Can Anger Cause Heart Attack: “माझ्या तळपायाची आग मस्तकात जातेय..”, “एवढा राग येतोय ना, चार गोष्टी फोडाव्याश्या वाटतायत”.. अशी वाक्य सतत तुमच्याही मनात येतात का? कारण काहीही असो म्हणजे अगदी तुमच्या नव्या कपड्यांवर बाजूने जाणाऱ्या गाडीने चिखल उडवलेला असो किंवा तुमच्या एखाद्या सहकाऱ्याने पुढे पुढे करून तुमचं क्रेडिट चोरलेलं असो, तुम्हाला येणारा राग हा तुमच्या मनावर, शरीरावर फारच विपरीत परिणाम करू शकतो. अनेकदा याविषयी यापूर्वी बोललं गेलं आहे की जास्त रागावल्याने हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. लोकांना ही गंमत वाटते पण खरोखरच वैद्यकीय दृष्टीने सुद्धा असं होण्याची पूर्ण शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजवर एकापेक्षा जास्त अभ्यासांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि रागाचा उद्रेक यांच्यातील परस्परसंबंध आढळून आला आहे. जर आपल्या मनात अत्यंत तीव्र भावना दोन तास किंवा त्याहून अधिक काळासाठी असतील तर हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तप्रवाहावर परिणाम करू शकतात, परिणामी हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन झटका येऊ शकतो. आज आपण फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट दिल्ली येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निशिथ चंद्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखातून रागवल्यावर हृदयविकाराचा झटका का येऊ शकतो हे जाणून घेणार आहोत.

रागामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढतो?

कार्डिओलॉजिस्ट डॉ. चंद्रा सांगतात की, रागामुळे शरीरात एड्रेनालाईन, एपिनेफ्रिन आणि कोर्टिसोल सारख्या विशिष्ट तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळीचे वाढते. हे हार्मोन्स सर्वात आधी हृदयाची गती वाढवतात आणि नंतर रक्तदाब (बीपी). या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांमुळे व रक्तदाबामुळे डोकेदुखी, घाम येणे, धडधडणे, छातीत दुखणे आणि चिंता वाढणे असे त्रास जाणवू शकतात. अशा स्थितीत जर तुमच्या रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या निरोगी नसतील किंवा धमन्या आधीच ब्लॉक झाल्या असतील, तर वर नमूद केलेल्या परिस्थितीमुळे हृदयावरील ताण वाढून प्लॅक विखुरतो, फाटतो किंवा रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन हृदयावर परिणाम होऊ शकतो. अतिरिक्त ऍड्रेनालाईनमुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान धमन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे रक्त प्रवाहात तात्पुरती घट होते.

काहीवेळा, अतिरिक्त एड्रेनालाईन थेट हृदयाच्या पेशींना बांधू शकते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅल्शियम पेशींमध्ये प्रवेश करू शकते. यामुळे हृदयाच्या नियमित धडधडीत व्यत्यय येतो आणि हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. यालाच आपण स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी म्हणतो.

रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज कुणाला आहे?

को मॉरबीडीटीस म्हणजेच जोडून असणारे आजार (उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह) असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.अगोदरच ज्यांचे हृदय कमकुवत आहे किंवा ज्यांची बायपास झाली आहे त्यांनी सुद्धा रागावर अंकुश ठेवायला हवा. यासाठी शक्यतो योग व ध्यानधारणेचा सराव करावा, यामुळे तुम्हाला मन शांत ठेवण्यास मदत होऊ शकते. आपल्याला राग येणारच नाही असं कदाचित शक्य होत नाही, रागावणं ही नैसर्गिकच प्रतिक्रिया आहे, म्हणूनच तुम्हाला रागाचा मुळातच सामना कसा करायचा हे शिकायला हवं.

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण एक ते दहा अंक मोजू शकता ज्यामुळे तुम्ही शांत होऊ शकता. प्राणायाम करू शकता, दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे ठोके संतुलित होऊन राग नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. एखाद्या वेळेस फारच धक्कादायक घटना घडली असेल आणि तुमच्या रागाचा उद्रेक होईल असं तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वात आधी हृदयविकाराचा धोका लक्षात घेऊन रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.

हे ही वाचा << ‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?

काही संशोधकांना असेही आढळून आले आहे की अगदी निरोगी असूनही एखादी व्यक्ती सतत रागावत असेल, चिडत असेल, इतरांशी शत्रुत्व पत्करून वागत असेल तर त्यांना हृदयविकाराचा धोका शांत लोकांच्या तुलनेत १९ टक्के जास्त असतो. त्यामुळेच आपण रागवताना हे लक्षात ठेवायला हवं की ज्या व्यक्तीचा तुम्ही राग करत आहात तिला खरोखरच त्याचा फार फरक पडत नाही. शारीरिकदृष्ट्या तर नाहीच! पण उलट तुम्ही स्वतःचेच नुकसान करत आहात

तुमचा आक्रोश हा समस्येचे निराकरण व्हावं या उद्देशाने असावा फक्त इतरांनी भडकवल्याने तुम्ही चिडचिड करत असाल तर तुमच्या भावना अनियंत्रित आहेत हे मान्य करून समुपदेशनाचा पर्याय विचारात घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can anger trigger a heart attack if you get angry all the time what should you do to avoid blood pressure heart stroke how to attain mental peace svs