रोटी किंवा चपाती हा अनेकांच्या घरात जेवणातील एक मुख्य घटक आहे. अनेकांच्या सकाळी सुरुवात नाश्त्याला चहा-चपाती खाऊन होते. तर दुपारचा लंच हा देखील चपाती-भाजी असतो. पण सर्व घरांमध्ये चपाती बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. पुष्कळ लोक चपाती शिजवल्यानंतर ती चिमट्याने थेट गॅसवर शेकतात. बरेच लोक चपाती तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून भाजतात. या दोन्ही पद्धतीने चपाती बनवल्याने चपातीची टेस्ट बदलते असं बहुतेकांचे मत आहे. पण अलीकडे चपाती बनवण्यासंदर्भात नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. जे वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, कुकटॉप्स आणि एलपीजी गॅस स्टोव्हमधून नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड यांसारखे अनेक धोकादायक वायु प्रदूषक उत्सर्जित होतात. हे वायू आपल्या आरोग्यायासाठी अधिक धोकादायक असतात असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) म्हटले आहे. त्यामुळे श्वसनाच्या आजारांसोबतच कॅन्सर आणि हृदयाचा धोकाही निर्माण झाला असून, त्यामुळे व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे चपाती तव्यावर भाजल्यानंतर ती गॅस किंवा स्टोवर थेट शेकण्यासाठी ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरतेय.
उच्च तापमानात चपाती बनवल्याने होऊ शकतात अनेक आजार
न्यूट्रिशन अँड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जर आपण उच्च तापमानात चपाती बनवली तर ते कार्सिनोजेनिक्स पदार्थ तयार करू शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत अस्थमाच्या रुग्णांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कोणताही आजार नसलेल्या लोकांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका आहे.
अशाप्रकारे चपाती बनवल्याने होऊ शकतो कॅन्सर?
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. पॉल ब्रेंट यांच्या मते, गॅस किंवा स्टोव्हच्या आगीवर चपाती शिजवली जाते तेव्हा त्यातून ऍक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होते. दुसरीकडे गॅसच्या थेट आगीवरवर चपाती शिजवल्याने शरीरासाठी धोकादायक मानले जाणारे कार्सिनोजेन्स केमिकल तयार होते. हे दोन्ही केमिकल आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. पण संशोधनात समोर आलेल्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण त्यातून समोर आलेल्या गोष्टी नक्कीच धोकादायक आहेत.