Friendship & Mental Health : मैत्री हे खूप सुंदर नाते आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर अनेक मित्र भेटतात. काही मित्र काही काळासाठी; तर काही मित्र दीर्घकाळ आपल्याबरोबर राहतात. नि:स्वार्थी नाते म्हणजे खरी मैत्री असते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून चांगल्या मैत्रीची अनेक उदाहरणे दाखविण्यात आली आहेत. दुनियादारी, अशी ही बनवाबनवी यांसारखे मराठी चित्रपट असो किंवा शोले चित्रपटातील जय-वीरूची जोडी असो; त्यातून तुम्हाला नि:स्वार्थी मैत्री आणि एक चांगला मित्र कसा असावा, हे दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वेक्षणात काय सांगितले आहे?

एपिडेमियोलॉजी अॅण्ड सायकियाट्रिक सायन्सेस (Epidemiology and Psychiatric Sciences) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सांगितले आहे की, वृद्ध व्यक्तींमधील मैत्री ही त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते.
या अभ्यासाचे लेखक मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक विल्यम चोपिक (William Chopik) सांगतात, “या संशोधनातून घनिष्ठ मैत्रीमुळे होणारे आरोग्याचे फायदे दिसून आले आहेत. हा आजपर्यंतचा सर्वांत मोठा आणि व्यापक असा अभ्यास आहे.”

चोपिक आणि त्याच्या सहकाऱ्यांना या अभ्यासातून असे दिसून आले की, एक चांगली मैत्री व्यक्तीचे आयुष्य वाढवू शकते. आठ वर्षांच्या या अभ्यासादरम्यान तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ज्यांनी सहभाग घेतला होता, त्या लोकांची घनिष्ठ मैत्रीमुळे मृत्यूची शक्यता २४ टक्क्यांनी कमी झाली, असे दिसून आले.
त्याशिवाय चांगले मित्र आयुष्यात असण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मित्रांमुळे नऊ टक्के शारीरिक हालचाल करणे वाढते. १७ टक्के नैराश्याची प्रकरणे कमी होतात आणि १९ टक्के स्ट्रोकचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

हेही वाचा : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….

घनिष्ठ मैत्रीमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या दूर

बंगळुरूच्या विद्यानपुरा येथील नातेसंबंध तज्ज्ञ, लैंगिक शास्त्रज्ञ व मानसोपचार तज्ज्ञ सल्लागार डॉ. पावना एस. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “जेव्हा आपण एखाद्या अर्थपूर्ण नातेसंबंधात वावरतो, तेव्हा आपला स्ट्रेस आपोआप कमी होतो. रक्तदाब कमी होतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. अत्यंत जवळचे जिवलग मित्र आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्या दूर करू शकतात; जसे की नैराश्य किंवा एन्झायटीपासून आपण दूर राहतो आणि आपल्या शारीरिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम दिसून येतो.”
“त्याशिवाय या जिवलग मित्रांकडून भावनिक आधार मिळतो; ज्यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवत नाही आणि आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. घनिष्ठ मैत्रीचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो.” असे डॉ. पावना एस. यांनी पुढे स्पष्ट केले.

जर मित्राबरोबर तुमचे घनिष्ठ नाते असेल, तर तुम्ही संयम बाळगणे आणि संवाद साधणे शिकता. मित्र अडचणीच्या वेळी सहकार्य करतात; ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. वेगवेगळ्या अनुभवांविषयी मित्रांबरोबर चर्चा केल्याने तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मित्रांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि सहकार्यामुळे आपल्यामध्ये सुधारणा होते. अशा मैत्रीमुळे तुम्ही दयाळू आणि एक चांगली व्यक्ती बनू शकता.

वाईट मित्रांमुळे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम

एका नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे मैत्रीच्याही दोन बाजू आहेत. डॉ. पावना एस. सांगतात, “प्रौढ वयात तुमच्या मित्रांचा दबाव तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतो; ज्यामुळे निर्णय घेताना किंवा व्यवहार करताना त्याचा परिणाम दिसून येतो. मित्रांकडून होणारी टीका किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या नकारामुळे अनेकदा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
वाईट मित्र तुमचा स्वाभिमान कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अडचणीच्या वेळी तुम्ही एकटे पडू शकता. मैत्रीमध्ये एकमेकांविषयी वाटणारा मत्सर, अविश्वास यांमुळे नातेसंबंध बिघडू शकतात.