‘लिव्हर’ अर्थात यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. चुकीच्या आहारामुळे आणि आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे यकृताचे आजार आणि इतर समस्या सुरू होतात. कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते आणि दीर्घायुष्यावर परिणाम करू शकते. शरीर योग्यरीत्या कार्य करण्यासाठी त्यातील प्रत्येक अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. कारण- शरीरातील एकाही भागाला दुखापत झाली तरी आपल्या संपूर्ण शरीराचे काम बिघडू शकते. काही लोक केवळ बाह्य अंगाची काळजी घेतात; पण प्रत्येक अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.
शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी यकृताचे योगदान मोठे असते आणि म्हणून यकृत सक्षम ठेवणे, त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. यकृतामध्ये थोडी जरी समस्या असली तरी त्याचा परिणाम हा थेट पूर्ण शरीराला भोगावा लागतो. खरे तर तेलकट, जंक फूड आणि फॅट्सयुक्त पदार्थांच्या सेवनानेदेखील यकृताचे आजार सुरू होतात. आजच्या काळात लोक जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करीत आहेत. जंक फूडचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच; पण त्यामुळे यकृताचे गंभीर नुकसान होऊ शकते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण, तुम्ही सोडा प्यायल्यानं यकृताला हानी पोहोचू शकते काय, याच विषयावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. आलोकित गुलाटी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चला तर आपण जाणून घेऊ डॉक्टर काय सांगतात ते…
सोडा प्यायल्यानं यकृताचे नुकसान होऊ शकते?
डॉक्टर सांगतात, “भारतात दरवर्षी लाखो लोकांना लिव्हरशी संबंधित आजार होतात आणि अनेकांचे मृत्यूदेखील होतात. खाण्यापासून ते पचनापर्यंत आणि शौचाच्या स्वरूपात विषारी पदार्थ बाहेर फेकण्यापर्यंतची सर्व कामे लिव्हरच करते. अशा परिस्थितीत त्याचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. बीएमसी पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, सोडा मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. अभ्यासकांनी सोड्याच्या सवयीचा स्ट्रोकच्या वाढत्या जोखमीशी संबंध जोडला आहे.”
(हे ही वाचा : रोज गाजर खाल्ल्यास शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर अन् वजन झटक्यात कमी होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर )
जास्त प्रमाणात सोडा कोल्ड्रिंक्स प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते; जी नंतर अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. आहारात साखरेचा अतिरेक केल्याने यकृताचेही नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक जण साखर खात नाहीत; पण समस्या इथेच संपत नाही. खरी समस्या फ्रॅक्टोजची आहे; जी ब्रेड, आइस्क्रीम, ज्यूस व सोडा यांसारख्या पदार्थांमध्ये असते. मानवी शरीरातील बहुतेक पेशी ग्लुकोजचे चयापचय करू शकतात; परंतु केवळ यकृत पेशी फ्रॅक्टोज हाताळू शकतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने वेळोवेळी जास्त प्रमाणात फ्रॅक्टोजचे सेवन केले, तर ते यकृताचे नुकसान करते.
एक दिवसात किती सोडा पिऊ शकतो?
सोडा वापरासाठी कोणतीही सार्वत्रिक परिभाषित मर्यादा नसली तरीही संयम ही गुरुकिल्ली आहे. डाएट सोड्यामधून कृत्रिम स्वीटनर्स आणि इतर संयुगे जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. म्हणून तो न पिणे कधीही चांगले. पाणी किंवा इतर आरोग्यदायी पेये पर्यायांना प्राधान्य देणे उचित ठरेल, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला.
डाॅ. गुलाटी म्हणतात, शरीरातील प्रत्येक अवयवाचे महत्त्व असून ते वेगवेगळी कार्य करीत असतात. काही अवयव आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. जर हे अवयव निकामी झाले, तर मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे या अवयवांची काळजी घेणे गरजेचे आहे.