फळं खाणं संतुलित आहारासाठी एक उत्तम पर्याय मानलं जातं. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का, की तुम्ही जरा जास्तच फळं खाता. कारण जसं प्रत्येक गोष्टीचं प्रमाण महत्त्वाचं आहे, तसंच फळंही जास्त खाल्ल्याने शरीरावर विशेषतः यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

“जेव्हा मोठ्या प्रमाणात फ्रुक्टोज (फळांमधून) यकृतात जातो आणि दीर्घकाळ हेच सुरू असतं, तेव्हा यकृत या अतिरिक्त फ्रुक्टोजचा वापर चरबी तयार करण्यासाठी करतो (हे लिपोजेनेसिस म्हणून ओळखलं जातं), ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो,” असं आहारतज्ज्ञ कविता देवगण यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितलं.

फळांवर आधारित आहार घेतल्यामुळे वजन लवकर कमी होऊ शकतं, असं अनेक लोक मानतात. पण, डॉ. उदय सांगळोदकर, सीनियर कन्सल्टंट हिपॅटोलॉजिस्ट आणि ग्लिनिगल्स हॉस्पिटल्स, परेल येथील लिव्हर आणि ट्रांसप्लांट आयसीयूचे क्लिनिकल लीड यांचे म्हणणे आहे की, फळांमुळे यकृतावर खराब परिणाम होतो असं मानणं चुकीचं आहे. फळांमध्ये असलेल्या फ्रुक्टोजमुळे चरबीचा संचय होऊन नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकते, असं लोक म्हणतात, पण “अशा दाव्यांच्या आधारावर कोणतेही अध्ययन उपलब्ध नाही,” असं डॉक्टर म्हणाले.
“फळांचे अत्याधिक सेवन केल्यामुळे यकृताच्या विकारांची कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही. पण, फळांचे जास्त सेवन केल्याने काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात, ज्याची काळजी घेतली पाहिजे,” असं डॉ. उदय सांगळोदकर म्हणाले.

हेही वाचा… वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

“फळांचे अनियंत्रित सेवन केल्याने ब्लोटिंग, अतिसार किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते, कारण फळांमध्ये फायबर्स आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हलका रेचक प्रभाव (laxative effect) होऊ शकतो.”

डॉ. सांगळोकार यांच्या म्हणण्यानुसार, फळांमधील नैसर्गिक आम्ल आणि साखरेमुळे दात किडण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. “जास्त साखर घेतल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी असामान्य होऊ शकते आणि हे मधुमेह, हायपरग्लायसीमिया किंवा पॅनक्रियास संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी चांगले नाही,” असे ते म्हणाले.

हेही वाचा… तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे? मग होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…

डॉ. सांगळोदकर म्हणाले, “फळांमधील फ्रुक्टोजमुळे इन्सुलिन प्रतिकार, स्थूलता, मधुमेह आणि पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. फक्त फळे खाण्याऐवजी पोषण तत्त्वांनी भरपूर आहार घेणं चांगलं आहे. कोणत्याही आहार ट्रेंडचा अंधपणे पालन करू नका आणि त्याचे साइड इफेक्ट्स जाणून घ्या,” असे डॉ. सांगळोदकर यांनी सांगितले.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)