आल्याचा (Ginger) वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. प्रत्येकाला आल्याचा चहा आवडतो. आले आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आल्याचे अनेक औषधी फायदे आहेत. व्हिटॅमिन ए, सी, ई व बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्रोत म्हणून आले ओळखले जाते. त्याचबरोबर त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शियम व बीटा कॅरेटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. आल्याचा चहा पिणे अपल्या आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याच्या गुणधर्मामुळे ते अनेक आजारांपासून आपले संरक्षण करू शकते.
आले हे व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम व इतर खनिजांनी समृद्ध असते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आल्यामुळे दूर होतात. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. गरम पदार्थांमध्ये आल्याचा समावेश होतो. त्यामुळे आल्याच्या सेवनाने शरीराला उष्णता मिळते, त्याचप्रमाणे आळसही दूर होतो. पण, आल्याचा चहा प्यायल्याने तुमच्या टाळूच्या आरोग्यास मदत होऊ शकते का? याच विषयावर द ॲस्थेटिक क्लिनिकच्या सल्लागार व त्वचाशास्त्रज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
आहारतज्ज्ञ सुमन टिब्रेवाला यांची एक इन्स्टाग्राम पोस्ट आली; ज्यात असे सुचवले गेले की, आहारात आल्याचा समावेश करा. आल्याचा चहा टाळूचे आरोग्य राखण्यासाठी मदत करू शकतो. त्यांच्या पोस्टनंतर डॉ. रिंकी कपूर यांनी माहिती दिली की, आल्यामध्ये जैवसक्रिय संयुगे असतात; ज्यांत शक्तिशाली दाहकविरोधी प्रभाव असतो. टाळूची जळजळ बहुतेक वेळा डोक्यातील कोंडा आणि सोरायसिस यांसारख्या परिस्थितीशी संबंधित असते. आल्याच्या चहाचे नियमित सेवन केल्याने ही जळजळ कमी होण्यास मदत होते.
(हे ही वाचा: २ चमचे मधाचे सेवन केल्याने रक्तातील साखर अन् कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते? तज्ज्ञ काय सांगतात, वाचा…)
डोक्यातील कोंडा हा बहुतेक वेळा मालासेझिया नावाच्या बुरशीमुळे होतो; ज्यामुळे टाळूला खाज सुटू शकते. डॉ. कपूर यांनी नमूद केले की, आल्यामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात; जे कोंडा दूर करण्यास मदत करतात. स्काल्पची पीएच लेव्हल सांभाळून ठेवण्यासाठी आल्याची मदत होते. त्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्यादेखील खूप कमी होते. आल्याचा वापर केल्यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरणास गती मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
दीर्घकाळचा ताण केसगळतीसह टाळू आणि केसांच्या विविध समस्यांशी जोडलेला असतो. आल्यामध्ये अनुकूल गुणधर्म असतात; जे शरीराला तणावाचा सामना करण्यासाठी मदत करतात. आल्याच्या चहाचे सेवन केल्याने एकूणच ताण कमी होण्यास हातभार लागतो. संतुलित आहार आणि योग्य केसांची निगा राखण्याच्या पद्धतींसोबत तुमच्या दिनचर्येत आल्याच्या चहाचा समावेश केल्याने टाळूच्या आरोग्यास हातभार लागू शकतो आणि टाळूच्या सामान्य समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आल्याचा चहा पिण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्याच्या दृष्टीने तुमच्या दिनचर्येत आल्याचा समावेश करण्याचे इतर मार्ग शोधू शकता. जसे की, केस स्वच्छ धुणे त्याचप्रमाणे आल्याचे तेल किंवा अर्क वापरल्याने टाळूला थेट फायदा होऊ शकतो. आले हे सर्वसाधारणपणे सेवनासाठी सुरक्षित मानले जात असले तरी काही आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी किंवा विशिष्ट औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन डॉ. कपूर यांनी केले आहे.