जन्मतः आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आपले मूल हळूहळू स्वतंत्र होताना अनुभवण्यात एक मजा असते. भूक लागली हे रडून व्यक्त करणारे बाळ, आधी ‘मम॒ मम॒’ म्हणून सांगते आणि नंतर ‘मला भूक लागली’ म्हणू लागते. आपल्या डोळ्यासमोर अजून नुकतेच पालथे पडू लागलेले आपले बाळ असते आणि हा हा म्हणता ते चालू लागते, धावू लागते, जिना चढू लागते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३-६ वर्षांमध्ये तर वेगाने होणारी आपल्या मुलाची वाढ आपल्याला थक्क करते. एकीकडे शरीराची भराभर वाढ होते आणि त्याच्याबरोबरच बौद्धिक क्षमता, भाषेवरची पकड, मनातल्या भावभावना आणि वर्तणूक या सगळ्याचा विकासही वेगाने होतो. हा कालावधी म्हणजे बहुतेकदा मुले शाळेत जाऊ लागतात. शिशुवर्ग, बालवर्ग असे टप्पे पार करत हळूहळू पहिलीकडे जाणारा वयोगट. त्यामुळे आपल्या घरात वावरतानाच मुलांचे विश्व रुंदावते. शाळेतल्या शिक्षिका/शिक्षक, वर्गातली मुले ह्यांचा त्या विश्वात आता समवेश होतो आणि या सगळ्यांशी जमवून घ्यायला मुले शिकतात.

हेही वाचा : धूम्रपान न करणार्‍यापेक्षा धूम्रपान करणार्‍याला मधुमेह होण्याचा धोका तिप्पट का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…

३-४ वर्षांची मुले तिचाकी सायकल चालवू लागतात आणि त्यांना जग पादाक्रांत केल्याचा आनंद होतो! भरभर पायऱ्या उतरतात. दोरीच्या उड्या मारायला शिकतात. स्वतःचे स्वतः खातात. आपले बूट स्वतः घालतात, त्यांना बटणे काढता येतात. ४-५ वर्षांचे झाल्यावर मुले आपलेआपले दात घासतात, चेहरा धुतात. ५ वर्षांपर्यंत स्वतःचे कपडे काढणे आणि घालणे दोन्ही जमू लागते. त्यांना फार मजा येते.

तिसऱ्या वर्षापासून मुलांची व्याकरणाशी ओळख होते. ‘करू शकेन, करेन’ अशी क्रियापदे वापरता येतात. वस्तू लहान, मोठी असे आकारमान समजते. अनेक विशेषणांची ओळख होते. पाचव्या वर्षापर्यंत साधारण ५५०० शब्दांची संपत्ती मुलाकडे जमा होते! ह्या वयातली मुले एकदम बडबडी होतात, यात नवल नाही! तिसऱ्या वर्षांत त्यांना ‘आपण का खातो?’ आपण का झोपतो?’ अशा प्रश्नांचा अर्थ आणि उत्तरे समजू लागतात आणि पाचव्या वर्षी एखाद्या गोष्टीची कारण- परिणाम अशी संगती लावता येते. उदा. ‘भूक लागल्यावर काय करायचे?’ अशा प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे तयार असतात. सहाव्या वर्षी मुलांना अंक, वेग, काळ, डावे-उजवे अशा अनेक संकल्पना समजू लागतात. सहाव्या वर्षी मुले आपल्याला छोटीशी गोष्ट सांगू लागतात आणि आपणही प्रेमाने ती गोष्ट ऐकण्यात दंग होऊन जातो.

हेही वाचा : Health Special: कॅलरी कल्लोळाची गोष्ट

मुलांना या वयात माया, दुःख, मत्सर, राग, अशा स्वतःच्या भावना ओळखू यायला लागतात. आपला राग व्यक्त करताना केवळ आदळआपट नाही करायची, तो आपण शब्दाने व्यक्त करू शकतो हे त्याला समजते. कोणी टीका केली, चूक दाखवून दिली तर ते या वयात चांगले समजते. इतरांच्या भावनांची कदर करायला मूल शिकते. आपल्याकडे असलेली वस्तू वाटून घ्यायची हे ही आता कळू लागते. आपल्याला काही लागले, खुपले तर या वयात मुलांना ते फार जाणवते; आजारी असतानाही आईवडिलांनी आपल्याकडे सारखे लक्ष दिले पाहिजे असे त्यांना वाटते, कारण शरीराला होणाऱ्या दुखापतीची त्यांना भीती वाटते.

याच सुमारास ‘बरोबर चूक’ यातला फरक हळू हळू समजायला लागतो. आपल्याला काय हवे आहे ते अधिक स्पष्टपणे मुलांना समजते, त्याच बरोबर मोठी माणसे आपल्याकडून कसे वागण्याची अपेक्षा करतात हे ही त्यांच्या लक्षात येते. त्यातून आज्ञाधारकपणा, स्वतःलाच शिक्षा करणे, स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण या गोष्टी निर्माण होतात. सद॒सद॒विवेक बुद्धी निर्माण होते आणि आपल्या वागणुकीची मार्गदर्शक ठरते.

३-५ वयोगटात मुलांचे खेळही बदलतात. आता त्यांची कल्पनाशक्ती वाढते. बाहुलीला अंघोळ घालणे, भरवणे असे खेळ त्यांना खेळता येतात. छोट्या ग्रुपमध्ये मुलांबरोबर ती खेळू लागतात, सुरुवातीला आपली आपली पण हळू हळू एकत्र. आता त्यांना आपल्यावर ‘राज्य’ आले हे समजते, आळीपाळीने बॉल आपल्याला मिळेल हे कळते आणि खेळ एक सामूहिक अनुभव बनतो. या वयात कधी कधी एखादा काल्पनिक सवंगडीही असतो. त्याला एखादे नावही ठेवलेले असते. आई विचारते, ‘कुणाशी गप्पा मारतेस गं?’ मुलगी सांगते’ अग माझी मैत्रीण नाही का श्लोका? तिच्याशी बोलते.’ हा अनुभव खूप वेळा येतो. मूल जसे मोठे होते तसे ही काल्पनिक मैत्रीण/मित्र नाहीशी होतो.

हेही वाचा : जास्त वेळ बसून राहण्यामुळे आरोग्यावर होत आहेत दुष्परिणाम? रोज फक्त पाच ते दहा मिनिटे व्यायाम करा; जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले सहा व्यायाम 

मुलाची चित्रकला हे सुद्धा त्याच्या विकासाचे दर्शक असते! साधारण तीन वर्षाचे मूल चेहरा म्हणून एक वर्तुळ काढते आणि त्यात नाक, तोंड, डोळे दर्शवणारया खुणा करते. केस आणि नाक नंतर येतात. मग येतात, हातांच्या काड्या आणि शेवटी पाय! हळू हळू शरीराचा वरचा भाग, छाती पोट असे चित्रात दिसू लागतात. बुद्धीच्या क्षमतेनुसार या चित्रात तपशील दिसून येतो आणि मुलाची सर्जनशीलतासुद्धा!

या काळात मुलाच्या जीवनात घडणारी एक महत्त्वाची घटना असते ती म्हणजे लहान भावंडाचा जन्म आणि त्यामुळे आपल्या लहान भावंडाशी जुळवून घेणे. मोठ्या मंडळींचे वागणे खूप वेळा लहान भावाचा किंवा बहिणीचा स्वीकार करता येतो की नाही ते ठरवते. काही कारणाने उदा. एखादे मूल अधिक हुशार असेल, एखादे ‘विशेष गरजा’ असलेले असेल किंवा तीन बहिणींच्या पाठीवर झालेला मुलगा असे स्पेशल स्थान एखाद्याचे असेल तर मोठ्या भावंडाला खूप त्रास होतो. या वयात सहकार्य करायला मूल शिकत असले तरी अशा पक्षपाती वागणुकीचा त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि मोठेपणी मैत्रीचे नाते तयार होण्यातही बाधा येते. घरातली मोठी माणसे मुलांना समान वागणूक, समान वेळ आणि लक्ष देत असतील, एखाद्या मुलाकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असताना दुसऱ्या मुलालाही आपले प्रेम, माया याचा पुरेसा अनुभव देऊ शकत असतील तर त्या मुलाचीही वाढ सुदृढ होते.

आता आपले लहानगे बाळ पहिलीत जायला आणि शाळेतली, आजूबाजूची वेगवेगळी आव्हाने पेलायला तयार झालेले असते!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child mental health growth and development hldc css
Show comments