100 Gram Beetroot Benefits: लाल बूंद पदार्थांच्या यादीत एक अष्टपैलू कंदमूळ नेहमी जोडलं जातं ते म्हणजे बीटरूट. अष्टपैलू म्हणण्याचं कारण असं की बीटाची ठराविक अशी तीव्र, उग्र चव नसते त्यामुळे गोडापासून ते चटकदार पदार्थांपर्यंत अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करता येतो. किसलेल्या बीटाचे लाडू, हलवा, ते मुंबईच्या चौपाटी सँडविचमध्ये उकडलेल्या बीटाचे काप, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बीटाला आहारात स्थान देऊ शकता. अगदीच काहीतरी भन्नाट करायचं असल्यास मागील काही काळात सोशल मीडियावर बीटाच्या पोळ्या सुद्धा हिट झाल्या होत्या तसेही सेवन करण्याचा पर्याय निवडू शकता. एकूण काय जर तुम्ही थोडा कल्पकतेने विचार केला तर बीटाचे पदार्थ मन न मोडता व नाक न मुरडता खाल्ले जातील. आता आम्ही बीट खाण्यावर इतका भर का देत आहोत तर याचं कारण तुम्हाला या लेखात समजेल. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला १०० ग्रॅम बीटरूटचे फायदे, त्यासंबंधित काही लक्षात ठेवायच्या गोष्टी याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार आपण बीटाचे सेवन का करावे हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीटरूटचे पौष्टिक प्रोफाइल

१०० ग्रॅम कच्च्या बीटरूटचे पोषण प्रोफाइल खालीलप्रमाणे-

  • कॅलरीज: 43 kcal
  • कार्ब्स : 9.56 ग्रॅम
  • फायबर: 2.8 ग्रॅम
  • साखर: 6.76 ग्रॅम
  • प्रथिने: 1.61 ग्रॅम
  • फॅट्स : 0.17 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स (B1, B2, B3 आणि B5 सह)
  • कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज

बीटरूटचे आरोग्य फायदे

  1. हृदयाचे आरोग्य: बीटरूटमधील नायट्रेमुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारू शकते. परिणामी हृदयाच्या आरोग्यास मदत मिळू शकते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होऊ शकतो.
  2. ऊर्जा वाढीसाठी उपयुक्त: बीटरूटमधील नायट्रेट्स ऑक्सिजनच्या वापरामध्ये सुधारणा करून शरीराची ऊर्जा वाढवू शकतात, ज्यामुळे शारीरिक हालचालींची क्षमता आणि शरीराची एकत्रित सहनशक्ती वाढते.
  3. पाचक आरोग्य: बीटरूटमधील फायबर निरोगी पचनास प्रोत्साहन देते, बद्धकोष्ठता कमी करून,आतड्यांच्या आरोग्यास मदत होऊ शकते.
  4. दाहक-विरोधी गुणधर्म: बीटरूटचे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात, संधिवात सारख्या परिस्थितीसाठी बीटाचे सेवन फायद्याचे ठरते.
  5. यकृताचे डिटॉक्सिफिकेशन: काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की बीटरूट मधील बेटाइन यकृताच्या कार्यास आणि डिटॉक्सिफिकेशनला मदत करते.
  6. मेंदूचे आरोग्य: बीटरूटमधील नायट्रेट्स मेंदूला रक्त प्रवाह वाढवून कार्यक्षमतेवर उत्तम प्रभाव टाकू शकतात.

मधुमेह असल्यास बीटरूटचे सेवन करू शकता का?

सिंघवाल सांगतात की, मधुमेह असलेल्या व्यक्ती बीटरूटचे सेवन करू शकतात, परंतु प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बीटरूटमधील मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र या संदर्भात तुमची अचूक आरोग्यस्थिती माहित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

बीटरूट गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे का?

सिंघवाल यांच्या मते, बीटरूट गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण ते फोलेटसह आवश्यक पोषक तत्त्वे पुरवते, जे गर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, संयम महत्वाचा आहे तसेच, गर्भवती महिलांनी संतुलित आहार घेण्यावर भर द्यायला हवा.

हे ही वाचा << १८ वर्षीय विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने कोचिंग क्लासमध्येच मृत्यू! कमी वयात हृदयविकार का होतात, लक्षणे कशी ओळखाल?

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • काही व्यक्तींना बीटरूटची ऍलर्जी असू शकते, त्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रियांपासून सावध रहा.
  • बीटरूटमधील नैसर्गिक शर्करा सामान्यत: चिंतेचा विषय नसला तरी, साखरेच्या सेवनाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले असताना अधिक प्रमाणात बीटरूटचे सेवन टाळावे.
  • बीटरूटमधील अँटीऑक्सिडंट्सआरोग्यसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, यामुळे अनेकदा बीटरूट हा कर्करोगासाठी औषधी असल्याचे मानले जाते पण अद्याप असे ठोस पुरावे समोर आलेले नाही. बीटरूट शरीराला फायदे पुरवत असला तरी कर्करोग पूर्णपणे बरा करू शकत नाही.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can eating 100 grams beetroot cure cancer does beet boost blood sugar diabetes care constipation remedies check benefits svs
First published on: 23-01-2024 at 15:20 IST