How to lose weight रोजचे धकाधकीचे जीवन आणि अनियमित जीवनशैली यांमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत आहेत. दरम्यान, हेच वजन कमी करण्यासाठी डिजिटल कन्टेंट क्रिएटर शुभ हमीरवासिया यांनी अलीकडेच वजन कमी करण्यासाठी तीन हॅक सांगितले आहेत. या हॅकपैकी एक म्हणजे भूक कमी करण्यासाठी पुदीना फ्लेवरची मिंटची गोळी, जी कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होते. मात्र, वजन कमी करण्यासाठी हा योग्य दृष्टिकोन आहे का? दी इंडियन एक्स्प्रेसने ही पद्धत प्रभावी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी चेन्नईच्या प्राग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पोषणतज्ज्ञ सांगतात, मिंटची गोळी खाल्ल्यानं वजन कमी होऊ शकत नाही. जर तुम्हाला दिवसाच्या ठरावीक वेळेस स्नॅक खाण्याची सवय असेल, तर मिंटची गोळी खाल्ल्यानं भूक तेवढ्यापुरती जाते. मात्र, अशा वेळी पॉपकॉर्न किंवा भाजलेले मखाना यांसारखे पदार्थ खाल्ले पाहिजेत. कारण- मिंटची गोळी तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर नाही. त्याच्या सेवनाने तुम्हाला पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे माउथ फ्रेशनर असण्याव्यतिरिक्त, मिंटची गोळी कोणतेही वास्तविक आरोग्यदायी फायदे देत नाही.

सध्याच्या काळात बहुतेक लोकांचे काम हे डेस्कवर बसून असते. मग, ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात. त्यात आजकालचे लोक फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. एकाच जागी बसून काम करणे, फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाणे अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लोकांच्या शरीरातील चरबी वाढते, पोट सुटायला लागते. लोक वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. मग जिमला जाणे, डाएट करणे अशा अनेकविध गोष्टी ते करत असतात. पण, कित्येकदा त्यांना दररोजच्या कामामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. मात्र, फिट राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही योगासने करू शकता.

जास्त फायबरयुक्त पदार्थ खा

आहारात जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जसे की फळे, भाज्या, धान्य आणि वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये. फायबर यांमुळे तुम्हाला पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते आणि पचनास मदत होते. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त खाण्यापासून दूर राहता.

शारीरिक क्रिया वाढवा

तुम्ही दिवसाला अधिक चालून तुमची दैनंदिन शारीरिक क्रिया वाढविणे महत्त्वाचे आहे. लिफ्टऐवजी पायऱ्या चढून किंवा नृत्य किंवा बागकाम यांसारख्या क्रियाकलापांमध्ये स्वत:ला गुंतवून तुम्ही हे साध्य करू शकता. नियमित हालचालींमुळे कॅलरी बर्न होतात आणि एकूणच आरोग्य सुधारते. वजन कमी होणे मूलत: बर्न कॅलरी विरुद्ध वापरलेल्या कॅलरी यांच्या संतुलनावर अवलंबून असते. म्हणून दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा.

अधिक ताकदीचे व्यायाम करा

अधिक ताकदीच्या व्यायामाने केवळ चयापचय वाढविणारे स्नायू तयार करण्यास मदत होत नाही, तर शरीरातील चरबी कमी होऊन शरीराची रचनादेखील सुधारते. वेटलिफ्टिंग, बॉडीवेट एक्सरसाइज किंवा रेझिस्टन्स बॅण्ड वापरणे यांसारखे व्यायाम प्रकार तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये समाविष्ट करा. स्नायू बळकट करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन किंवा अधिक दिवस चालणे, धावणे किंवा पोहणे यांसारख्या अॅरोबिक व्यायामाबरोबरच विविध व्यायाम प्रकार केले पाहिजेत.

ताण कमी करा

दीर्घकालीन तणावामुळे भूक लागते. परिणामी वजन वाढू शकते. यशस्वीरीत्या वजन कमी करण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. माइंड फुलनेससारख्या तणाव कमी करण्याच्या तंत्रांचा सराव करा, ध्यानधारणा, दीर्घ श्वासोच्छ्वास यांसारखे व्यायाम किंवा तुम्हाला आवडणाऱ्या छंदांमध्ये स्वत:ला गुंतवा. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ आणि सातत्य लागते. म्हणून संयम बाळगा आणि प्रत्येक गोष्ट आनंदाने करा.

Story img Loader