भारतातील मुख्य अन्न म्हणजे भात. अनेकांना भाताशिवाय जेवणच जात नाही किंवा जेवणाच्या ताटात भात नसेल, तर ते अपूर्ण वाटतं. भात अनेक प्रकारे शिजवून खाल्ला जातो. भात खाणं बहुतांश भारतीयांना आवडतं. काही लोक त्यांच्या आहारात चपातीऐवजी केवळ भाताचा समावेश करतात. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं; तर काही जण राजमा-राइसचे चाहते असतात. कोकण, तसेच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो. काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणं जवळपास अशक्यच. पण, भात खाल्ल्यानं खोकला होऊ शकतो का? तज्ज्ञ डॉ. जमाल ए खान यांनी विषयावर माहिती दिल्याचं वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

तांदूळ हा जगातील सर्वांत प्रमुख आहार आहे आणि तो अनेक प्रकारे शिजवला व खाल्ला जातो. हा खाद्यपदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तर भात खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण आजारी पडलो की, काहीतरी हलकं जेवण जेवण्याला आपण प्राधान्य देतो. त्यातल्या त्यात आपण डाळ-भात जास्त प्रमाणात खात असतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? भात खाल्ला, तर सर्दी-खोकला होऊ शकतो का, यावर डाॅक्टर काय सांगतात, ते जाणून घेऊ.

(हे ही वाचा: आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या )

डाॅक्टर म्हणतात, “तांदूळ हा एक चांगला अन्नस्रोत आहे. गव्हामुळे काहींना ग्लुटेन अॅलर्जी होऊ शकते; पण तांदळामुळे कोणतीही अॅलर्जी होत नाही.” भातामुळे खोकला होत नाही किंवा तो वाढत नाही, असा विश्वास असल्याचे डाॅक्टर म्हणतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये तो विशिष्ट कारणांमुळे खोकल्याला कारणीभूत ठरू शकतो. उदाहरणार्थ- जर तांदूळ अयोग्यरीत्या शिजविला गेला असेल किंवा त्यात दूषित घटक असतील, तर त्यामुळे संभाव्यतः घशात जळजळ होऊ शकते. जेवताना भाताचे बारीक कण श्वासनलिकेत अडकल्यानंही खोकला होऊ शकतो.

“तांदूळ लवकर खाल्ल्यास किंवा घशात अडकल्यास खोकला होऊ शकतो. साधारणपणे ही उदाहरणं दुर्मीळ आहेत. बहुतेक लोकांसाठी तांदूळ हे सुरक्षित अन्न मानलं जातं. जर तुम्हाला आधीच खोकला असेल, तर तुम्हाला चांगल्या रीतीनं गुळण्या (गार्गल) करून घसा साफ करावा लागेल. पण, तांदळामुळे खोकला होऊ शकत नाही. अन्न गिळायला सोपं आहे आणि आरामदायी पोषण देतं. तुम्हाला फक्त ते हळूहळू खावं लागेल आणि चघळावं लागेल. ते गिळू नका”, असंही डॉक्टरांनी सांगितलं.