Cilantro Health Tips: भारतीय आहारात कोथिंबिरीचा उपयोग अनेक वर्षांपासून होत आहे. आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या घरात कोथिंबीर हा घटक असतोच. स्वयंपाक करताना रोज लागणारा एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. बहुतेक घरात अन्नपदार्थांमध्ये कोथिंबीर वापरली जाते. भाजी, वरण कोणतंही असो. चटणी असो वा अन्नाची सजावट असो, त्यावर कोथिंबिरीची हलकीशी पेरणी केली की, त्या पदार्थाला कसा छान सुगंध येतो. कोथिंबिरीमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. चवीव्यतिरिक्त अनेक आरोग्य फायद्यांच्या दृष्टीनेही कोथिंबिरीकडे पाहिले जाते. कोथिंबिरीमध्ये प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक असतात. त्याव्यतिरिक्त कोथिंबिरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, केरोटीन, थियामीन, पोटॅशियम, असे अनेक खनिज घटकही असतात.

एका इन्स्टाग्राम हॅण्डलने पोस्ट केले आहे की, कोथिंबीर शरीरातून सरासरी ८७ टक्के शिसे, ९१ टक्के पारा व ७४ टक्के ॲल्युमिनियम काढून टाकू शकते. पण, हे खरे आहे का? याबाबत सेलिब्रिटी सौंदर्यतज्ज्ञ व त्वचाविज्ञानिक डॉ. मिक्की सिंग यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉ. मिक्की सिंग म्हणाले, “हे खरे आहे की, कोथिंबीर शरीरातून शिसे, पारा व ॲल्युमिनियम काढून टाकण्यास मदत करू शकते. कारण- ती शरीरात असलेल्या जड धातूंना सौम्य वा हलके करू शकते. मग शरीराकडून हे घटक त्याज्य म्हणून लघवीद्वारे बाहेर फेकले जातात. तसेच कोथिंबिरीमध्ये बुरशीनाशक, सूक्ष्म जीवविरोधी व दाहविरोधी क्षमतादेखील आहे.

कोथिंबीर खाण्यासाठी आरोग्यदायी असली तरी अधिक संशोधन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जड धातूंपासून मुक्त होण्याचा तो सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही. कोथिंबीर मानवी शरीरातून शिसे, पारा व ॲल्युमिनियम यांसारखे जड धातू काढून टाकण्यास मदत करू शकते ही संकल्पना वैज्ञानिक संशोधनाने दाखवून दिली आहे.

(हे ही वाचा:Weight Loss Tips: ‘या’ पेयाने झपाट्याने होईल तुमचे वजन कमी; सेवनाची व बनविण्याची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…)

कोथिंबीर सेवनाने काही लोकांना खालील त्रास होण्याची शक्यता

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या : मोठ्या प्रमाणात कोथिंबीर खाल्ल्यास मळमळ, उलट्या, अतिसार किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

औषधांमुळे समस्या : कोथिंबीर काही औषधांची परिणामकारकता कमी करू शकते; जसे की रक्त पातळ करणे किंवा मधुमेहावरील औषधांची उपयुक्तता कमी होऊ शकते.

हायपोटेन्शन : कोथिंबीर रक्तदाब कमी करू शकते, जे उच्च रक्तदाबावरील औषधे घेणाऱ्यांसाठी समस्या ठरू शकते.

डिटॉक्सिफिकेशनसाठी कोथिंबीर किंवा इतर कोणतेही पूरक घटक वापरण्यापूर्वी हेल्थकेअर प्रोफेशनलशी सल्लामसलत करणे अत्यावश्यक आहे. विशेषत: जर तुमची मूलभूत आरोग्य स्थिती असेल किंवा औषधे घेत असाल, तर आवर्जून सल्ला घ्या, असेही डॉ. मिक्की सिंग यांनी नमूद केले आहे.

डॉ. सिंग यांनी सुचवले की, जर हेल्थकेअर प्रोफेशनल कोथिंबीर वापरण्याची परवानगी देत ​​असतील, तर ती तुम्ही सॅलडद्वारे वापरू शकता आणि दररोजच्या जेवणात ती समाविष्ट केली जाऊ शकते. कोथिंबीर अर्क किंवा कोथिंबिरीचा चहाचे सेवनही तुम्ही करू शकता. तथापि, त्या सेवनानंतर शरीराकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचे निरीक्षण करणे आणि त्यानुसार त्याचे प्रमाण समायोजित करणे आवश्यक आहे.