Curd Combinations: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये दही हादेखील एक प्रमुख पदार्थ आहे. दही त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे ओळखला जातो. दही साध्या अन्नपदार्थांपासन ते रायता, चाट अशा विविध पदार्थांमध्येही वापरले जाते. परंतु तज्ज्ञांच्या मते, दह्याचे सेवन सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांबरोबर करणे आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तींची पचनशक्ती खूप कमकुवत असते. त्यांनी दह्याचे सेवन जपून करायला हवे.
“विविध पदार्थांबरोबर केले जाणारे दह्याचे कॉम्बिनेशन टाळणे का गरजेचे आहे” याबाबत, इंडियनएक्स्प्रेस.कॉमशी संवाद साधताना बंगळुरू येथील एस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलमधील मुख्य क्लिनिकल आहार तज्ज्ञ वीणा व्ही. यांनी सांगितले.
मसालेदार अन्नपदार्थांसह दही
बिर्याणीच्या चाहत्यांसाठी रायता किंवा साधे दही अनेकदा तो पदार्थ खाताना अधिक रुचकर लागावा यासाठी वापरले जाते. परंतु मसालेदार पदार्थांसह दही वापरणे सर्वांसाठी योग्य नाही. थंड दही आणि गरम मसाल्यांमधील तापमानातील फरकामुळे पचनास त्रास होऊ शकतो; विशेषत: संवेदनशील पचनशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये. “हा संयोग हानिकारक आहे, असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. मात्र, संवेदनशील पचनशक्ती असलेल्या काही व्यक्तींना विरोधाभासी तापमानामुळे अस्वस्थता जाणवू शकते,” असे वीणा यांनी सांगितले.
ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (आईबीएस), आईबीडी किंवा अॅसिड रिफ्लक्स यांसारख्या पाचक स्थिती आहेत, त्यांना हे पदार्थ खाताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण- या व्यक्तींना मसालेदार पदार्थांसोबत दही खाल्ल्यास प्रकृती बिघडल्याची लक्षणे जाणवण्याची अधिक शक्यता असते.
बुंदी रायता
बुंदी रायता हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. परंतु, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, बुंदी तळलेली असते आणि त्यात अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज असतात. “आयुर्वेदिक तत्त्वांनुसार, दही हे आंबट आणि जड मानले जाते; तर तळलेले पदार्थ जड आणि पचायला कठीण मानले जातात. हे पदार्थ एकत्र केल्यावर ते पचन प्रक्रियेत अडथळा आणतात,” असे वीणा यांनी स्पष्ट केले आहे. आयुर्वेदाने असे ‘जड’ पदार्थ एकत्र करण्यापासून सावध केले असले तरी बुंदी रायत्याबाबतची मुख्य चिंता म्हणजे त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते.
हेही वाचा: कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
काकडी रायता
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक जण काकडी रायत्याचे सेवन करतात. आयुर्वेदात असे सांगण्यात आले की, काकडी आणि दही एकत्रितपणे खाल्ल्याने छातीत कफ तयार होऊन, पचनात व्यत्यय येऊ शकतो; ज्यामुळे सायनसचा रक्तसंचय होण्याची शक्यता असते. मात्र, आधुनिक पोषण या दाव्याचे समर्थन करीत नाही आणि काकडी रायता हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो. कारण- त्यामुळे हायड्रेशन, फायबर व प्रो-बायोटिक्स प्रदान केले जाते, असे वीणा यांनी सांगितले.
पदार्थांमध्ये निरोगी वेगळेपणा आणण्यासाठी वीणा यांनी गाजर रायता, पुदिना रायता आणि अगदी कांदा रायता यांसारख्या पर्यायांची शिफारस केली आहे.