आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा मानला जातो. असे असले तरी या धावपळीच्या जीवनात बरेच लोक न्याहारी वगळतात; परंतु काही लोक असे आहेत की, सकाळी नक्कीच काहीतरी खायला आवडते. नाश्ता हे दिवसातील सर्वांत महत्त्वाचे जेवण असते हे अगदी खरे आहे. कारण- तुम्ही सकाळी जे खाता, ते तुमच्या शरीराला संपूर्ण दिवसाच्या कामकाजासाठी ऊर्जा देते. सकाळचा नाश्ता हा फक्त पोट भरण्यासाठी करू नका; तर जे काही खाता, त्यातून तुम्हाला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतील असा नाश्ता केला जाईल, असे बघा. नाश्त्यामध्ये भरपूर पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
बरेच लोक सकाळच्या नाश्त्यात अंडी, सॉसेज खाणे पसंत करतात. अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत; तसेच त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी हे प्रथिनयुक्त अन्न आहे. त्यामुळे अंडी खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करतात. अंड्यांमध्ये प्रथिने, तसेच निरोगी चरबी असतात ज्यामुळे शरीराला शक्ती मिळते. अंड्यांमध्येही अनेक जीवनसत्त्वे आढळतात. अंड्यांमुळे वजन कमी होतं हे अगदी खरं आहे. पण सकाळच्या नाश्त्यात अंडी, सॉसेजऐवजी अक्रोड खाल्ले, तर ते तुमच्या हृदयासाठी चांगले असू शकते का? नाश्त्याच्या वेळी काही दिवस अंडी बदलून, मूठभर काजू खाल्ल्यास हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग होण्याचा धोका १७ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो का? याच विषयावर आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
यूके जर्नल बायोमेड सेंट्रल (बीएमसी)मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार दिवसातून एक अंडे कमी खाणे आणि त्याऐवजी काजू खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका १७ टक्क्यांनी, मधुमेहाचा धोका १८ टक्क्यांनी कमी होऊ शकतो आणि २५ ते २८ ग्रॅम काजू खाल्ल्यास १५ टक्के मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. अर्थात, अंडीही तुमच्या हृदयासाठी सुरक्षित आहेत आणि हृदयाच्या रुग्णांसाठीही दिवसातून एक अंडे पुरेसे आहे, अशी माहिती समोर आली आहे.
(हे ही वाचा : गरोदरपणात नाशपती खाणं योग्य की अयोग्य? स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिलं उत्तर… )
काजू चांगला पर्याय आहे?
अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात अंडी किंवा सुक्या मेव्याने करतात. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण, या दोघांपैकी काय उत्तम आहे हे शोधणे कठीण आहे. निरोगी आहारासाठी लोक त्यांच्या आहारात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ समाविष्ट करतात. हे अन्नपदार्थ अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात; जे आपल्या विकासात आणि आपल्याला निरोगी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
बदाम, अक्रोड व पिस्ता यांसारखे सुक्या मेव्यातील पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कारण ते निरोगी चरबी, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे व लोहाने समृद्ध असतात. ते ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम व अँटिऑक्सिडंट्ससारख्या अनेक पोषक घटकांनीदेखील समृद्ध आहेत; जे आपले संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. काजू कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि ते लवकर पचते. काजू हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे तुम्ही अशक्तपणावर मात करण्यासाठी ते खाऊ शकता.
मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कहाळे सांगतात, “खरं तर २०२१ मधील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, दोन वर्षं दररोज सुमारे अर्धा कप अक्रोड खाल्ल्यानं कमी घनतेच्या लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि एकूण LDL कण आणि लहान LDL कणांची संख्या कमी होते.”
त्याशिवाय तुमच्याकडे अंडी असली तरीही नट हा सॉसेजसाठी चांगला पर्याय असू शकतो; जे प्रक्रिया केलेले मांस आहे. कोल्ड कट्स आणि नट (म्हणजे २८ ते ५० ग्रॅम) घेतल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका २७ टक्क्यांनी कमी झाला, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
अक्रोड खाणाऱ्यांचे हृदयाचे आरोग्य चांगले असते का?
ड्रायफ्रुट्समधून शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. काजू, बदाम, मनुका व खजूर यांमध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. अक्रोड हा असा सुका मेवा आहे; जो तुमच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. अॅडव्हेंटिस्ट स्टडी, आयोवा वूमेन्स हेल्थ स्टडी, नर्सेस हेल्थ स्टडी आणि फिजिशियन्स हेल्थ स्टडी अभ्यासातून ही बाब समोर आली की, अक्रोड खाल्ल्याने अचानक हृदयाच्या झटक्याने मृत्यू होण्याचा धोका ३० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
वरील दिलेल्या माहितीनुसार अनेक अभ्यासांतून बऱ्याच गोष्टी दिसून आल्या आहेत. खरे तर तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये मुबलक प्रमाणात असलेला आहार नियमितपणे घेणे आवश्यक आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.