उन्हाचा तडाखा वाढत असून, तापमानाच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शरीरात पुरेशी पाण्याची पातळी राखणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले, तर कडाक्याच्या उन्हात कमी होत असलेली शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होईल, असे अनेकांना वाटते. पण तज्ज्ञांच्या मतानुसार, “पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही विविध कारणांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जरी एखाद्या व्यक्तीनं दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी प्यायलं तरी ते शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी पुरेसं नाही. कारण- व्यक्तीला भरपूर प्रमाणात घाम येतो,” असे दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे डायरेक्टर डॉ. राजीव गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

पुरेश्या प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही शरीरातील पाण्याची पातळी कमी का होते?

“भरपूर प्रमाणात घाम येणं, उच्च तापमान, दीर्घकाळ उन्हात राहणं व शारीरिक हालचाली अशा विविध कारणांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार फक्त पाणी पिणं शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पुरेसं ठरत नाही. आवश्यक प्रमाणात पाणी पिऊनही एखाद्याला निर्जलीकरणाची लक्षणं जाणवू शकतात; ज्यामध्ये थकवा, चक्कर येणं, तोंड कोरडं पडणं, लघवीचं प्रमाण कमी होणं अशा लक्षणांचा समावेश होतो,” असे जिंदाल इन्स्टिट्युटच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपा

अशा परिस्थितीत पाण्यात मीठ टाकून प्यायल्यास शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होईल का?

मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड; जे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. “जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपण फक्त पाणीच नव्हे, तर सोडियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सदेखील गमावतो. असा सिद्धान्त मांडला जातो की, मिठाच्या सेवनानं गमावलेलं सोडियम भरून काढलं जातं आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारू शकते. त्यामुळे निर्जलीकरण टाळता येईल,” असेही सुषमा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

पण, शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मिठाचा वापर करणे हा आरोग्य तज्ज्ञांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. “एखादी व्यक्ती; जिचं मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करतं, तिचं मूत्रपिंड नैसर्गिकरीत्या सोडीयम क्लोराईडच्या पातळीचं नियमन करतं, अतिरिक्त मिठाचं सेवन करणं टाळतं, असे मत गुप्ता यांनी मांडले. तर इतर तज्ज्ञांनी सांगितले, “जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यामुळे रक्तदाब आणि एकूण आरोग्यावर विपरीत परिमाण होऊ शकतात. विशेषत: अशा व्यक्तीला; ज्याला आधीपासून रक्तदाबाचा त्रास होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यामध्ये मीठ टाकून पिण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

डॉ. गुप्ता यांच्या मतानुसार, उन्हाळ्यात निर्जलीकरणाचा सामना करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि इलेक्ट्रॉईडयुक्त आहाराचं सेवन करून, योग्य पद्धतीनं शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. तुमच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकल्यास गमावलेलं इलेक्ट्रॉईड परत मिळविण्यास मदत होईल आणि शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होईल. पण, मिठाचं माफक प्रमाणात सेवन करणं आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीचा विचार करणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer snk