Chunky Panday : बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे दररोज सकाळी लसूण खातात. त्यांच्या मते, आरोग्यासाठी नियमित लसूण खाणे फायदेशीर आहे. ते सांगतात, “मी दररोज सकाळी उठल्यावर दोन लसणाच्या पाकळ्या खातो. रक्त आणि धमन्यांच्या आरोग्यासाठी ते चांगले असते. जर मी लसणाच्या कळ्या खाल्या नाही तर मला उठल्यासारखे वाटत नाही. जेव्हा मी दुसऱ्या देशात जातो तेव्हा तिथे लसूण उपलब्ध नसतो, अशावेळी मला हरवल्यासारखं वाटतं. मला फक्त दोन लसूणच्या पाकळ्या खायला आवडतात.

दिवसाची सुरुवात लसणाच्या दोन पाकळ्यांनी केल्यास काय होते?

औषधी गुणधर्माचा विचार केला तर दररोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खाणे हे संतुलित आहारासाठी फायदेशीर ठरू शकते, असे कानपूर येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. अंजली तिवारी सांगतात.
“लसणात अ‍ॅलिसिन, सल्फर आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे बायोॲक्टिव्ह संयुगे भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यास असंख्य फायदे देतात. लसणाच्या पाकळ्यांचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि धमन्यांमध्ये प्लेक जमा होत नाही, ज्यामुळे एकूण हृदयाचे आरोग्य सुधारते,” असे डॉ. तिवारी पुढे सांगतात.

लसणात नैसर्गिक अँटीमायक्रोबियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आजारांचा सामना करण्यास मदत करतात. लसणाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्ससाठी अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे कर्करोग आणि न्यूरोडिजनरेटिव्ह अशा दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो, असे डॉ. तिवारी सांगतात.

“लसणाचे सेवन हे अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि यकृताच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यातील सल्फर संयुगे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. यात असलेले अ‍ॅलिसिन पदार्थ शरीराला पौष्टिक मूल्य प्रदान करतात, जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. लसणाच्या पाकळ्या नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून कार्य करते आणि कर्करोग रोखण्यास मदत करते,” असे डॉ. तिवारी सांगतात.

लसणाचे अतिसेवन करू नये

लसणाच्या अतिसेवनामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलची समस्या, पोटफुगी किंवा तोंडाची दुर्गंधी यांसारखे दुष्परिणाम दिसू शकतात. “अँटीकोआगुलंट औषधे (anticoagulant medications) घेणाऱ्या लोकांनी जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे, कारण अँटीकोआगुलंट औषधांमध्ये रक्त पातळ करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय कच्चे लसूण पोटाला त्रासदायक ठरू शकते. विशेषतः अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा अल्सर असलेल्या व्यक्तींनी लसूण खाऊ नये.

लसणाच्या जास्तीत जास्त फायद्यांसाठी, ताजे लसूण खावे आणि त्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी एका संतुलित आहाराचा भाग म्हणून समाविष्ट करावे. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader