Can lemon Juice Reduce Motion Sickness: पावसाळ्यात गाडी काढावी आणि मस्त दूरच्या सफरीवर सहलीसाठी जावं अशी अनेकांची इच्छा असते. घाटात प्रवास करताना आजूबाजूने कोसळणारे धबधबे पाहण्याची मज्जा काही औरच असते. एखाद्या मस्त व्ह्यू पॉईंटला जाऊन भजी, मॅगी खावी असा विचार करूनच तोंडाला पाणी सुटतं. पण जर एखाद्याला मोशन सिकनेसचा म्हणजेच गाडीत बसल्यावर मळमळ उलटीचा त्रास होत असेल तर पिकनिक राहिली बाजूला उलट प्रवास म्हणजे अक्षरशः वाईट अवस्था होते. याच मोशन सिकनेसवर लिंबाच्या रसाचा सुगंध कशी मदत करू शकतो हे आता आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंबाच्या रसाचा फायदा (Lemon Juice Benefits)

स्पर्श हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. प्रणव होन्नावरा श्रीनिवासन यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “मोशन सिकनेस म्हणजेच गाडी लागणे/ गाडीत मळमळ, उलट्या होणे याचे प्रमाण कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा सुगंध मदत करू शकते. लिंबूवर्गीय फळांचा सुगंध हा मध्यवर्ती मज्जासंस्थेला शांत करू शकतो. लिंबाच्या रसामध्ये लिमोनेन आणि सायट्रल सारखी संयुगे असतात, ज्यांचा मूडवर प्रभाव पडतो आणि मळमळ कमी करण्यास मदत होते. डॉ. होन्नावरा असेही सांगतात की, श्वास घेताना लिंबाच्या रसातील ही संयुगे घाणेंद्रियाला उत्तेजित करू शकतात, ज्यामुळे मळमळीपासून आराम मिळतो. लिंबाच्या रसाचा ताजा आणि स्फूर्तिदायक सुगंध मोशन सिकनेसमुळे येणाऱ्या अस्वस्थतेपासून मेंदूचे लक्ष विचलित करून मळमळ होण्याची शक्यता कमी करू शकतो.

लिंबाच्या रसाचा फायदा मळमळ थांबवण्यासाठी होतो याचा पुरावा काय?

डॉ. श्रीनिवासन यांनी ठामपणे सांगितले की, या विशिष्ट उपायावरील वैज्ञानिक संशोधन मर्यादित आहे. पण अनेक अभ्यासांमध्ये लिंबाच्या रसाचा प्रभाव मान्य करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, काही संशोधनात असे दिसून आले आहे की लिंबाचा अर्क असलेल्या सुगंधी तेलाचा वास घेतल्याने पोस्टऑपरेटिव्ह (शस्त्रक्रियेनंतर) रूग्णांमध्ये मळमळ आणि उलट्या कमी होऊ शकतात, ज्यामुळे मोशन सिकनेससाठी देखील याचा फायदा होण्याची शक्यता असते. लिंबाच्या तेलाचे अँटी बॅक्टरीअल व अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म सुद्धा त्याची प्रभावी क्षमता वाढवू शकतात. मात्र हे फायदे सिद्ध होण्यासाठी अधिक क्लिनिकल तपासण्या होण्याची गरज आहे.

गाडीच्या प्रवासात मळमळ होत असल्यास उपाय (फोटो: Freepik)

लिंबाच्या रसाचा सुगंध इतर उपायांच्या तुलनेत किती प्रभावी आहे?

डॉ. श्रीनिवासन यांनी सांगितले की, आल्याचे सेवन किंवा ऍक्युप्रेशर बँड सारख्या उपायांच्या तुलनेत लिंबाच्या रसाचा उपाय वेगळा ठरतो. आल्यातील अँटीमेटिक गुणधर्म मळमळ व उलट्या कमी करण्यासाठी मदत करू शकतात. आलं आतड्यांमधील सेरोटोनिन रिसेप्टर्सना अवरोधित करते ज्यामुळे मोशन सिकनेस कमी होण्यास मदत होऊ शकते. तर, एक्यूप्रेशर बँड हा मनगटावरील P6 (नेगुआन) बिंदूवर दाब देतो, ज्यामुळे मज्जातंतूंना उत्तेजना मिळून मळमळ कमी होते असे मानले जाते. या दोन्ही उपायांच्या तुलनेत लिंबाच्या रसाचा प्रभाव लवकरात लवकर दिसू शकतो. आलं बायोकेमिकल मार्गाने प्रभाव दाखवतं तर ऍक्युप्रेशर बँड शारीरिक मार्गाने प्रभावी ठरतं, दोन्ही पद्धतीचे प्रभाव हे वैयक्तिक संवेदनशीलता व प्राधान्यानुसार बदलू शकतात.

हे ही वाचा<< श्रावणात कोणती धान्य व फळे खाल्ल्याने शरीराला होतो फायदा? आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या मीठ- मसाला वापरण्याच्या टिप्स वाचा

लिंबाच्या रसाच्या वापराचे काही तोटे आहेत का?

मोशन सिकनेसवर उपचार म्हणून लिंबाच्या रसाचा सुगंध घेणे हा सामान्यतः सुरक्षित मानले जाते. डॉ. श्रीनिवासन यांनी सुद्धा याची पुष्टी केली. मात्र लिंबूवर्गीय फळांची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी प्रतिक्रिया टाळण्यासाठी हा उपाय टाळावा. याव्यतिरिक्त, लिंबूवर्गीय सुगंधांच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्याने काहींना डोकेदुखी किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. कृत्रिम सुगंधापेक्षा नैसर्गिक लिंबाचा रस किंवा तेल वापरावे. अचानक होणारा त्रास टाळण्यासाठी कोणतेही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can lemon juice reduce motion sickness monsoon trip if you feel like vomiting in bus keep use citrus scene benefits of lemon svs