Heart Attack Prevention Pill: हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना अशी एखादी गोळी असावी की जी घेतली की हार्टअटॅक, कार्डियाक अरेस्ट सर्वच धोके कमी होतील असं अनेकदा वाटतं, हो ना? डॉ निशीथ चंद्रा, मुख्य संचालक, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्ली यांनी सुद्धा इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात आपल्या रुग्णांकडून विचारल्या जाणाऱ्या अशाच प्रश्नांविषयी माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात की, “माझे अनेक असे रुग्ण आहेत जे आपल्या बाळाला सुद्धा ७५ ते १०० मिलिग्रॅम ऍस्पिरिन देऊ का असा प्रश्न करतात. पण मी सगळ्यांना एवढंच म्हणतो की, जर तुम्ही तुमचा उच्च रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल तुमच्या जीवनशैलीत बदल करून नियंत्रणात आणू शकत असाल तर तुम्हाला कुठल्याच गोळ्या घेण्याची कधीच गरज पडणार नाही.”

ऍस्पिरिन कसं काम करतं?

ऍस्पिरिन मध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आहेत. हृदयाला जोडलेल्या धमन्यांमध्ये अनेकदा प्लेकमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते जी कमी करण्यासाठी ऍस्पिरिनची मदत होऊ शकते. पण या गुणधर्मामुळे पचनमार्गात अल्सर किंवा रक्तस्त्राव होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे ६० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना हृदयविकाराच्या प्राथमिक प्रतिबंधासाठी ऍस्पिरिन खाल्ल्याने ‘फक्त’ फायदाच होईल असे सांगता येत नाही आणि ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी तर प्राथमिक प्रतिबंधासाठी ऍस्पिरिन अजिबात घेऊ नये.

बेबी ऍस्पिरिन रक्ताच्या प्लेटलेट्स गोठण्याची प्रक्रिया कमी करते, रक्त पातळ करते. परंतु यामुळे काहीवेळा तुम्हाला अधिक सहजपणे रक्तस्त्राव होऊ शकतो. तुम्हाला नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो, हिरड्यांमधून रक्त येऊ शकते आणि जखमा किंवा कापले गेल्यास रक्तस्त्राव थांबायला सामान्यपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

अभ्यास काय सांगतो?

गेल्या महिन्यात, वैद्यकीय जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या तीन क्लिनिकल चाचण्यांचा डेटा सांगतो की, हृदयविकारापासून बचाव म्हणून ऍस्पिरिन घेतलेल्या गटामध्ये आणि ज्यांनी घेतले नाही त्यांच्यात फार फरक दिसून आला नाही. संशोधनात यूएस, यूके आणि ऑस्ट्रेलियासह १० देशांमधील ४७,००० हून अधिक रुग्णांचा समावेश होता.

मागील काही कालावधीत वाढत्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, काही गोळ्या या फायद्यांपेक्षा अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोकाच जास्त वाढवतात. अनेक अभ्यास एकत्र करून, गेल्या काही वर्षांत हृदय विकार थांबवण्यासाठीच्या प्राथमिक प्रतिबंधावरील अनेक नियम बदलले गेले आहेत. आता हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आल्यावरच ऍस्पिरिन देण्याची मुभा असते आणि त्यातही रुग्णाची संपूर्ण आरोग्य स्थिती आधी अभ्यासावी लागते. केवळ हृदयविकार येऊ नये म्हणून ऍस्पिरिन घेणे व किंवा घेण्याचा सल्ला देणे हे चुकीचे ठरते.

JAMA नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, दररोज कमी प्रमाणात ऍस्पिरिनचा डोस घेतलेल्या निरोगी प्रौढांमध्ये सुद्धा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले होते. त्या तुलनेत या व्यक्तींना स्ट्रोकपासून मिळालेली सुरक्षा तितकी ठोस नव्हती. विशेषतः वृद्ध गट ज्यांना हृदयविकाराचा इतिहास नाही किंवा स्ट्रोकची कोणतीही चिंताजनक चिन्हे किंवा लक्षणे दिसून येत नव्हती त्यांनी एस्पिरिन घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

ऍस्पिरिनऐवजी डॉक्टर काय निवडतात?

उच्च रक्तदाब, रक्तातील साखर आणि उच्च कोलेस्टेरॉल अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी ऍस्पिरिनवर कमीत कमी अवलंबित्व असायला हवे. अर्थात, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी एखाद्याने स्टॅटिनच्या मूल्यावर जोर दिला पाहिजे.

हृदयरोगतज्ज्ञ हल्ली ऍस्पिरिनऐवजी क्लोपीडोग्रेलचा पर्याय अधिक फायदेशीर असल्याचे सुद्धा सांगत आहेत. सामान्य प्रौढांसह ज्यांचे कोरोनरी स्टेंटिंग पूर्ण झाले आहे व यशस्वीरित्या दुहेरी अँटीप्लेटलेट थेरपी पूर्ण केली आहे त्यांना सुद्धा या गोळीचा फायदा होऊ शकतो. क्लोपीडोग्रेल घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सुद्धा कमी होतो.

हे ही वाचा<< एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?

तात्पर्य काय तर आतापर्यंत तुम्हाला हृदयविकाराची स्थिती अनुभवावी लागली नसेल तर उगाच ऍस्पिरिन घेण्याची सवय लावू नका. त्याऐवजी, जीवनशैलीत सुधारणा करून आहार, व्यायामाच्या माध्यमातून रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणते औषध किती दिवस घ्यावे याबद्दल हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

Story img Loader