पावसाळ्यात अनेक जण बाहेरून भिजून आल्यावर, सर्दी झाल्यावर आराम मिळावा यासाठी किंवा अगदी तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर वाफ घेत असतात. मात्र, अशी वाफ घेताना तुम्ही तुमचे डोळे एखाद्या कापडाने झाकून घेता का? जर झाकत नसाल, तर तुमची सर्दी निघून जाईल, चेहऱ्यावर चमकही येईल; मात्र त्या वाफेचा त्रास डोळ्यांना होऊ शकतो, असे दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी, चेहऱ्यावर वाफ घेण्याबाद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला “पंचमहाभूतांपैकी डोळे हे अग्नी तत्त्वासह जोडलेले असतात. तर डोके हे जल किंवा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित असते. अग्नी तत्त्व असणाऱ्या डोळ्यांना गरम वाफ दिल्यास डोळ्यांची जळजळ होणे, अंधुक दिसणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात”, अशी माहिती देणारी कॅप्शन देण्यात आली आहे.

तर, गुडुची आयुर्वेदाचे [Guduchi Ayurved] डॉक्टर यमुना बी. एस. म्हणतात, “वाफ घेताना डोळे न झाकल्यास थेट वाफांमुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते. तसेच, डोळे लाल होणे, खुपणे, कोरडेपणा किंवा डोळ्यांवर ताण येण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात.”

हेही वाचा : जॉगिंग Vs उलट चालणे; दररोज उलट चालण्याचे कोणते फायदे असतात? लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….

चेहऱ्यावर वाफ घेताना डोळे झाकून घेतल्यास, अधिक आरामदायी अनुभव मिळू शकतो. तर, दमट-उष्ण हवामानामुळे डोळे संवेदनशील झाले असल्यास डोळ्यांवर रुमाल बांधण्यामुळे त्यांना आराम मिळू शकतो, असे शारदा हॉस्पिटलच्या ईएनटी विभागाचे एचओडी डॉक्टर रोहित सक्सेना सांगतात

डोळ्यांना वाफ लागल्याने तुमच्या डोळ्यांतील ओलावा नाहीसा होऊन, ते कोरडे होण्याची शक्यता असते. अशा कोरड्या डोळ्यांना त्यांचा ओलावा परत मिळण्यासाठी त्या व्यक्तीला आयड्रॉप्स किंवा इतर उपचारांची गरज भासू शकते. जर वाफेचे तापमान अधिक असेल, तर डोळे, पापण्या आणि डोळ्यांभोवतीची नाजूक त्वचा भाजू शकते अथवा त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचू शकते, असे डॉक्टर सक्सेना यांनी सांगितले आहे.

चेहऱ्यावर वाफ घेताना कोणत्या प्रकारचे कापड डोळ्यांवर बांधावे?

सुधा आयुर्वेदिक केंद्राच्या संस्थापक डॉक्टर सुधा अशोकन [Sudha Asokan] यांच्या म्हणण्यानुसार, चेहऱ्यावर वाफ घेताना म्हणजेच स्टीम थेरपीदरम्यान आपण कोणत्या प्रकारचे कापड निवडतो ते योग्य आहार निवडण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

१. सेंद्रिय कापड

मऊ, आरामदायी व डोळ्यांना त्रास न देणारे असे सेंद्रिय सुती कापड हे स्टीम थेरपीदरम्यान वापरणे उत्तम पर्यायांपैकी एक आहे. अशा पद्धतीच्या कापडाची शुद्धता आणि आरामदायी गुणधर्म या बाबी आयुर्वेदिक मूल्यांशी उत्तम प्रकारे सांगड घालतात.

२. मलमलचे कापड

वजनाला अतिशय हलके आणि तलम असणारे हे कापड स्टीम थेरपीदरम्यान वाफेच्या, हवेच्या प्रवाहास मदत करते. त्यामुळे त्वचेला आराम मिळून, त्वचा तुकतुकीत होऊ शकते.

हेही वाचा : आफ्रिकेत खातात ‘डासांचा बर्गर’! आरोग्यासाठी कीटक किती फायदेशीर आहेत? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

डोळ्यांच्या आरोग्यावर स्टीम थेरपीचा कसा परिणाम होतो?

वाफ घेण्याचे फायदे हे श्वसनाशी संबंधित असले तरीही स्टीम थेरपीचा डोळ्यांवर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात यावरदेखील अभ्यास करण्यात आला आहे, असे डॉक्टर यमुना म्हणतात. याबाबतचा अभ्यास काय सांगतो ते पाहू…

१. डोळ्यांना उष्णता लागणे

अधिक काळ स्टीम थेरपी घेतल्याने वाफेची उष्णता डोळ्यांना जास्त वेळ लागल्यास, त्या उष्ण आणि दमट हवेने डोळे कोरडे होऊन, त्यांची जळजळ होऊ शकते.

२. भाजणे / उष्णतेमुळे त्वचेला इजा होणे [थर्मल इन्ज्युरी]

अभ्यासात असे दिसून आले आहे की, वाफ योग्य पद्धतीने न घेतल्यास चेहरा किंवा डोळे भाजले जाणे / पोळणे अशा प्रकारच्या थर्मल इन्ज्युरीज होण्याची संभावना असते.

त्यामुळे अनेकदा विविध अभ्यासांमधून स्टीम थेरपी घेताना डोळ्यांची काळजी घेण्याची आणि संबंधित धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची शिफारस केली जाते, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखामधून मिळते.