How to clean your chopping board : स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या बाबतीत, अनेकांना हे माहीत नसते की, त्यांचा चॉपिंग बोर्ड म्हणजे बॅक्टेरिया वाढविण्याला खतपाणी घालणारं एक ठिकाण आहे. सोशल मीडियावर काही लोक असं म्हणतात की, चॉपिंग बोर्ड टॉयलेट सीटपेक्षा जास्त अस्वच्छ असू शकतो. तर दी इंडियन एस्क्प्रेसने याबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली. तसेच याबद्दल समजून घेतलं की, नक्की हे खरं आहे का…
टॉयलेट सीटपेक्षा चॉपिंग बोर्ड (Chopping Board) जास्त अस्वच्छ असतो का?
नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख व आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्या मते, चॉपिंग बोर्ड हा कच्च्या मांस, भाज्यांच्या संपर्कात आल्याने त्यावर ई. कॉईल व साल्मोनेला (E. coli and Salmonella) यांसारखे हानिकारक जीवाणू असू शकतात.
चॉपिंग बोर्डची (Chopping Board) तुलना टॉयलेट सीटशी करणं थोडं जास्त तीव्रतेचं वाटत असलं तरी तज्ज्ञांनी सांगितलं की, विशेषतः लाकडी चॉपिंग बोर्ड योग्य प्रकारे स्वच्छ केला न गेल्यास ती जागा बॅक्टेरियाच्या वाढीला आमंत्रण देणारी ठरू शकते. लाकडाची खूप छिद्रयुक्त (पॉरस) संरचना असल्यामुळे बॅक्टेरिया तिथे प्रवेश करू शकतात आणि मग ते त्यातल्या गडद व खडबडीत जागांमध्ये वाढू शकतात. तेव्हा स्वच्छतेचं महत्त्व लक्षात घेता, चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक आहे; जेणेकरून आपल्या आरोग्याच्या समस्या कमी होतील.
या चर्चेत आहारlज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांनी मत मांडलं की, मायक्रोबायोलॉजिस्ट (सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ) चार्ल्स गेर्बाच्या यांच्या संशोधनानुसार, चॉपिंग बोर्डावर टॉयलेट सीटपेक्षा अधिक प्रमाणात जीवाणू असू शकतात. आपण जेव्हा चॉपिंग बोर्ड (Chopping Board) योग्य रीतीनं स्वच्छ करीत नाही, तेव्हा ते जीवाणू आपल्या हातांवर किंवा स्वयंपाकाच्या इतर साधनांवर पसरू शकतात. असे घडते; कारण- चॉपिंग बोर्ड अनेकदा कच्च्या मांसाच्या संपर्कात येतो आणि त्याच्या पृष्ठभागावर जीवाणू अडकून राहू शकतात.
टॉयलेट सीट्सवर जीवाणू असू शकतात; पण त्यांना नियमितपणे आणि जंतुनाशकांनी (डिसिन्फेक्टंट) स्वच्छ केले जाते. पण, चॉपिंग बोर्डवरील जीवाणू पूर्णपणे काढून टाकणे शक्य नसते. त्यामुळे चॉपिंग बोर्ड अधिक प्रमाणात अस्वच्छ राहण्याचा धोका वाढतो. चॉपिंग बोर्ड नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही काही बॅक्टेरिया तिथे राहू शकतात आणि त्यामुळे अन्न प्रदूषित होण्याची शक्यता वाढते.
चॉपिंग बोर्डवर टॉयलेट सीटइतकेच बॅक्टेरिया असतात हे तज्ज्ञांनी मान्य केलं नसलं तरीही त्यावर बॅक्टेरिया असतात. त्यामुळे चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग, चॉपिंग बोर्ड (Chopping Board) कसा स्वच्छ करायचा ते जाणून घेऊ.
उपाय :
१. आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षिका कनिका मल्होत्रा यांनी चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवण्याकरिता कच्चे मांस आणि भाज्यांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसे केल्याने सरमिसळ दूषितीकरण (क्रॉस-कंटॅमिनेशन) टाळण्यास मदत मिळेल.
२. तुम्ही कधी कधी पातळ ब्लिच सोल्युशनने बोर्ड स्वच्छ करू शकता. पण, त्यासाठी चॉपिंग बोर्ड पूर्णपणे वाळवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- कारण ओलावा बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करतो.
३. जंतुनाशक पदार्थांचा वापर करून, चॉपिंग बोर्ड अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे आवश्यक आहे. साधे नैसर्गिक क्लीनर्स जसे की, मीठ किंवा लिंबूमुळे बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकण्यास मदत मिळेल.
४. कालांतराने जेव्हा चॉपिंग बोर्डवर खूप खोल खडबडीत जागा तयार होतात, तेव्हा चॉपिंग बोर्ड बदलायला हवा. कारण- अशा जागांमध्ये बॅक्टेरिया लपून राहू शकतात; ज्यामुळे आरोग्याचा धोका वाढतो.