झपाट्याने बदलणाऱ्या या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली येत असतो. आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे माणूस तणावग्रस्त होतो. यावर अनेक उपाय डॉक्टर सुचवतात, मात्र तणाव दूर करण्यासाठी मिठीची, स्पर्शाची आणि मसाजची काय भूमिका आहे, या संदर्भात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
जे शब्दातून व्यक्त करता येत नाही ते मिठीत व्यक्त करता येतं. आपल्या भावना काहीही न बोलता व्यक्त करण्याचे मिठी हे प्रभावी माध्यम आहे. जर तुम्ही खूप तणावात असाल, तुम्हाला तो तणाव असह्य झाला असेल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीने मिठी मारली की तुम्हाला मानसिक आधार मिळून बरं वाटायला लागतं. तणाव असल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होऊ शकते. पण, मिठी मारल्याने कॉर्टिसोल, तणावाची पातळी कमी होते. विशेष म्हणजे डोक्याला स्पर्श करणे हे मानसिक आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असल्याचे आढळून आले.
टच थेरपी काय आहे?
टच थेरपी म्हणजे शारीरिक स्पर्शाची एक भावना. ही थेरपी एक उपचार पद्धती आहे. ही थेरपी शरीराच्या व्हॅगस मज्जातंतूला सक्रिय करते. डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देण्यापासून ते मालिश या गोष्टी स्पर्श चिकित्सेचा भाग आहेत. आपण लहान मुलांना प्रेमाने मिठी मारतो, असे केल्याने त्यांना आपली सकारात्मक ऊर्जा मिळते. नकारात्मक ऊर्जेला आपल्या सकारात्मकतेद्वारे नष्ट केलं जाऊ शकतं. ही ऊर्जा हातांच्या माध्यमातून येते. स्पर्श चिकित्सा एक आध्यात्मिक चिकित्सा पद्धती आहे, याच्या मदतीने तणावमुक्त होता येतं.
लहान मुलांसाठी कोणती टच थेरपी
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या मुलांना पुरेसा शारीरिक स्पर्श होतो त्यांच्यात कॉर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव आणि चिंताही कमी होते. शिवाय हळुवार स्पर्श, डोक्यावरून हात फिरवणे यामुळे “प्रेम संप्रेरक” उत्तेजित होतात, ज्यामुळे बाळाची काळजी घेणाऱ्या नातेसंबंधात सुरक्षिततेची आणि विश्वासाची भावना निर्माण होते. मुले जसजशी मोठी होतात तसतसे त्यांच्या मानसिक विकासात शारीरिक स्पर्श महत्त्वाचा ठरतो. मिठी मारणे, खेळकर संवाद स्वीकृती आणि आपुलकीच्या भावना व्यक्त करतात, स्वाभिमान आणि भावनिक लवचिकता वाढवतात.
किशोरवयीन मुलांसाठी आत्मविश्वासाचं साधन
ही थेरपी किशोरवयीन मुलांसाठी आत्मविश्वासाचं साधन आहे. किशोरावस्थेच्या गोंधळाच्या काळात मुलांना मायेचा स्पर्श सुरक्षिततेची भावना देतो. संशोधनातून समोर आलं आहे की, सकारात्मक शारीरिक स्पर्शामुळे या वयोगटात मुलांमधील चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यातला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
हेही वाचा >> Navratri Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या…
मसाज थेरपी
मसाज थेरपी गर्भवती महिलांमध्ये वेदना कमी करते आणि जन्मपूर्व नैराश्य कमी करते. तसेच वृद्ध व्यक्तींनाही याचा फायदा होतो. एकटेपणाची भावना कमी होते आणि त्यांचे जीवनमान वाढते, त्यामुळे तुम्हीही शनिवार व रविवारी स्वतःसाठी आणि इतरांसाठी टच थेरपी वापरून पाहा.