आजकाल बऱ्याच जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास होताना दिसतो. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. सध्याचे तणावग्रस्त जीवन, अवेळी जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक वाढले आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. उच्च रक्तदाबावर उपचार न केल्यास स्ट्रोक, किडनीचे नुकसान, हार्ट फेल्युअर आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात.
बदलती जीवनशैली, ताणतणाव, थकवा आणि खराब आहार ही रक्तदाब वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. जास्त प्रमाणात मीठ सेवन केले तरी उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. चक्कर येणे, अस्वस्थता, घाम येणे आणि झोप न लागणे, जलद श्वास घेणे किंवा धाप लागणे आणि अंधूक दृष्टी ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. परंतु, ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की, यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. औषधांव्यतिरिक्त नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याचा सल्ला दिला जातो. दिल्लीतील PSRI हॉस्पिटल येथील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. देबजानी बॅनर्जी यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते आहार घेणे तुमच्यासाठी योग्य राहील, याविषयी बोलताना इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.
डॉक्टर सांगतात, आपण आहारात काय खातो काय पितो हे सर्वात महत्वाचे आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डॅश डाएट प्रभावी मानला जातो. या डाएटमुळे केवळ रक्तदाबच नियंत्रित राहत नाही, तर वजनदेखील वेगाने कमी करण्यास हे डाएट प्रभावी ठरू शकते. या आहारात उच्च पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारख्या सत्त्वांचा समावेश आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, किरकोळ प्रोटिन आणि कमी फॅट असलेल्या डेअरी उत्पादनांवर भर देण्यात आला आहे. यासोबतच कमी प्रमाणात मांस, पोल्ट्री मांस (चिकन), मासे, कडधान्ये, शेंगदाणे, बियाणी, फळे आणि भाज्या यांचाही या आहारात समावेश आहे.
(हे ही वाचा : बेली फॅटमुळे हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका? पोटाचा घेर झटपट कमी करण्यासाठी डाॅक्टरांनी सुचविले उपाय)
आहारतज्ज्ञ म्हणतात, डॅश डाएटमध्ये मिनरल पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. हे आहारातील भाज्या, फळे आणि कडधान्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. खरंतर या डाएटमध्ये असे पदार्थ टाळले जातात, ज्यांच्यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
आहारतज्ज्ञ सांगतात, डॅश आहार महिलांच्या एकूण आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. कारण, त्यात पौष्टिक पदार्थांवर भर दिला जातो. हे आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर प्रदान करते, जे स्त्रियांच्या हाडांच्या आरोग्यास तसेच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवते.
डॅश डाएट आहार हा उच्च रक्तदाब असणाऱ्या, हृदयविकाराचा धोका असलेल्या आणि खाण्याच्या सवयी सुधारू इच्छिणार्या व्यक्तींसह अनेक लोकांसाठी योग्य आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा आहार फायदेशीर आहे. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहारात नट्सचा वापर स्नॅक्स म्हणून करू शकतात. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सोडियम, सॅच्युरेटेड फॅट आणि साखरेचे सेवन करणे टाळावे, असाही सल्ला डॉक्टर देतात.