ऑनलाईन जगात गेल्यानंतर मुलांना नवीन मित्रमैत्रिणी बनवायला खूप आवडतं. त्यांच्या नेहमीच्या मित्र मैत्रिणींचा मित्र परिवार, त्या मित्रपरिवाराचा मित्रपरिवार. त्यातल्या कुणाच्यातरी वॉलवरुन आलेली प्रोफाईल्स, अकाउंट्स पब्लिक असतील तर पूर्णपणे अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट अनेक मुलं धडाधड स्वीकारतात. देशी विदेशी मित्रपरिवार बनवण्याकडे मुलांना भर दिसून येतो. मुळात टीनएजमध्ये वयानुसार असलेलं थ्रिलचं आकर्षण हा त्यातला महत्वाचा घटक असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, सिंगापूर, मलेशियन मित्र आहेत हे चारचौघात सांगताना कॉलर टाईट होते. त्यामुळे आपल्या नेहमीच्या मित्र परिवाराच्या पलीकडे अनेकांशी मुलं ओळख करुन घेतात. मैत्री करतात. अगदी बेस्ट फ्रेंड्स ही होतात. या सगळ्या गोष्टींपासून मुलांना सावध करणं पालक आणि शिक्षकांची जबाबदारी आहे. भेटणारा प्रत्येक व्यक्ती काही मुलांना फसवायला बसलेला नसतो, पण ऑनलाईन जगात अनेक फेक प्रोफाईल्स घेऊन गुन्हेगार फिरत असतात.

हेही वाचा… Mental Health Special: गुड फीलिंगचा व्हायरस पसरावा!

निरनिराळ्या विकृती असलेली माणसं स्वतःचा खरा चेहरा लपवून भलतेच उद्योग करत असतात. पेडोफाईल्सचा तर ऑनलाईन जगात सुळसुळाट आहे. अशावेळी आपल्या मुलांच्या संपर्कात आलेली व्यक्ती कोण आहे, ती खरी आहे का, फेक प्रोफाइल वापरणारा कुणी गुन्हेगार तर नाही ना हे डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे. ही गोष्ट दर वेळी पालक करु शकतीलच असं नाही. अशावेळी या धोक्यांची माहिती, त्यापासून दूर राहायचं कसं याचं प्रशिक्षण मुलांना असणं आवश्यक आहे.

मुलांना सांगा या काही गोष्टी!

आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा प्रत्येकजण हा जेन्युईन आहे, खरा आहे असं मानून चालायचं नाही. अनेकदा मुलं समोरची व्यक्ती जे काही सांगेल, स्वतःची जी काही माहिती देईल,ती खरी आहे असं मानून चालतात. विश्वास टाकतात आणि फसवले जातात. ही फसवणूक विविधस्तरीय असते. कधी प्रेमाचं नाटक, कधी आर्थिक फसवणूक, कधी सेक्सटॉर्शनचे प्रकार होतात. त्यातून होणारा मानसिक त्रास, स्व प्रतिमेला तडे जाणं या सगळ्याचा त्रास ना मोजता येणारा आणि भरून काढता न येणारा असतो. आपण फसवले गेलो ही भावना कुणाला आवडते सांगा? म्हणूनच सोशल मीडियावर मैत्री करत असताना चार चार वेळा तपासून बघायला हवं हे मुलांना सांगा.

कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन एक चक्कर मारा. काय काय शेअर केलं आहे, कशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत, काय पोस्ट्स लिहिल्या किंवा शेअर केल्या आहेत, ती व्यक्ती कुणाला फॉलो करते, विचारधारा काय आहे हे सगळं एकदा नजरेखालून घाला. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकरावीशी वाटली तरच स्वीकारा.

हेही वाचा… Mental Health खरंच मॅटर का करतं?

स्वीकरल्यानंतरही जर ती व्यक्ती तुमच्या पोस्टखाली काहीतरी वेडंवाकडं लिहीत असेल, मेसेंजरवरून काहीतरी चुकीचं सातत्याने पाठवत असेल, चॅटिंगसाठी आग्रह धरत असेल आणि त्या सगळ्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागला तर अशा व्यक्तीला लगेच ब्लॉक केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या वॉलवरची त्या व्यक्तीची अनावश्यक लुडबुड थांबू शकेल. एक लक्षात ठेवलं पाहिजे, सोशल मीडियावर अगणित फेक प्रोफाईल्स आहेत. लोकांना फसवण्याचे रोज नवे उदयोग शोधले जातात. जर कुणी ऑनलाईन फ्रेंड पैशांची मागणी करत असेल, त्यासाठी कितीही दर्दभरी स्टोरी सांगितली असेल तरीही जोवर तुमची खातरी पटत नाही मैत्रीचा हात पुढे करायचा नाही.

अनेकदा मुलं विचारतात की मग आम्ही कुणावरच विश्वास ठेवायचा नाही का?

आपल्याला मुलांना अविश्वास शिकवायचा नाहीये, पण सतर्कता शिकवलीच पाहिजे. ती कशी शिकवता येईल?

समजा, त्या व्यक्तीने (अनोळखी पण आता मैत्री करू इच्छिणारा असं समजू या..) चॅटिंगवर सेक्सटिंग सुरु केलं, अश्लील इमेजेस, व्हिडीओ, जोक्स पाठवले ज्याने मुलांना अतिशय अवघडलेपण आलं तर अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलं बरं.

समजा, मैत्री झाल्यावर अचानक पालकांचा, त्याचा / तिचा स्वतःचा पॅन, आधार नंबर, बँक डिटेल्स, घराचे डिटेल्स मागायचा सुरुवात केली, रेड अलर्ट! कधीही कुठलीही वैयक्तिक माहिती शेअर करु नये.

समजा, एखादी व्यक्ती फार जास्त गोडगोड वागतेय, मुलांच्या प्रत्येक होकार-नकाराशी जुळवून घेत असेल, मुलांना सतत मीच फक्त तुला समजून घेतो इतर कुणीही, अगदी पालकही समजून घेत नाहीत असं सांगत असेल तर रेड अलर्ट आहे.

समजा, अनोळखी व्यक्ती ट्रोल करत असेल, वाह्यात बोलत असेल तर त्याच्याशी बोलायला न जाता सरळ ब्लॉक करायला मुलांना शिकवा. कधीही अनोळखी व्यक्तींशी सेक्स्टिंग, सेक्स फोटो, व्हिडीओ क्लिप्सची देवाण घेवाण करु नाही. या गोष्टी मुलांना नक्की सांगा आणि त्यांना अनोळखी व्यक्तींपासून दूर राहायचं कसं हे शिकवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children need to be trained how to stay away from unknown and fake online profiles to avoid fraud hldc dvr
Show comments