Heart attack : तुम्ही शारीरिक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधी सातत्याने घेता का? जर हो, तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. पेनकिलरच्या दीर्घकाळ वापरामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते. रक्तातील प्लेटलेट्समध्ये अडथळा निर्माण शकतो, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊ शकतो; ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. या सर्व हृदयाशी संबंधित धोकादायक बाबी औषधींमुळेही उदभवू शकतात.
आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी औषधे आवश्यक आहेत; पण काही वेळा याचे हृदयावर दुष्परिणाम दिसू शकतात. त्यामुळे कार्डिओमायोपॅथी होऊ शकते. कार्डिओमायोपॅथी हा हृदयरोग आहे; जो हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे हृदयाला शरीराच्या इतर अवयवांना रक्त पुरविणे आणखी कठीण होऊन बसते.
औषधांचा हृदयावर कसा परिणाम होतो? आणि हा धोका कसा टाळता येतो याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळूरू येथील ग्लेनेगल बीजीएस हॉस्पिटलचे विभागप्रमुख व इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्रनाथ रेड्डी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औषधांचा हृदयावर कसा परिणाम होतो?

औषधे हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम करतात. अतिऔषधांच्या सेवनाने हृदयाचे ठोके अनियमित होतात. काही औषधे हृदयाच्या पेशींनासुद्धा हानी पोहोचवू शकतात; तर काही औषधे हृदयावर परिणाम करतात. उदा. द्रवपदार्थ टिकवून ठेवणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन किंवा रक्तदाब वाढवणे इत्यादी.

१. केमोथेरपी एजंट : अँथ्रासायक्लिन (anthracyclines) आणि ट्रॅस्टुझुमॅब (trastuzumab)सारखी औषधे कार्डियोटॉक्सिसिटीसाठी (cardiotoxicity) कारणीभूत ठरतात. कार्डियोटॉक्सिसिटी म्हणजे हृदयाचे नुकसान होणे; ज्यामुळे हृदयाचे कार्य कमी होते आणि हृदय बंद पडण्याचा धोका वाढतो.

२. नॉन-स्टेरॉइडल अँटी-इम्फ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) : ही औषधे अनेकदा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी वापरली जातात. पण त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका आणखी वाढू शकतो

३. ॲरिथिमिक औषधे : हृदयाचे अनियमित ठोके पडण्यात सुधारणा होण्यासाठी घेत असलेल्या ॲरिथिमिक (Antiarrhythmic) औषधांमुळे काही वेळा प्रो-ॲरिथमिया (proarrhythmia) होतो. प्रो-ॲरिथमिया म्हणजे हृदयाचे अनियमित ठोके आणखी तीव्रतेने वाढणे होय.

४. मधुमेहावरील काही औषधे : मधुमेहावरील काही औषधांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

५. कॉर्टिकोस्टिरॉइड्स (Corticosteroids) : या औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने द्रवपदार्थ जास्त वेळ रक्तवाहिन्यांमध्ये टिकून राहतात आणि त्यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो.

६. माइटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन : कोकेनसारख्या पदार्थांमुळे मायटोकॉन्ड्रिया (mitochondria) किंवा हृदयाच्या पेशींच्या ऊर्जास्रोतांवर परिणाम होतो आणि त्यांचे नुकसान होते.

७. हायड्रॅालाझिन : हायड्रॅालाझिन (hydralazine)सारखी काही औषधे जसे की, हे शरीरातील निरोगी पेशी खराब करतात

८. अँटीसायकोटिक्स (Antipsychotics) : क्लोझापाइन (clozapine) व ओलान्झापाइन (olanzapine) सारखी औषधे हृदयाचे ठोके अनियमित करतात.

९. इतर औषधे : मेथॅम्फेटामाइन, बीटा-ब्लॉकर्स व एसीई इनहिबिटरसारखी काही अँटीहायपरटेन्सिव्ह औषधे आणि सायक्लोस्पोरिनसारख्या इम्युनोसप्रेसंट्समुळे ठरावीक परिस्थितीत कार्डियोटॉक्सिक प्रभाव दिसू शकतो.

लक्षणे ओळखा

सतत थकवा येणे, धाप लागणे, घोट्याला सूज येणे, छातीत दुखणे किंवा औषध वापरल्यानंतर हृदयाचे ठोके अनियमित होणे यांसारखे लक्षणे वेळीच ओळखा. रक्त तपासण्यासाठी ईसीजी, इको-कार्डिओग्राम आणि कार्डियाक बायोमार्करसह नियमित आरोग्य तपासणी करा. त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या समस्या लवकर ओळखू शकता.

कोणाला असतो सर्वांत जास्त धोका?

औषधांमुळे कोणालाही हा धोका निर्माण होऊ शकतो; पण काही विशिष्ट वयोगटांतील लोकांना याचा जास्त धोका असतो. त्यामध्ये वयोवृद्ध रुग्ण, हृदयविकाराचे रुग्ण इत्यादी. अशी अनेक औषधे आहेत; ज्यामुळे हृदयावर ताण येण्याची शक्यता वाढते. कर्करोगावरील उपचार हे औषधांमुळे निर्माण होणार्‍या हृदयाशी संबंधित समस्यांचे सर्वांत सामान्य कारण आहेत.

हा धोका कसा टाळता येतो?

औषधे सांगण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णाच्या हृदयाशी संबंधित धोकादायक घटक तपासले पाहिजेत. रुग्णांना संबंधित हृदयाच्या दुष्परिणामांबद्दल आणि त्याविषयी काळजी घेण्यास सतर्क केले पाहिजे. डोसचे प्रमाण ठरवल्यास आणि उपचाराचा कालावधी मर्यादित केल्याने धोका कमी होण्यास मदत होते. तपासणीदरम्यान कार्डिओ टॉक्सिसिटीची सुरुवातीची लक्षणे शोधून, त्यावर वेळेत उपचार घेणे आ.वश्यक आहे. हृदयासाठी निरोगी आहार, नियमित व्यायाम व धूम्रपान टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can side effects of overusing medication cause heart attack read what expert said ndj