदिवस असू द्या किंवा एखादं चांगलं काम जरी झालं तरी आजकाल केक कापून तो साजरा करण्याचा ट्रेंड आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? केक खाल्ल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अलीकडेच कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अलीकडील अभ्यासात रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्टसारख्या केकच्या चाचणीमध्ये २३५ पैकी १२ केक नमुन्यांमध्ये कर्करोगजन्य घटक आढळून आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के यांनी राज्यभरातील बेकरींना ते वापरत असलेल्या घटकांबद्दल अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: हानिकारक रसायने आणि कृत्रिम रंगाच्या वापराविरुद्ध इशारा दिला आहे.
केकमध्ये आढळले कर्करोग निर्माण करणारे घटक?
कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की, एकूण २३५ केक नमुन्यांपैकी २२३ सुरक्षित आढळले आहेत, परंतु १२ केकमध्ये धोकादायक पातळीवर कृत्रिम रंग असल्याचे आढळले आहे, त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार, रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केक, जे लोक मोठ्या उत्साहाने खातात, ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
अन्न सुरक्षा आयुक्तांचा इशारा
अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “विविध बेकरीमधील नमुन्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये केकच्या विशिष्ट प्रकारांमध्ये कृत्रिम रंग जास्त प्रमाणात आढळून आले. गोबी मंचुरियन, कबाब आणि पाणीपुरी सॉस यांसारख्या पदार्थांमधील कृत्रिम रंगांवर विभागाच्या मागील बंदीनंतर आता केकसाठी हा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा >> सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज’ पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक; जाणून घ्या काय काळजी घ्यायला हवी…
दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटलच्या डायरेक्टर, डॉ. मनीषा अरोरा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती देत संबंधित संभाव्य आरोग्य धोके स्पष्ट केले आहेत. “कृत्रिम रंग मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्यास नुकसान होऊ शकते, हेच रंग कर्करोगाचा धोका वाढवू शकतात आणि हार्मोनल व्यत्यय आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करण्यासारख्या इतर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.” अशा केकचे अधूनमधून सेवन केल्याने कमीत कमी धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, नियमित सेवन केल्याने दीर्घकालीन आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतात, विशेषत: लहान मुलांवर; ज्यांचे विकसनशील शरीर विषारी द्रव्यांसाठी अधिक संवेदनशील असते.
FSSAI ने स्थानिक बेकरींना यासंदर्भात कठोर पालन करण्याचा इशारा दिला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd