Diabetes Control Remedies: आपण काय खातो याबरोबरच आपण जे खातो ते कसे बनवतो हा मुद्दा सुद्धा आपल्या आरोग्यावर बराच प्रभाव टाकत असतो. तळलेल्या पदार्थांपेक्षा वाफवलेले, उकडलेले पदार्थ हे आरोग्यासाठी उत्तम असतात असे तज्ज्ञांनी वारंवार यापूर्वीही सांगितले आहे. पण तुम्हाला माहित्येय का, या वाफवलेल्या पदार्थांमध्ये काही विशिष्ट गोष्टींची जोड दिल्यास त्याचा आरोग्याला उत्तम हातभार लागू शकतो. या जोडीच्या गोष्टी कोणत्या व त्याचे फायदे काय याविषयी आता आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
Medhya Herbals: Ayurveda for Women’s Health या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, पालेभाज्या, ब्रोकोली आणि भोपळी मिरची यांसारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि फायबर भरपूर असतं. फायबर साखरेचे शोषण कमी करते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. यात काही अभ्यासात असे सुचवण्यात आले की या भाज्या व एकूणच जेवणात ताज्या लिंबाचा रस पिळल्यास काही पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यास मदत होते.
लिंबाच्या रसातील आंबटपणा स्टार्चच्या पचनामध्ये व्यत्यय आणू शकतो, परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. तर काळी मिरी पावडर इन्सुलिन संवेदनशीलता वाढवू शकते. यामुळे तुमच्या शरीराची ग्लुकोज (साखर) वापरण्याची क्षमता सुधारते. त्यामुळे जेवणात काळी मिरी व लिंबाचा रस वापरावा असे या पोस्टमध्ये सुचवण्यात आले आहे. तर हळद आणि मेथी सारख्या औषधी वनस्पती सुद्धा रक्तातील साखरेचे संतुलन आणि स्वादुपिंडाच्या कार्यास मदत करतात असेही नमूद करण्यात आले आहे. आता आपण याचा खरोखरच फायदा होतो का हे पाहूया..
लिंबू आणि काळी मिरी पावडर टाकून फायदा होईल का?
मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित राखणे नेहमीच कठीण काम असते. सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती खरीच असेल असं समजू नये अशी कमेंट करत रिया देसाई, वरिष्ठ आहारतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड, मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला या उपायाविषयी माहिती दिली.
उन्हाळ्यात एखाद्या शीतपेयामध्ये लिंबाच्या फोडी टाकल्याने, सॅलेड, भाज्यांमध्ये लिंबू पिळल्याने कार्बोहायड्रेट्सची पचन प्रक्रिया मंद होण्यास मदत होते. ज्यामुळे ग्लुकोज अधिक हळूहळू प्रक्रियेत रक्तप्रवाहात सोडले जाते. याचा फायदा असा की अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी होतो. शिवाय लिंबाचा रस अन्नामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाचवतो. ज्यामुळे जळजळ व ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होऊ शकतो.
थौसिया हसन, सल्लागार आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, एचआरबीआर लेआउट, बंगळुरू यांनी सांगितले की, लिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असणारे पॉलिफेनॉल असते जे शरीरासाठी फायदेशीर आहे. पॉलीफेनॉल इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारून ग्लुकोजचे सेवन करण्यास अनुमती देते.”
हे ही वाचा<< खजूरासाठी मोजलेला एक एक पैसा होईल वसूल; वाचा खजुराच्या बियांच्या सेवनाने होणारे फायदे, कसा करावा वापर?
मिरपूडीच्या बाबत विचार करायचा तर त्याचा प्राथमिक फायदा म्हणजे पाइपरिनचा मुबलक साठा. हे एक असे सक्रिय कंपाऊंड आहे जे पोषक तत्वांचे शोषण वाढवते व चयापचय सुधारते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणाऱ्या पोषक तत्वांचा शरीराला पुरवठा होतो. पाइपरिन इन्सुलिन आणि ग्लुकोजच्या चयापचयाचे प्रमाण सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी नियंत्रित होते. असं असलं तरी, रक्तातील साखरेच्या पातळीत १५-२० टक्के घट सुचवणारा कोणताही अभ्यास नाही.