Bengaluru CEO Killed 4 Year Old Son: बंगळुरू स्थित आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअपच्या सीईओ सूचना सेठ यांच्यावर स्वतःच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, चार वर्षांच्या मुलाच्या तोंडावर उशी किंवा जाड कापड ठेवून मारण्यात आले ज्यात त्याचा श्वास कोंडून गुदमरून मृत्यू झाला असे कारण समोर आले होते. सूचनाने आपण हत्या केल्याचे आरोप फेटाळून लावले असले तरी यापूर्वीच्या एका पोलीस अहवालात तिने पतीसह बिघडलेल्या नात्याविषयी भाष्य केले होते. माध्यमांच्या अहवालानुसार सूचना हिने कुटुंबाला असे सांगितले होते की तिला तिच्या मुलाचा चेहरा पाहिला की नवऱ्यासह बिघडलेल्या नात्याची आठवण येते त्यामुळे तिने हत्या केलेली असू शकते. तर मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून बहुधा तिला तिच्या पतीमुळे मुलाचे नुकसान होईल अशी भीती वाटत होती म्हणून तिने हत्या केलेली असू शकते. असे असल्यास परिणामी हे पालकांद्वारे मुलांच्या हत्येच्या इतर प्रकरणांसारखेच आहे, ज्याला ‘फिलिसाइड’ म्हणून ओळखले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. शौनक अजिंक्य, मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ यांनी इंडियन एक्सस्प्रेसच्या लेखात पालकांच्या हिंसक वागणुकीमागील संभाव्य कारणे, भावनिक त्रास सहन करणाऱ्या मुलांमधील लक्षणे व चिन्हे व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली आहे.

पालक स्वतःच्या मुलांची हत्या करण्याचं पाऊल का उचलतात?

  1. तणाव आणि मनोविकृती: पालकांना त्यांच्या जीवनात विविध तणावांचा सामना करावा लागतो, जसे की आर्थिक अडचणी, नोकरीचा दबाव किंवा नातेसंबंधातील समस्या. जेव्हा हा ताण तणाव सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा अचानक हिंसक उद्रेक होतात. मनोरुग्ण पालक हा मुलासह प्रत्येकासाठी नक्कीच धोका असतो.
  2. खोट्या संरक्षणाची गरज: जेव्हा पालकांमध्ये मोठा वाद असतो, तेव्हा एका पालकाने दुसर्‍या पालकाका भावनिक हानी पोहोचवण्यासाठी मुलाची हत्या केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. काही संशोधनात असे दिसून आले आहे की जर एखाद्या पालकाला असे वाटत असेल की ते आपल्या मुलाला मृत्यूपेक्षा वाईट नशिबापासून वाचवत असतील तर ते ‘प्रेम व संरक्षणाच्या खोट्या भावनेतून’ खून करू शकतात.
  3. या पालकांनी स्वतःच्या बालपणी हिंसा किंवा अत्याचाराचा अनुभव घेतला असेल, तर त्यांच्या स्वतःच्या पालकत्वाच्या शैलीमध्ये हीच वृत्ती दिसण्याची शक्यता असते. त्यांनी स्वतःची वागणूक वेळीच न सुधारल्यास अत्याचाराचे चक्र कधीकधी पिढ्यानपिढ्या चालू राहू शकते.
  4. उदासीनता, चिंता, काहीवेळा नशायुक्त पदार्थांच्या वापराने मनोविकार बळावू शकतात. स्वत: च्या भावनांवर नीट नियंत्रण न ठेवल्यास या भावनाच त्यांना हिंसक वर्तन करण्यास प्रवृत्त करतात. आधीच भावनांनी काठोकाठ भरलेल्या डोक्यात मादक पदार्थांच्या सेवनामुळे आत्म-नियंत्रण बिघडून, हिंसक वर्तनाची शक्यता वाढते.
  5. आणि शेवटी एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पालक म्हणून वागण्याच्या कौशल्याचा अभाव. काही पालकांना पालकत्वाच्या धोरणांबद्दल योग्य शिक्षण किंवा मार्गदर्शन मिळालेले नसते, ज्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे, कसे जपावे , हाताळावे याविषयी संभ्रम असतो.

पालकांकडून होणाऱ्या त्रासाची कोणती लक्षणे व चिन्हे मुलांमध्ये दिसतात?

  1. मुलांच्या शरीरावर दिसणार्‍या अस्पष्ट किंवा संभाव्य जखमा, फ्रॅक्चर किंवा भाजणे, स्पष्ट वैद्यकीय कारणांशिवाय डोकेदुखी, पोटदुखी किंवा इतर शारीरिक आजारांच्या तक्रारी.
  2. मुलाच्या वागण्यात किंवा मूडमध्ये अचानक आणि लक्षात येण्याजोगे बदल, जसे की जास्त माघार घेणे, सतत घाबरणे, चिंता करणे किंवा आक्रमक होणे.
  3. एखाद्या विशिष्ट पालकाच्या किंवा काळजीवाहूच्या सहवासाविषयी भीती किंवा अनिच्छा. ज्या मुलांनी गैरवर्तनाचा अनुभव घेतला आहे त्यांना प्रौढांवर विश्वास ठेवण्यास संघर्ष करावा लागू शकतो आणि हेच नातेसंबंधांमधील भीतीचे चिन्हे असू शकते.
  4. शैक्षणिक कार्यक्षमतेत घसरण, अंथरूण ओले करणे किंवा अंगठा चोखणे अशा सवयी पुन्हा लागणे
  5. काही मुले खूपच आक्रमकता, राग, हिंसा दर्शवू शकतात, शक्यतो प्रौढांच्या वागणुकीची नक्कल करताना शाळा व अन्य ठिकाणी समवयस्करांच्या बाबत असे वर्तन दिसून येते.

स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास काय करावे?

मानसशास्त्रीय उपचार, समुपदेशन, पुरेशी सपोर्ट सिस्टीम तयार करणे आणि औषधे (आवश्यक असल्यास) यासाठी मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही पालकांनी बाळाच्या जन्माआधीपासून ते एका ठराविक कालावधीपर्यंत व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा<< सूचना सेठने ४ वर्षाच्या मुलाला संपवण्याआधी कुटुंब व मित्रांकडे मांडली होती खंत; म्हणाली, “मुलाचं तोंड पाहिलं की..”

जर तुम्ही अशा समस्येतून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीस ओळखत असाल तर, बाल संरक्षण सेवा किंवा हेल्पलाइन क्रमांक 1098 शी संपर्क साधा, संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी 24-तास मदत पुरवणारी ही आपत्कालीन टोल-फ्री फोन सेवा आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ceo killed 4 year old son is getting mad at child normal why parents get angry killing child what are signs emotionally abused children svs
Show comments