सध्या लोकांमध्ये फिटनेसबाबत जागरुकता पाहायला मिळते. दिवसभर काम करुन सुद्धा लोक नियमितपणे व्यायाम करु लागले आहेत. खराब जीवनशैली मागे टाकून स्वत:च्या शरीराकडे लक्ष देत आहेत. अनेकजण शारीरिक स्वास्थ जपण्यासाठी जिमची मदत घेत आहेत. तर काहीजण डाएटमध्ये सुधारणा करुन योग्य आहार घेत आहेत. फिट राहण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात असे म्हटले जाते.
व्यायाम करणाऱ्यांना आहारामध्ये चिकनचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जर एखादी व्यक्ती शाकाहारी असेल, तर त्याला/तिला पनीर खाण्याचा पर्याय सुचवला जातो. पण बरेचसे लोक हे दोन्ही पदार्थ नाश्ता, जेवणामध्ये खात असतात. अशा वेळी कोणता पदार्थ शरीरासाठी अधिक फायदेशीर असतो असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पनीर आणि चिकन या दोन्ही पदार्थांची सविस्तर माहिती मिळवूया.
पनीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणामध्ये असतात. हे घटक संधिवातावर परिणामकारक असतात. त्याव्यतिरिक्त पनीर खाल्यामुळे हिमोग्लोबिन सुधारते. दमा, खोकला, सर्दी यांसारख्या आजारावर मात करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला पनीरमुळे चालना मिळते. चिकनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. हायप्रोटीन्समुळे शरीरातील हाडे मजबूत राहतात. पनीरच्या तुलनेमध्ये चिकनमध्ये जास्त प्रोटीन्स असतात. १०० ग्रॅम चिकनमध्ये ३१ ग्रॅम प्रोटीन असते असे तज्ज्ञ सांगतात. याउलट १०० ग्रॅम पनीरमध्ये फक्त २० ग्रॅम प्रोटीन असते.
चिकन हे व्हिटॅमिन B12, नियासिन, फॉस्फरस आणि आयर्नच्या मुख्य स्त्रोतांपैकी एक आहे. यातील नियासिन या जीवनसत्वामुळे मज्जासंस्था, पचनसंस्था यांना बळकटी येते. तसेच त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. पनीर हे कॅल्शियमचे प्रमुख स्त्रोत आहे. पनीर खाल्यामुळे हाडे, दात निरोगी राहतात. त्यासह रक्त प्रवाह सुरळीतपणे सुरु राहावा यासाठीही पनीर खाणे योग्य समजले जाते. वर्कआऊट करताना कॅलरीजबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे असल्यास चिकन खाणे फायदेशीर असते. १०० ग्रॅम चिकनमध्ये १६५ कॅलरीज असतात. दुसऱ्या बाजूला १०० ग्रॅम पनीर खाल्याने शरीरामध्ये २६५-३२० कॅलरीज पोहचतात. कच्चे चिकन खरेदी करताना अँटिबायोटिक मुक्त चिकनचा पर्याय निवडावा. लो-फॅट पनीर आणि मलाई पनीर हे दोन्ही शरीरासाठी लाभदायी असतात. वजन कमी करायचे असल्यास लो-फॅट पनीर खावे.
हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी आरोग्यदायी आहेत. वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी पनीर आणि चिकन दोन्हींची मदत होते. यांच्या सेवनामुळे शरीराला फायदा होतो. या पदार्थांचा समावेश आहारामध्ये केल्याने तब्येत सुधारु शकते. ही संपूर्ण माहिती आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.