Ear Lobe Heart Attack: सोशल मीडियावर अनेक स्वयोमघोषीत तज्ज्ञ डॉक्टरांकडून काही वेळा चुकीच्या पद्धतीने माहिती प्रसारित केले जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. अलीकडेच अशीच एक रील खूप चर्चेत आली होती आपणही कदाचित इन्स्टाग्रामवर ही रील पाहिली असेल ज्यामध्ये असे म्हटले आहे की हृदयविकाराचा झटका किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे पहिले लक्षण तुमच्या कानाच्या पाळीमध्ये दिसून येते. कानाच्या पाळीमध्ये एक क्रिज म्हणजे कापल्यासारखी खूण असते आणि ती तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा महत्त्वाचा संकेत आहे असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या दाव्यात खरोखरच काही तथ्य आहे का? हे आज आपण ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि SAAOL हार्ट सेंटरचे संचालक, डॉ. बिमल छाजेड यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखातून जाणून घेणार आहोत..
‘इअर लोब क्रीझ थिअरी’ म्हणजे काय व ती चर्चेत का आली?
‘इअरलोब क्रिझ’ म्हणजेच कानाच्या पाळ्यांवरील रेषेसारखे चिन्ह किंवा कापल्यासारखी खूण आधीपासून ‘फ्रँकचे चिन्ह’ म्हणून ओळखले जाते, हे नाव सँडर्स फ्रँक या अमेरिकन डॉक्टरच्या नावावर ठेवले गेले ज्याने प्रथम या चिन्हविषयी वर्णन केले होते. या विषयावर किमान ४० अभ्यास झाले आहेत परंतु कानाच्या लोबमधील दुमडणे आणि एथेरोस्क्लेरोसिसचा (हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराचा) वाढता धोका यांच्यातील वैद्यकीय संबंध सिद्ध झालेले नाही.
एथेरोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे जेथे प्लेक जमा झाल्यामुळे तुमच्या धमन्या बंद होतात. हृदय आणि कानाच्या दोन्ही भागांना शेवटच्या धमन्यांद्वारे पुरवठा केला जातो, म्हणून असा समज आहे की एकदा रक्तपुरवठा कमी झाला की कानाच्या पाळ्या प्रभावित होतात. काही तज्ज्ञांनी असा सिद्धांत मांडला की कानाच्या पाळ्यांची क्रीझ वृद्धांमध्ये इलास्टिन आणि लवचिक तंतूंच्या कमतरतेशी संबंधित आहे. हेच सर्व रक्तवाहिन्यांना लागू होते, अगदी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना सुद्धा म्हणूनच कानाच्या पाळीचा संबंध हृदय विकार व रक्तवाहिन्यांचे आजार यांच्याशी जोडला जातो.
२०२१ च्या अभ्यासात असे आढळून आले की कानाच्या पाळीचा फोल्ड आणि कोरोनरी धमनीचे विकार असलेल्या लोकांमध्ये अॅड्रोपिन आणि इरिसिनची पातळी कमी असते. प्रथिने, तसेच क्लोथो हार्मोनची पातळी कमी असल्यास सुद्धा ही स्थिती उद्भवू शकते. प्रत्येक प्रकारच्या पेशींच्या नुकसानामध्ये समानता आहे परंतु सर्व सिद्धांत सिद्ध झाल्याशिवाय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी ही धोक्याची घंटा मानता येणार नाही.
डॉ. बिमल छाजेड यांनी याविषयी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात स्पष्टीकरण देत म्हटले की, अशा मिथकांना दूर करणे अत्यावश्यक आहे कारण सतत चुकीच्या माहितीचे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कानाची पट्टी, फट किंवा अंतर यांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) शी कोणताही सिद्ध संबंध नाही. हृदयविकाराला कारणीभूत जोखीम घटक ओळखायचे असल्यास सिद्ध निकषांचाच आधार घ्यावा.
डॉ. छाजेड पुढे लिहितात की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार ही अनुवंशिक स्थिती असू शकते. तसेच जीवनशैली, आहार आणि वैद्यकीय इतिहास यासारखे अनेक घटक यात भर पाडू शकतात. जरी काही बाह्य चिन्हे पाहून आपण समस्या ओळखू शकत असाल तरी कानाच्या पाळीचा हृदयाच्या आरोग्याशी संबंध नाही. हृदयविकाराच्या विश्वसनीय निर्देशकामध्ये रक्तदाब, कोलेस्टेरॉल, कौटुंबिक इतिहास, जीवनशैलीतील विसंगती, मधुमेह, मूत्रपिंडाचे कार्य अशा लक्षणांचा व त्रासांचा समावेश होतो.
त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी धूम्रपान, चुकीची आहार पद्धत, बैठी जीवनशैली आणि अनुवांशिक पूर्वस्थिती यासारख्या जोखीम घटकांबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणीवर भर देणे, वैद्यकीय सल्ला घेणे आणि पुराव्यावर आधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे कोणत्याही प्रभावी सार्वजनिक आरोग्य धोरणाचे आवश्यक घटक आहेत व आपणही त्यावरच भर द्यायला हवा.