डॉ. जाह्नवी केदारे
मूल लहानाचे मोठे होताना आपण बघतो. ‘अगदी आईवर गेलाय हो!’ किंवा ‘सगळ्या लकबी आपल्या वडिलांच्या उचलल्या आहेत.’ अशी विधानेही सहजपणे करतो. दिसणे, वागणे हे अनुवांशिक गुणधर्मांमुळे असते असे आपण मान्य करतो. ‘इतक्या चांगल्या घरातला मुलगा, असा कसा व्यसनाच्या आहारी गेला? संगतीचा परिणाम!’ ‘कोविडमध्ये नोकरी गेल्यावर सुरेश जो खचला तो खचलाच. त्याच्या आईने वडील नसताना त्याला जिद्दीने मोठे केले, पण तो मात्र संकटकाळी मनाची उभारी धरू नाही शकला.’ आपण असे म्हणतो तेव्हा अनुवांशिकता, त्यातून आलेले गुणधर्म याच्या व्यतिरिक्तही काही घटक, आजूबाजूचे वातावरण, मानसिक कुवत या सगळ्या गोष्टी त्या त्या व्यक्तीच्या वागण्याला, मनःस्थितीला जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलाच्या शरीराची वाढ, बौद्धिक, मानसिक, सामाजिक विकास नक्की कधीपासून सुरू होतो? अनुवंशिकतेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अनेक गुणधर्म संक्रमित होतात हे खरे, पण म्हणजे कसे संक्रमित होतात? लहानाचे मोठे होत असताना बाकी कोणत्या घटकांचा परिणाम मुलाच्या वाढीवर होतो? अशा सगळ्याचा मानसिक स्वास्थ्याशी काही थेट संबंध आहे का आणि कसा? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात.

आणखी वाचा-Mental Health Special : सोशल मीडियाचं व्यसन लागू शकतं ही कल्पना कंपन्या देतात का?

अनुवांशिकता आणि वातावरणातील घटक, लहानपणापासून येणारे अनुभव या दोन्हीचा मुलाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो. गर्भावस्थेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून मुलाच्या शारीरिक वाढीची वेगाने सुरुवात होते. एक जैविक(biological) पृष्ठभूमी तयार असते, ज्यामध्ये आई आणि वडिलांकडून आलेली जनुके(genes)असतात आणि ही जनुके अनेक बाह्य गुणविशेषांचे रूप घेतात. याच बरोबर गर्भाशयात असतना देखील गर्भाशयातील बदल आणि आजूबाजूच्या वातावरणातील परिस्थिती यांचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो.

गरोदरपणाच्या १६-२० आठवड्यांमध्येच बाळाची हालचाल आईला जाणवू लागते. बाळ लाथा मारते, वर खाली फिरते, शरीराला आळोखे पिळोखे देते आणि आई कामात असली की शांत बसते. १८ आठवड्यांनंतर बाळाला ऐकू येते, खूप मोठ्ठा आवाज झाला तर गर्भाचे स्नायू आकुंचन पावतात, हालचाल होते आणि हृदयाचे ठोके वाढतात. गरोदरपणाचे २० आठवडे झाल्यावर आईच्या पोटावर तीव्र प्रकाशझोत टाकला तर गर्भाच्या हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्यांचे कार्य सुरू झाल्याची ती खूण असते. ७ व्या महिन्यात गर्भावस्थेत बाळाच्या पापण्या उघडतात, वास आणि चवीचे ज्ञान होते. गरोदरपणाच्या अगदी १६ व्या दिवसापासूनच मेंदूची वाढ व्हायला लागते. १० व्या आठवड्यापर्यंत मेंदूचा सगळ्यात बाहेरचा आणि महत्त्वाचा थर(cerebral cortex) तयार व्हायला लागतो आणि त्याची वाढ गरोदरपणात होत राहते.

आणखी वाचा-Mental Health Special: दुष्काळ, पूर, भूकंप यामुळे मानसिकतेवर परिणाम होतो का?

गर्भाशयातील वातावरण उदा. आईला मधुमेह असणे किंवा गर्भावस्थेतील काही इन्फेक्शन, गुणसूत्रांमध्ये दोष अशा गोष्टींचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. त्याच बरोबर बाह्य वातावरणाचाही परिणाम होतो. आईच्या मनावर ताणतणाव असेल तर गर्भाच्या रक्तातील अॅड॒रीनॅलीन, adrenocortical hormone अशा अंतर्द्रव्यांचे प्रमाण वाढते आणि गर्भाच्या हृदयाची गती वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, हालचाल वाढणे असे परिणाम दिसतात. सिरोटोनिन सारख्या मेंदूतील रसायनाच्या नियंत्रणास जबाबदार असलेले जनुक आणि वातावरणात असलेली प्रतिकूल परिस्थिती यांच्या परस्पर क्रियेने विपरीत घटनांचा मानसिक परिणाम होऊन प्रौढावस्थेत नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता वाढते. मनाची लवचिकता(resilience) आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता देखील अंतर्जात, शरीरात निर्माण होणाऱ्या अनेक रासायनिक द्रव्यांवर अवलंबून असते.

आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. गरोदरपणात आई दारूचे सेवन करत असेल तर बाळात अनेक दोष निर्माण होऊ शकतात. जन्माला येणाऱ्या बाळाला ‘fetal alcohol syndrome’ होण्याची खूप शक्यता असते. गर्भाची वाढ खुंटणे, डोक्याचा आकार लहान होणे, अगदी हृदयामध्ये दोष, मुलामध्ये चंचलपणा, मतीमंदत्त्व, फिट्स येणे असे अनेक विकार आढळून येतात. आई गरोदरपणात धूम्रपान करत असेल तर दिवस भरण्याआधी मूल जन्माला येणे, बाळाचे वजन कमी असणे असा धोका निर्माण होतो. इतर कोणते व्यसन असेल तरीही त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होतो.

गर्भावस्थेच्या अगदी लवकरच्या स्थितीपासून बाळाची वाढ विविध टप्प्यांमधून होते. जन्मल्यावर पहिली काही वर्षे अतिशय वेगाने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास होत राहतो. किशोरावस्थेत तर अनेक नव्या गोष्टींना सामोरे जाण्याची, अनेकानेक गोष्टी आत्मसात करण्याची, नव्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची मुलांची प्रचंड क्षमता असते. अशा सगळ्या गोष्टींचा पुढच्या लेखात आढावा घेऊया.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Childrens mental health growth and development hldc mrj
Show comments