Chronic Disease : झोप ही चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. अपूर्ण झोपेमुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या उदभवतात.
जे दिवसातून फक्त पाच तास झोपतात, अशा ५० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना हृदयविकार, मधुमेह व कर्करोग यांसारखे दीर्घकालीन आजार होण्याचा धोका जास्त असतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PLOS मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी ५०, ६० व ७० वयोगटातील ७,८६४ ब्रिटिश कर्मचाऱ्यांवर अभ्यास केला. त्यांनी सुरुवातीला या कर्मचाऱ्यांचा वयाच्या २५ वर्षांपर्यंतचा झोपेचा वेळ मोजला.
मल्टिस्टेट मॉडेलचा वापर करीत त्यांनी याच कर्मचाऱ्यांचा ५० व्या वर्षी झोपेचा कालावधी किती आहे, हे तपासले. अभ्यासातून असे दिसून आले की, वयाच्या पन्नासाव्या वर्षी पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांचा दीर्घकालीन आजार होण्याचा धोका २० टक्क्यांनी वाढला आहे.

हेही वाचा : Heart Attack : महिलांमध्ये वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका; ‘या’ गोष्टी आहेत कारणीभूत 

संशोधकांच्या मते, ५०, ६० व ७० वयोगटातील लोकांना पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपल्यामुळे ३० ते ४० टक्क्यांनी बहुविकृतीचा (Multimorbidity) धोका वाढला आहे. बहुविकृती म्हणजे दोन किंवा दोन शपेक्षा जास्त आजार असणे. या आजारांमध्ये शारिरीक आणि मानसिक आजारांचा समावेश असू शकतो.

“जसे लोक मोठे होतात, तसे वयानुसार त्यांच्या झोपेच्या सवयी आणि वेळापत्रक बदलतात. डॉक्टर रात्री सात ते आठ तास झोपण्याचा सल्ला देतात. कारण- यापेक्षा जास्त किंवा कमी झोपेचा कालावधी दीर्घकालीन आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो”, असे या अभ्यासकांचे प्रमुख डॉ. सेव्हरिन साबिया (Dr. Severine Sabia )सांगतात.

रात्रीची चांगली झोप घेण्यासाठी डॉ. साबिया सांगतात, “बेडरूम शांत असावी आणि वातावरण प्रसन्न असावे. झोपण्यापूर्वी फोन, मोबाईल, टीव्ही पाहणे टाळावे. रात्रीचे जास्त जेवण करू नये. शारिरीक व्यायामामुळेसुद्धा चांगली झोप येऊ शकते.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can sleeping 5 hours or less cause chronic disease in 50 aged above people read what study said ndj