Brain Strokes Under 40 Years Old: शरीराच्या अनेक आजारांमध्ये सर्वात भीषण मानला जाणारा प्रकार म्हणजे ब्रेन स्ट्रोक! कारण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ब्रेन स्ट्रोक सारख्या स्थितीमध्ये मृत्यूची शक्यता जास्त असते. सुदैवाने जे रुग्ण वाचतात, त्यांना सुद्धा कालांतराने बोलण्यामध्ये, दृष्टीमध्ये त्रास जाणवतात. काही प्रकरणांमध्ये तर पक्षाघात किंवा अर्धांगवायू (म्हणजेच शरीराची बाजू निकामी होऊन हालचाल करताना अडचण येण्याचा) धोका असतो. निश्चितच ब्रेन स्ट्रोक हा अत्यंत गंभीर आजार आहे मात्र तरीही या विषयाला जोडून अनेक समज- गैरसमज आहेत. आज आपण पद्मश्री विजेते तज्ज्ञ डॉ. (प्रा.) एम. व्ही. पद्मा श्रीवास्तव, चेअरपर्सन, न्यूरोलॉजी, पारस हेल्थ, गुरुग्राम, यांनी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात दिलेल्या माहितीनुसार काही प्रसिद्ध गैरसमजुती सोडवणार आहोत.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे लगेच दिसून येतात?
ब्रेन स्ट्रोकबाबत सर्वात प्रसिद्ध मिथक म्हणजे त्याची लक्षणे सर्वात आधी दिसून येतात. यावर उत्तर देताना डॉ. श्रीवास्तव सांगतात की अनेक संशोधनांमधून असे दिसून आले आहे की एकही लक्षण न दिसता येणाऱ्या स्ट्रोकचे प्रमाण अधिक आहे. सर्व स्ट्रोक्स हे लक्षणांसह येत नाहीत. तर दुसरा समज म्हणजे ४० च्या वयाखालील व्यक्तींना स्ट्रोक येण्याची शक्यता नगण्य असते आणि जरी अशी स्थिती उद्भवली तरी त्यामध्ये उच्च रक्तदाब हे प्राथमिक कारण असू शकते.
सहसा, जेव्हा आपण स्ट्रोकबद्दल विचार करतो, तेव्हा आपण हालचाली कमी होणे, सुन्न होणे किंवा बोलण्यात त्रास होणे यासारख्या लक्षणांचा विचार करतो. दुसरीकडे, मूक स्ट्रोक ओळखले जात नाहीत कारण ते कोणतीही स्पष्ट लक्षणे दर्शवत नाहीत. सायलेंट स्ट्रोक ओळखणे कठीण आहे. कारण हे मेंदूच्या अशा काही भागांमध्ये घडते जिथून भाषण आणि हालचाल यासारख्या न दिसणार्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. परिणामी, स्ट्रोक येण्याबाबत लोक अनभिज्ञ असू शकतात. पण तरीही मूक स्ट्रोकमध्ये अगदी सौम्य स्वरूपात काही लक्षणे दिसून येऊ शकतात. जसे की,
- स्मृतीभ्रंश किंवा साधी कामे करताना अडथळे येणे
- तोल किंवा समन्वय राखण्यात अडथळे
- चेहरा, हात किंवा पाय मध्ये सुन्नपणा किंवा अशक्तपणाच्या संवेदना
- दृष्टी कमकुवत होणे
मूक स्ट्रोक कधीच गंभीर नसतात का?
मूक स्ट्रोक अनेकदा लक्षात येत नाहीत परंतु ते संबंधित रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक असू शकतात. मूक स्ट्रोक नंतर अधिक तीव्र स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. मेंदूला झालेल्या नुकसानामुळे बिघाड होऊ शकतो किंवा गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो. हे व्हॅस्क्यूलर डिमेंशियाच्या विकासास देखील कारण ठरू शकते. या नुकसानाचे परिणाम कायमस्वरूपी असले तरी, स्ट्रोकमधून वाचल्यावर थेरपीच्या साहाय्याने व निरोगी सवयी लावून पुढील स्ट्रोक टाळता येऊ शकतात.
स्ट्रोकमुळे पक्षाघात होतो, हा नियम आहे का?
स्ट्रोक हे दीर्घकालीन दुर्बलतेचे प्रमुख कारण आहे. स्ट्रोकमधून वाचलेल्या सर्वांनाच स्नायूचे वस्तुमान कमी होणे किंवा अर्धांगवायूचा अनुभव येणे असे त्रास होतातच असा नियम नाही मात्र संशोधनातून असे दिसून आले आहे की, अर्ध्याहून अधिक स्ट्रोकमधून वाचलेल्यांना विशेषतः ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना गतिशीलता कमी झाल्याचा अनुभव येऊ शकतो.
तथापि, स्ट्रोकचे दीर्घकालीन परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतात, जसे की शरीराचा प्रभावित भाग आणि मेंदूच्या ऊतींचे नुकसान. उदाहरणार्थ, मेंदूच्या डाव्या भागात झालेल्या दुखापतीमुळे शरीराच्या उजव्या बाजूवर परिणाम होतो आणि त्याउलट मेंदूच्या उजव्या बाजूची दुखापत डाव्या बाजूच्या नुकसानाला कारणीभूत ठरू शकते.
हे ही वाचा<< प्रसिद्ध अभिनेत्रीला धूम्रपान न करता फुफ्फुसांचा कर्करोग; कोणती लक्षणे आधी दिसतात, निदान कसे होते?
दरम्यान, स्ट्रोकचा अंदाज लावणे अद्याप कठीण असले तरी, मूक स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, रक्तवहिन्यासंबंधी समस्या आणि इतर परिस्थितींमुळे पक्षाघाताचा धोका वाढतो. तथापि, निरोगी वजन राखणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आणि नियमित व्यायाम करणे या सर्व गोष्टींचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.