अलीकडे कच्च्या घाण्याचं तेल , रिफाईड शेंगदाणा तेल , कच्चं दाण्याचं तेल अशा विविध विषयांबाबत चर्चा आणि संभ्रम असल्याचे आढळून येतात. कोणी म्हणतं अनेकदा शेंगदाण्याच्या तेलानेच पित्त वाढतं… काहीजण सांगतात शेंगदाण्याच्या तेलामुळे फॅट वाढलंय …. अमुक म्हणतो कोलेस्टेरॉल साठी शेंगदाणा तेल फार वाईट … तमुकचं म्हणणं पडतं की खरंतर ते फक्त तळण्यासाठीच वापरावं… अशा प्रकारची वाक्यं तुमच्या कानावर पडली असतीलच!
तर नेमकं आहारविज्ञानात शेंगदाणा तेल कितपत आरोग्यदायी मानलं जातं आणि त्यामागे काय कारण आहेत हे आजच्या लेखात जाणून घेऊया.
शेंगदाण्याचं तेल तळण्यासाठी सर्वोत्तम तेल मानलं जातं आणि यात प्रामुख्याने शेंगदाण्याच्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट म्हणजेच उष्मांक २४५ डिग्री सेल्सिअसहून जास्त असल्याने ते तळण्यासाठी वापरण्याचा आग्रह केला जातो . वैज्ञानिक गुणांसोबत शेंगदाण्याच्या तेलाचा गंध, चव आणि त्याचा समावेश केल्यामुळे पदार्थाची वाढलेली लज्जत या सगळ्यांमुळे तळीव पदार्थाचं लाडकं तेल म्हणजे दाण्याचं तेल !
अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे
१ चमचा शेंगदाणा तेलामध्ये दिवसभरात आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्व इ पैकी ११% इतके इ जीवसत्त्व असते. शेंगदाण्याच्या तेलात असणारे टोकोफेरॉल, फायटोस्टेरॉल , फ्लॅवेनॉइड्स यासारखे अँटिऑक्सिडंट्स रक्तपेशींचे आरोग्य उत्तम राखतात यामुळे स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून आपले रक्षण करतात. जीवनसत्त्व इ चे प्रमाण त्वचेची आर्द्रता राखण्यास मदत करते तसेच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासदेखील मदत करते .
ज्यांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी होते त्यांनी आवर्जून आहारात शेंगदाणा तेल वापरावे किंबहुना कोशिंबीरीला फोडणी देण्यासाठी दाण्याचे तेल नक्की वापरावे.
हृदयाचे आरोग्य आणि शेंगदाणा तेल
शेंगदाण्याच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शून्य असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर याचा परिणाम होत नाही. शिवाय शेंगदाण्याच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण उत्तम असते. रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDLचे प्रमाण उत्तम राहावे यासाठी मदत करते. शिवाय ट्रायग्लिसेराईड्सचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील कारणीभूत ठरते.
मधुमेह असणाऱ्यांनी शेंगदाण्याचे तेल वापरावं का?
इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असणाऱ्यांनी किंवा मधुमेह असणाऱ्यांनी आहारात शेंगदाण्याचे तेल वापरण्यास काहीही हरकत नाही. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राखून ग्लुकोजची मात्र नियंत्रणात ठेवण्यास शेंगदाण्याचे तेल गुणकारी आहे. विशेषतः टाईप २ मधुमेही रुग्ण शेंगदाण्याचे तेल आहारात जरूर समाविष्ट करू शकतात.
त्वचेचे किंवा केसांची वाढ खुंटणे यासारख्या समस्या असणाऱ्यांसाठी शेंगदाणा तेल उत्तम मानले जाते. किंबहुना एक्स्ट्रा वर्जिन पाश्चात्य तेल वापरण्याऐवजी शेंगदाणा तेलाचा आहारातील वापर कायम उजवा ठरतो.
अलीकडे तुम्ही शेंगदाण्याच्या तेलात तळलेले पदार्थ बाजारात सर्रास उपलब्ध असलेले पहिले असतील ; तळण्यासाठी उत्तम आणि किमतीच्या मानाने स्वस्त असणारे हे तेल पुन्हा बाजारपेठेत मानाने दिसू लागले आहे.
आता साहजिक पडणारा प्रश्न हा की मग शेंगदाण्याच्या तेलामुळे काही लोकांना मुरुमे येणे किंवा तारुण्यपिटिका वाढल्याचे का जाणवते ? येथे तेलाच्या प्रकारापेक्षा तेलाचे प्रमाण हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. अतिरेकी तेलाच्या वापराने पोटाचे ताळतंत्र बिघडते आणि त्याचे परिणाम त्वचेवर दिसू लागतात. त्यामुळे कमी प्रमाणात उत्तम परिणाम देणारे हे तेल अवाजवी प्रमाणात आहारात समाविष्ट करू नये.
कोणतेही तेलबिया या निसर्गदत्त तेलाचाच स्रोत असतात. प्रत्येक तेलबियांपासून मिळणारे तेल त्यात असणारे स्निग्धांशाचे प्रकार आहारातील त्याचे स्थान पक्के करत असतो. मात्र दिवसभराच्या तेलाच्या प्रमाणात या तेलांचा समावेश व्हायला हवा. तेलाचे अतिरेकी प्रमाण – म्हणजे तुमच्या दिवसभराच्या आहारातील आवश्यतकतेपेक्षा सातत्याने जास्त खाल्ले जाणारे प्रमाण शरीराला हानीकारक ठरू शकते. अनेक लोकांमध्ये शेंगदाण्याचीच ऍलर्जी असते, किंवा काही लोकांमध्ये तेलाच्या अतिवापरामुळे आतड्यातील सशक्त सूक्ष्मणूंचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे दाण्याचे तेल आहारात जरूर वापरा पण त्याचा अतिरेक टाळा म्हणजे आपल्याला स्थानिक तेलबियांच्या तेलापासून फारकत घ्यावी लागणार नाही.