प्रत्येकाला सुंदर, मुलायम केस हवे असतात; पण यासाठी केसांची खूप निगा राखावी लागते. पण बदलते वातावरण, धूळ, माती, प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. मग ऋतू कोणताही असला तरी ही समस्या अधिक वाढते. या समस्येपासून सुटण्यासाठी अँटीडँड्रफ शॅम्पू वापरतात, पण काही जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढते.
याच विषयावर डॉ. रश्मी शेट्टी रणवीर इलाहाबादिया यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी म्हटले की, कोंडा हा बुरशीजन्य आजार आहे. तुम्ही नियमित केस धुवत नसाल तर हा त्रास वाढतो. त्यामुळे नियमित केस धुतले पाहिजेत. नियमितपणे दररोज २१ दिवस तुम्ही केस धुतल्यास कोंड्याचा आजार आणखी बळावत नाही. पण तुम्ही आठवड्यातून फक्त दोनदाच अँटीडँड्रफ शॅम्पूने केस धुवत असाल तर या समस्येवर उपचार करता येणार नाहीत, असेही डॉ. शेट्टी म्हणाले.
डोक्यातील कोंडा किंवा सेबोरहाइक डर्माटायटिस हा एक सामान्य टाळूवर होणारा आजार आहे, जो यीस्ट मालासेझियाच्या अतिवृद्धीमुळे उद्भवतो, ज्यामुळे फ्लॅकिंग आणि डोक्यात खाज सुटते. नियमितपणे केस धुण्याने कोंड्याची समस्या कमी होते. तसेच कोंड्याचे गट्टे आणि टाळूवर जमा होणाऱ्या तेलाचे प्रमाणही कमी होते.
२१ दिवस दररोज शॅम्पूने केस धुण्याची सवय प्रत्येकासाठी प्रभावी ठरू शकत नाही. कारण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि जे एका व्यक्तीसाठी कार्य करते ते दुसऱ्यासाठी कार्य करू शकत नाही, असेही फरीदाबादमधील अमृता हॉस्पिटलचे सल्लागार त्वचाविज्ञान डॉ. सचिन गुप्ता म्हणाले.
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी २१ दिवस सतत केस धुणे किंवा शॅम्पू करणे हा तात्पुरता उपाय आहे; पण कोंड्याची ही समस्या कालांतराने वाढू शकते. द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या की, केस सतत धुतल्याने टाळूतील आवश्यक तेल निघून जाते, ज्यामुळे केसात कोरडेपणा येतो आणि खाज सुटते. केमिकल बेस्ड अँटीडँड्रफ शॅम्पूने २१ दिवस जास्त केस धुतल्याने केस ठिसूळ आणि भुरभुरे, रफ होऊ शकतात, असेही डॉ. कपूर म्हणाले.
कोंड्याची समस्या कशी हाताळायची?
कोंड्याचे व्यवस्थापन वैयक्तिक गरजा आणि स्थितीच्या तीव्रतेनुसार केले जाते. डॉ. गुप्ता यांनी नमूद केले की, सौम्य केसांच्या समस्येवर अँटीडँड्रफ शॅम्पू वापरा. जसे की केटोकोनाझोल, सेलेनियम सल्फाइड किंवा झिंक पायरिथिओनसारखी औषधे वापरणे आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रभावी ठरू शकतात. खूप दिवसांपासून केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.
त्वचारोगतज्ज्ञ तुम्हाला या समस्येवर चांगल्याप्रकारे सल्ला देऊ शकतात, यात तुम्हाला लोशन किंवा औषधे लिहून दिली जाऊ शकतात. पण, प्रत्येक व्यक्तीची टाळू आणि त्वचेची रचना वेगळी असते, ज्यानुसार डॉक्टरांकडून औषधे दिली जातात, असेही डॉ. गुप्ता म्हणाले. केसांची योग्य निगा राखण्यासाठी संतुलित आहार खाणे गरजेचे आहे, यामुळे टाळूसंबंधित समस्या दूर होऊ शकतात, असेही ते म्हणाले.