Neck Circumference: तुमच्या मानेची चरबी तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या आव्हानांना सूचित करू शकते? अलीकडील एका अभ्यासांनी असे सुचवले आहे की, मानेची चरबी ज्याकडे आरोग्याचे सूचक म्हणून दुर्लक्ष केले जाते, ते स्लीप एपनिया आणि इतर श्वसन समस्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
काही इन्स्टाग्राम रील्समुळे आम्हाला समजले की, तुमच्या मानेचे मोजमाप केल्याने तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या समस्या स्पष्ट होऊ शकतात. त्यांच्या मते, जर तुमच्या मानेचा घेर १६ इंच (महिलांसाठी) आणि १७ इंचांपेक्षा (पुरुषांसाठी) जास्त असेल तर तुमच्या शरीरातील चरबी तुमच्या श्वासोच्छ्वासात अडथळा आणण्यासाठी जबाबदार असू शकते.
मुंबई येथील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलच्या डॉ. दिव्या गोपाल, सल्लागार अंतर्गत औषध यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला सांगितले की, मानेची चरबी तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, परंतु अचूक मोजमाप विविध घटकांवर अवलंबून असते. स्नायूंचे वस्तुमान, हाडांची रचना आणि द्रव धारणा यांसारख्या घटकांच्या आधारावर मानेचा घेर लक्षणीयरीत्या बदलू शकतो.
डॉ. गोपाल यांनी सांगितले की, “मानेचे माप हे सर्वसमावेशक मूल्यांकनाचा एक घटक असू शकते, परंतु बॉडी मास इंडेक्स (BMI) कंबरेचा घेर आणि वैद्यकीय इतिहास यांसारख्या इतर निष्कर्षांच्या संयोगाने त्याचा विचार करणे आवश्यक आहे.”
मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास कसा होतो?
मानेच्या चरबीमुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) होऊ शकतो. या स्थितीत मानेभोवती अतिरिक्त चरबी झोपेच्या वेळी वरच्या वायुमार्गाला अरुंद करून श्वासोच्छ्वासाच्या मार्गात अडथळा आणू शकते, ज्यामुळे अधूनमधून श्वासोच्छ्वास थांबतो. काही प्रकरणांमध्ये, मानेची जास्त चरबी फुफ्फुसांच्या विस्ताराच्या यांत्रिक प्रतिबंधातदेखील योगदान देऊ शकते, जरी हे OSA पेक्षा कमी सामान्य आहे.
अशा प्रकारे मानेच्या चरबीचा श्वासोच्छ्वासावर परिणाम होतो.
श्वासोच्छ्वासाच्या मार्गात अडथळा आल्याने पुढील गोष्टी होऊ शकतात:
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागूंत : OSA आणि इतर झोपेच्या विस्कळीत श्वासोच्छ्वासाच्या परिस्थिती उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेहाच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहेत.
संज्ञानात्मक कमजोरी : OSA मुळे झोपेची कमतरता व त्यामुळे दिवसभराचा थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मूड खराब होऊ शकतो.
चयापचयाचा विकार : लठ्ठपणा बहुतेकदा मानेच्या चरबीशी जोडलेला असतो, इन्सुलिन प्रतिरोध, टाइप २ मधुमेह आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोगाशी संबंधित असतो.
मानेवरील चरबीचे व्यवस्थापन कसे करावे?
डॉ. गोपाल माने यांनी चरबी व्यवस्थापित करण्यासाठी खालील उपाय सांगितले आहेत.
वजन व्यवस्थापन : आहार आणि व्यायामाच्या संयोजनाद्वारे एकूणच वजन कमी करणे हे मानेची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.
व्यायाम : मानेच्या स्नायूंना लक्ष्य करणाऱ्या विशिष्ट व्यायामांचा चरबी कमी होण्यावर मर्यादित प्रभाव असू शकतो.
जीवनशैलीत बदल : मद्यपान कमी करणे, धूम्रपान सोडणे झोपेशी संबंधित श्वासोच्छ्वासाच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकते.
वैद्यकीय हस्तक्षेप : गंभीर प्रकरणांमध्ये सतत सकारात्मक वायुमार्ग दाब (CPAP) थेरपी किंवा शस्त्रक्रिया OSA उपचारांसाठी विचारात घेतली जाऊ शकते.