Mango Skin Benefits: उन्हाळ्यात महाराष्ट्रातच नव्हे तर देश- विदेशातही आंब्याचे राज्य असते. मँगो शेक, मँगो आइस्क्रीम आणि अगदीच काही नाही तर नुसता आंबा कापून खाणे सुद्धा स्वर्गसुख मानले जाते. पण म्हणतात प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तशा आंब्याच्या बाबतही काही समजुती आहेत. आज त्यातील एक सर्वात मोठी शंका आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आंबा खाल्ला की चेहऱ्यावर आंबे (मुरूम, पुरळ) येतात असे आपणही ऐकून असाल. बहुधा तुम्हीही असा अनुभव घेतला असेल. पण खरोखर आंबे खाल्ल्याने पिंपलची समस्या उद्भवते का की हा निव्वळ योगायोग म्हणता येईल हे जाणून घेऊया.
पोषणतज्ञ रितू खनेजा यांनी इंस्टाग्राम पेज ‘rightkcalories_by_ritukhaneja’ वरील पोस्टमध्ये आंब्यामुळे त्वचेवर नेमका काय प्रभाव होतो हे सांगितले आहे. यानुसार आंब्याचे त्वचेसाठी फायदे पाहुया..
१. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात. हे त्वचेच्या आतील थरांमधून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, व त्वचेला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवते.
२. आंबा खाल्ल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊ शकतात. ‘न्यूट्रिएंट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की आंब्यामध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण अधिक असते यामुळे एपिडर्मल हार्मोन्स वाढवून वय वाढण्याची चिन्हे कमी होण्यास मदत होते.
३. आंबा कोलेजन उत्पादनास मदत करतो. आंब्यामध्ये असलेले कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि मॅंगीफेरिन, कोलेजनमध्ये सुधारणा करू शकतात.या कोलेजनमुळे त्वचेत पांढऱ्या पेशी विकसित होऊन नितळ पारदर्शकता येऊ शकते.
४. आंबा त्वचेचे सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आंब्यातील बीटा-कॅरोटीन आणि इतर कॅरोटीनॉइड्स UV-किरणांपासून त्वचेला जपून ठेवतात.
आंबा खाल्ल्यावर पिंपल का येतात? (Why Pimple Occur After Eating Mango)
माफक प्रमाणात आंबा खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. पण आंबा खाल्ल्यानंतर काही लोकांना पुरळ का होतात? पोषणतज्ञ रितू खनेजा स्पष्ट करतात की “आंब्यामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे इंसुलिन प्रतिरोधक लोकांना पिंपल वाढल्याचे जाणवू शकते. याचा अर्थ असा होतो की ते रक्तातील साखर वाढवते. फक्त आंबाच नाही तर उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कोणतेही पदार्थ (चॉकलेट, गोळ्या, पेस्ट्री, जंक फूड इ.) खाल्ल्यास आपल्या शरीरात ब्लड शुगर वाढू शकते व त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेतील तेल ग्रंथींवर होतो ज्यामुळे आंब्याच्या हंगामात पिंपल वाढतात.”
हे ही वाचा<< वजन व डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी दिवसाला किती कप चहा, कॉफी प्यावी? डॉक्टर सांगतात…
तरीही आंब्याचे सेवन मर्यादित करणे चांगले आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या)