मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. मासिक पाळीदरम्यान महिलांना खूप त्रास होतो, कोणाच्या ओटीपोटात प्रचंड दुखते, कोणाचे हात-पाय दुखतात, कोणाला उलटी होते. हा सर्व त्रास सहन करीत अनेक महिला आपले दैनंदिन कामकाज करताना दिसतात. मग ते घरातील असो किंवा ऑफिसमधील असो. त्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स.
मासिक पाळीदरम्यान महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर सुरू केल्यापासून महिलांना मासिक पाळीचा सामना करणे थोडे सोईस्कर झाले आहे. पण, सॅनिटरी नॅपकिन्स अनावश्यक कचरा निर्माण करतात आणि त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने महिला नवीन पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्ससाठी शाश्वत आणि स्वस्त पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कप (Menstrual cups) हे महिलांसाठी एक मोठे परिवर्तन ठरले आहे. पण काही लोक, “या कप्सचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने मूत्रपिंडांना दुखापत होऊ शकते”, असा अंदाज लावत आहेत. हे खरे आहे का हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.
नवी मुंबई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या सल्लागार डॉ. रेणुका बोरिसा सांगतात, “मेंस्ट्रुअल कप योनीमार्गात चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने मूत्रपिंडाला दुखापत होऊ शकते आणि ती खूप वेदनादायक असू शकते. परंतु, ती अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्राव गोळा करण्यासाठी योनीमार्गात मेंस्ट्रुअल कप ठेवला जातो. परंतु, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने त्याचा विपरीत परिणाम थेट मूत्रसंस्थेवर होऊ शकतो. मेंस्ट्रुअल कपची चुकीची स्थिती आणि संसर्गाचा धोका वाढल्यामुळे मूत्रपिंडाला दुखापत होऊ शकते.”
“मूत्रमार्गावर (urethra) दीर्घकाळ दाब राहिल्याने, कालांतराने मूत्र टिकून राहण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. मूत्रपिंडांवर वाढलेला हा दबाव शेवटी सर्वांत जास्त नुकसान करू शकतो. जर मेंस्ट्रुअल कप योग्यरीत्या स्वच्छ केला गेला नाही, तर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तो जास्त काळ आत ठेवल्यानेही मूत्रमार्गाच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो आणि जर त्याबाबत काळजी घेतली गेली नाही, तर मूत्रपिंडांसाठी आणखी वाईट स्थिती निर्माण होऊ शकते,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
जरी टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS) बहुतेकदा टॅम्पॉन्सशी (Tampons – मासिक पाळीदरम्यान रक्तस्राव शोषून घेणारे एक उत्पादन) संबंधित असतो. परंतु, जर ते योग्य रीतीनं वापरले नाहीत किंवा त्याबाबत योग्य ती देखभाल केली गेली नाही, तर तो त्रास मेंस्ट्रुअल कप वापरतानाही होऊ शकतो.
गुंतागुंत टाळण्यासाठी खबरदारी:
डॉ. बोरिसा यांनी मेंस्ट्रुअल कपसंदर्भातील संभाव्य समस्या टाळण्यासाठी सांगितलेल्या काही टिप्स खालीलप्रमाणे :
योग्यरीत्या घालणे आणि काढणे (Correct Insertion and Removal) : मेंस्ट्रुअल कप योनीच्या प्रवेशद्वाराच्या अगदी आत स्टेमसह ठेवला आहे याची खात्री करा. तो खूप उंचावर घालू नका आणि जास्त घट्ट करू नका. कारण- त्यामुळे अस्वस्थता किंवा आसपासच्या अवयवांवर दबाव येऊ शकतो.
मेंस्ट्रुअल कपची स्वच्छता (Cleanliness) : मेंस्ट्रुअल कप वापरण्यापूर्वी आणि नंतर नेहमी तो उकळून किंवा सुगंधविरहीत साबण आणि कोमट पाणी वापरून निर्जंतुक करा. योनीच्या भागात अॅलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करू शकणारी तीव्र रसायने टाळा.
वेळेवर काढणे (Timely Removal) : मेंस्ट्रुअल कपबरोबर येणाऱ्या इन्सर्टचा नेहमी संदर्भ पाहा आणि तो किती काळ आत ठेवता येईल यासाठीच्या आवश्यक त्या सूचनांचे पालन करा. “जर रक्तप्रवाह जास्त असेल तर ते कमी असेल तर दर १२ तासांनी तो रिकामे करावा.”
स्वच्छता (Hygiene) : मेंस्ट्रुअल कप योनीमार्गातून बाहेर काढण्यापूर्वी किंवा आत घातल्यानंतर आपले हात नेहमीच चांगल्या रीतीने स्वच्छ करा; जेणेकरून जीवाणूंचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल..
टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.