Akshay Khanna : सध्या चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत. ‘छावा’ सिनेमात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. अक्षय खन्नाने त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. उत्तम अभिनय केल्याने अक्षय खन्नावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. वयाच्या १९-२० व्या वर्षी टक्कल पडल्याने अक्षयच्या आत्मविश्वासावर कसा परिणाम झाला होता, याविषयी त्याने स्वत: एकदा सांगितले होते.
तो म्हणाला होता, “एवढ्या लहान वयात माझ्याबरोबर हे व्हायला लागलं. माझ्यासाठी हे एखाद्या पियानो वादकाने आपली बोटे गमावल्यासारखे होते. त्या दिवसांत मला असेच वाटायचे. जेव्हा तुम्ही ते स्वीकारता तेव्हा तुम्हाला कमी त्रास होतो, पण हे खूप निराशाजनक होतं.”
तो पुढे सांगतो, “यामुळे तुम्ही तुमच्या करिअरचे एक दोन वर्ष गमावू शकता, कारण अभिनेता म्हणून तुम्ही कसे दिसता हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषत: चेहरा खूप महत्त्वाचा असतो. शरीर थोडे फार लपवले जाऊ शकते, पण १९-२० व्या वर्षी टक्कल पडणे हे उद्ध्वस्त करणारं होतं, निराशाजनक होतं. हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवते, त्याचा खूप जास्त नकारात्मक परिणाम एक तरुण अभिनेता म्हणून माझ्या आत्मविश्वासावर झाला.” २०२० मध्ये मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय याविषयी उघडपणे बोलला होता.
लवकर टक्कल पडणे आणि त्याचा एखाद्यावर कसा परिणाम होतो, हे समजून घेऊ या.
वयाच्या १९-२० व्या वर्षी लवकर टक्कल पडणे हे अनुवांशिकता, कुटुंबात यापूर्वी कुणाला असेच लवकर टक्कल पडले असेल तर हार्मोनल बदल आणि जीवनशैलीतील घटक जसे की तणाव, पौष्टिक कमतरता, वजन कमी करणे, औषधी, खूप जास्त हेअरस्टाइल बदलणे, केसांवर उपचार आणि थायरॉइड इत्यादी समस्यांमुळे दिसून येते; असे मुंबई येथील डॉ. शरीफा स्किन केअर क्लिनिकच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. शरीफा चाऊस यांनी सांगितले.
लवकर टक्कल पडण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे डायहायड्रोटेस्टोस्टेरोन (DHT) हार्मोन. हा हार्मोन केसांना कमकुवक करतो आणि केस गळण्याची समस्या उद्भवते. डॉ. चाऊस सांगतात, “केस गळण्याची लक्षणे म्हणजे केस जास्त पातळ होणे, केसांच्या गुठळ्या होणे, केशरचना कमी होणे किंवा डोक्यावर टक्कल पडणे.”
अक्षय खन्ना यांनी सांगितल्याप्रमाणे, लवकर टक्कल पडणे एखाद्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर कसा परिणाम करू शकते?
डॉ. चाऊस सांगतात, “एखाद्याला लाज वाटू शकते, निराशाजनक वाटू शकते आणि ते समाजात वावरणे टाळू शकतात; यामुळे तणाव, एंग्झायटी, नैराश्य आणि वैताग येऊ शकतो.”
डॉ. चाऊस सांगतात की, बदल स्वीकारणे आणि आपले केस कसे दिसतात यापलीकडे आपली स्वत:ची किंमत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या पुढे सांगतात, “लक्षात ठेवा, तुम्हाला आतून काय जाणवतं यावरून तुमचा आत्मविश्वास निर्माण होतो, फक्त तुम्ही कसे दिसता यावरून नाही.”
या गोष्टी करा
टक्कल पडल्यानंतर त्यावर एका रात्रीमध्ये उपचार होईल असे शक्य नाही. बायोटिन सप्लिमेंट्स, जीवनशैलीत बदल; जसे की पौष्टिक आहार आणि योग तसेच ध्यानाद्वारे तणाव कमी करण्यास मदत होते, यामुळे केस गळणे थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
“प्रोटिन समृद्ध आहार, बायोटिनसारखे व्हिटॅमिन्स आणि टाळूची योग्य काळजी घेणेसुद्धा केसांच्या आरोग्यास फायदेशीर ठरू शकते. केस गळण्याचे प्रमाण वाढण्यापूर्वी त्यामागील कारणं शोधा आणि योग्य उपचार घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या”, असे डॉ. चाऊस सांगतात.